शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

'हिंदुस्थानी भाऊ'चे गुलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 2:49 PM

देशातला सगळा शिक्षित समाज सोशल मीडियावर आहे. निरर्थकाच्या नाल्यात सगळे कुटुंब गटांगळ्या खाते आहे. आईबापाने सतत दुर्लक्ष केले की एखादी पोरगी समोर येईल त्या पोराबरोबर पळून जाते; तसे सगळा समाज मोबाईलवर गढून गेला असल्याने आपले शहाणपण कोणाबरोबर तरी पळून गेले आहे. फेक अकाऊंट बनवून लोकांवर गरळ ओकणाऱ्या बापाच्या मुलाने हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनाने भडकून जाऊन सार्वजनिक बसची काच फोडली तर दोष कोणाला देणार ?

- मंदार अनंत भारदे -हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी अटक केली, ह्याने मी अतीव दुःखी झालो आहे. हा एका अर्धमराठी भाषिक माणसावर अन्याय आहे. हिंदुस्थानी भाऊचे पहिले दर्शन मला आजही चांगले आठवते आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताशी संबंधित संदर्भाचा कोणता तरी व्हिडिओ मी यूट्यूबवर शोधत होतो. तेेव्हा तन्मय होऊन सुग्रास अन्नाचा घास चावताना मध्ये खडा लागावा, तसा हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ समोर आला. सर्च इंजिनच्या आर्टिफिशिअल इंटिलिजन्सची औकात अद्याप हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि हिंदुस्थानी भाऊ ह्यातला गुणात्मक फरक जाणून घेण्याइतपत प्रगल्भ नाही. त्यामुळे त्याने शास्त्रीय संगीताला भाऊच्या पायरीवर आणून बसवले. खरेतर भाऊचे स्थान फारच वरचे आहे.

हाताच्या जवळ जवळ प्रत्येक बोटात सोन्याची अंगठी, त्यातली एक अंगठी काडेपेटीच्या आकाराची, गळ्यात गोठ्यातल्या बैलाच्या गळ्यात घालतात तेवढ्या दोरीच्या आकाराची सोन्याची चेन आणि हातात सोन्याचे जाड कडे आणि कपाळाला नवहिंदुत्ववादी लावतात तसा शैव वैष्णव काहीच नसलेला संदर्भहीन टिळा. ह्या असल्या विराट दर्शनाला लोक हिंदुस्थानी भाऊ म्हणून ओळखतात. संजय दत्तच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन आपले वागणे, चालणे, बोलणे हिंदुस्थानी भाऊने संजय दत्तसारखे बनवलेले आहे आणि ते स्वाभाविकही आहे. बाबा रामरहीमला तुकारामापेक्षा आसाराम जवळचा वाटणारच!

हिंदुस्थानी भाऊ हा कोणत्याही चित्रपटाचा किंवा मालिकेचा हिरो नाही, पण आज तो मोठा सेलिब्रिटी आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवर त्याला लाखो अनुयायी आहेत. त्याच्या लोकप्रियतेपुढे मुख्य धारेतले अनेक अभिनेते आणि नेतेही खुजे आहेत. त्यामुळे तमाम भारतात तो जिथेही जातो, तिथे त्याला बघायला तरुण मुले गर्दी करतात. लाखो मुलांनी त्यांचा डीपी म्हणून हिंदुस्थानी भाऊचा फोटो ठेवला आहे. हा हिंदुस्थानी भाऊ बहुतेक वेळा गाडीत बसून व्हिडिओ बनवतो. हिंदुस्थानी भाऊचा पाकिस्तानवर प्रचंड राग आहे. पण खरे सांगायचे तर त्याचा मुसलमानांवर राग आहे. त्यामुळे त्याला मुसलमानांवर जे बोलायचे असते ते तो पाकिस्तानी लोकांच्या नावाने बोलतो. बेमुवर्तखोरपणे बोलणारे लोक ही काही फक्त भारताची विरासत नाही. त्यामुळे चीप पब्लिसिटी मिळवायला आपल्याकडे जसे अगदी गल्लीछाप पुढारीही दिवसरात्र पाकिस्तानविरुद्ध आपल्याच देशात रिकामटेकड्या लोकांसमोर दंडबेटकुळ्या फुगवून दाखवत असतात, तसेच पाकिस्तानातले रिकामटेकडे देखील भारताविरुद्ध गरळ ओकत असतात. हे असले पाकिस्तानी रिकामटेकडे हिंदुस्थानी भाऊ हेरून काढतो आणि मग गाडीचा दरवाजा व्यवस्थित बंद करून त्यांना शिव्याशाप देतो.

सोशल मीडियावर त्याला लाखांनी हक्काचे सबस्क्रायबर आहेत. म्हणजे सुमारे दीड ते दोन कोटी लोकांपर्यंत त्याचे व्हिडिओ पोहोचतात. तो प्रामुख्याने मराठीचा प्रभाव असलेली हिंदी बोलतो. त्यामुळे शक्यता अशी आहे की त्याचे व्हिडिओ पाहणाऱ्या दोन कोटी संख्येत किमान एक कोटी तरी मराठी असतील. शाळा, महाविद्यालयात आज आहेत किंवा त्याच्या आसपास ज्यांचे वय आहे असे एकूण मराठी लोकसंख्येत ३ कोटी युवा आहेत हे गृहीत धरले तर प्रत्येक तिसऱ्या मुलाला हिंदुस्थानी भाऊ माहीत आहे किंवा त्याच्यावर त्याचा प्रभाव आहे. आता मुंबई पोलिसांनी त्याला अटक करेपर्यंत किंवा मी लिहीपर्यंत हिंदुस्थानी भाऊबद्दल तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल तुम्हाला किती कमी माहिती आहे हे लक्षात घ्या.

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात ज्यांचा ज्या गोष्टीशी काहीही संबंध नाही, ज्यांना ज्या विषयातले काहीही कळत नाही, त्यांना त्या विषयावर व्यक्त होण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. व्यक्त व्हायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोचले आहे. ज्याच्याकडे मांडायला काहीतरी विचार आहे, पण धर्मसत्ता, राजसत्ता त्याला त्याचे विचार मांडू देत नाही अशा विचारी लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा करण्याचा मागास काळातून आपण आता अविचारी माणसाला ही भरपेट व्यक्त होता येईल. अशा सोशल मीडियाच्या स्वतंत्र ग्लोबल काळात येऊन पोचलो आहोत. त्यामुळे हिंदुस्थानी भाऊ शाळा आणि महाविद्यालयाच्या परीक्षा कधी घ्याव्यात, कोणी घ्याव्यात कशा घ्याव्यात ह्याबद्दल भाष्य करतो आणि आंदोलन उभे करतो ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?

हिंदुस्थानी भाऊला अटक झाल्याचे मला अतीव दुःख झाले, कारण मला भाऊ हा किरकोळ धोका वाटतो. दारू पिऊन रस्त्यावरून तर्राट होऊन भेलकांडत एखादा चालला असेल तर त्याला शिक्षा काय देणार? फार तर रस्त्याच्या कडेला एखाद्या खड्ड्यात हाताला धरून त्याला झोपवून देणे इष्ट ! पण उद्या त्याच्या भेलकांडत चालण्याचीच जर एखाद्याला भुरळ पडायला लागली आणि तसे भेलकांडत चालणे जर त्याला डौलदार वाटायला लागले तर ते काळजीचे आहे. विठ्ठल रामजी शिंदे, धोंडो केशव कर्वे यांसारखे शिक्षण सुधारक आणि फुले, शाहू, आंबेडकरांसारखे समाजसुधारक असणारा महाराष्ट्र हिंदुस्थानी भाऊला शिक्षण सुधारक आणि बिचुकलेला समाजसुधारक समजून त्यांच्यावर लट्टू झालेला पाहिले की पाठीच्या कण्यातून भीतीची थंड शिरशिरी जाते. या देशातला जवळजवळ सगळा शिक्षित समाज आज सोशल मीडियावर आहे. दिवसरात्र तो व्यक्त होत सुटलाय. सगळी आभासीच दुनिया! आई-बाप आपापल्या मोबाइलवर मोदी की राहुल, हिंदू की मुसलमान, ते की आपण, अमुकची फॉरेन ट्रीप की तमुकची रेसिपी या असल्या चर्चांत गढून गेलेत. फेसबुक, इन्स्टा बघत असताना मुलांनी पालकांना डिस्टर्ब करू नये म्हणून मुलांच्या हातातही स्वतंत्र मोबाइल दिलेत आणि निरर्थकाच्या नाल्यात सगळे कुटुंब गटांगळ्या खाते आहे. आई-बापाने सतत दुर्लक्ष केले की एखादी पोरगी कशी समोर येईल त्या पोराबरोबर पळून जाते; तसे सगळा समाज मोबाइलवर गढून गेला म्हणून आपले शहाणपण कोणाबरोबर तरी पळून गेले आहे.

कोणत्या तरी व्हाॅट्सॲप फॉरवर्डने बापाच्या भावना दुखावल्या जात असताना जर पोराने पाहिले असेल तर हिंदुस्थानी भाऊ त्याला क्रांतिकारक वाटला तर त्याचे काय चुकले? या मुलाने हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनामुळे भडकून जाऊन सार्वजनिक बसची काच फोडली तर दोष कोणाला देणार? उन्मादाच्या महोत्सवात विवेकाचा शांत आकांत कोणाला ऐकायला येणार आहे?

मुलांच्या हक्काचा वेळ आई-बापांनी फेसबुकवर लोकांच्या मुलांच्या फोटोंना हाऊ क्यूट किंवा कलीगच्या न पाहिलेल्या आत्याला RIP करण्यासाठी दिला तर मुलं हिंदुस्थानी भाऊच्या कच्छपी लागणारच ! बाप फेक अकाउंट बनवून ओळख लपवून विरोधी विचार मांडणाऱ्यांच्या वॉलवर जर चिखल करत असेल तर मुलगा फेक अकाउंट बनवून वर्गातल्या मुलीशी अश्लील बोलला तर त्यात काय नवल आहे? हिंदुस्थानी भाऊ, बिचुकले हा किरकोळ धोका आहे, काळाच्या सर्व प्रहरात कचरा होताच; पण त्याला उकिरड्यावर फेकायचे असते याचे शहाणपणदेखील होते! मोबाइलमध्ये मान खुपसलेले लोक कचरा घेऊन आता देव्हाऱ्याच्या दिशेने निघालेत हा मोठा धोका आहे.

आधी ४ जी होते, आता ५ जी येईल. ट्विटर आहे, इन्स्टा, फेसबुक आहे, अजून काहीतरी येईल कितीही येईल. भरपूर लाईक येतील, फ्रेंड रिक्वेस्ट येतील, कोणाच्या तरी फॉरेन ट्रीपचे फोटो असूयेने बघत किंवा उगा निरर्थक लाइक मोजत जेव्हा तासन्तास तुम्ही गुंगून गेलेले असाल तेव्हा शक्यता आहे की कोणत्या तरी अभद्राच्या कुशीत तुमच्या मुलीने किंवा मुलाने विश्वासाने आसरा शोधला असेल. त्या वेळेला दोष द्यायला कोणता हिंदुस्तानी भाऊ शोधाल?

हास्यास्पद ठरण्याची, निरर्थक असण्याची लाज वाटेनाशी झाली आहे! -हळूहळू एखादी इमारत धसत जावी, तशी संपूर्ण समाजाची निवड करण्याची क्षमता धसत चालली आहे. कुटुंबीय, मित्र यांच्याबरोबरचा वेळ, की मोबाईलचा स्क्रीन, यात लोकांनी स्क्रीन निवडला आहे. शांत संतुलित विश्लेषण, की कर्कश तर्क, यात कर्कशता निवडली आहे. प्रत्यक्ष वास्तव, की आभासी जग, यात आभासी जग निवडले आहे. भेसूर वास्तवाचे आकलन, की भूतकाळातले चुकते करायचे हिशेब, यात भूतकाळ निवडला आहे. सगळीकडे निर्बुद्धतेचा फुफाटा उडालाय. त्याचे आता वादळ असे नवे नामकरण झाले आहे. आता हास्यास्पद ठरण्याच्या किंवा निरर्थक असण्याच्या लज्जेपासून लोक मुक्त आहेत. आपण काहीतरी खोटारडी माहिती फॉरवर्ड करतो आहोत, याची त्यांना लाजही वाटत नाही किंवा चुकून कोणाला काहीतरी खोटे पाठवले गेले, तर खंतही वाटत नाही. सगळ्या जगण्यालाच पालापाचोळ्याची अवकळा आणि एकूण भंपकांचा मेळा. आता ते कोणाच्या वाढदिवसाला जात नाहीत, पण अगदी नेम धरून नेमक्या वेळेला HBD कळवतात! ते आता कोणाच्या दारावर जात नाहीत, पण न चुकता कोणालाही उभ्या उभ्या RIP करून येतात !! चांगले आणि वाईट यातली निवड सतत चुकत चालली आहे आणि ती अख्ख्या समाजाची चुकत चालली आहे, हा मुख्य काळजीचा विषय आहे आणि त्यामुळेच हिंदुस्थानी भाऊ किंवा बिचुकले हे किरकोळ विषय आहेत आणि त्यांना निवडणारे लोक हाच मुख्य विषय आहे .

युट्यूब लाईव्ह आणि फटाफट इन्स्टंट क्रांती -मागच्या वर्षीच्या मे महिन्यात हिंदुस्थानी भाऊला पहिल्यांदा मुंबई पोलीस पकडून घेऊन गेले. त्यावेळेला त्याने दहावी, बारावीच्या परीक्षा घेणे कसे अन्यायाचे आहे हे मांडले होते. मे महिन्यापासून आता फेब्रुवारी महिन्यापर्यंत दहावी /बारावीच्या लाखो मुलांना असे मनापासून वाटते आहे की, आपल्या हिंदुस्थानी भाऊला सरकार घाबरेल आणि परीक्षा रद्द करेल आणि आपण आपोआप पुढच्या वर्गात जाऊ. हा भाऊ व्हिडीओ बनवतो आणि "सरकार तुमचे ऐकत कसे नाही ते मी बघतो, मी त्यांना तुमचे ऐकायला भाग पाडीन आणि त्यांनी नाही ऐकले, तर "तांडव करेन" अशी सरकारला ऑनलाईन धमकी देतो.

मागच्यावर्षी मे महिन्यात पहिल्यांदा परीक्षा रद्द करा, अशी मागणी करणाऱ्या या हिंदुस्थानी भाऊने गेल्या आठ महिन्यात "मुलांनो जीव तोडून अभ्यास करा, कधीही परीक्षा होईल, तेव्हा तुम्ही तयार असायला हवे", असे सांगितल्याचे मी ऐकलेले नाही. पण परीक्षा रद्द करा किंवा ती ऑनलाईन घ्या याच्यासाठी मात्र तो आग्रही आहे. गाडीत जाऊन युट्यूब लाईव्ह सुरू केले की, हिंदुस्थानी भाऊची फटाफट इन्स्टंट क्रांती सुरू होते आणि त्याच्यावर त्याच्या भक्तांच्या शुभेच्छा आणि कौतुकांचा वर्षाव सुरू होतो. - हा काय चक्रमपणा आहे?mandarbharde@gmail.com(लेखक वक्ता, उद्योजक आहेत.) 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलMobileमोबाइल