गाणे, जगणे आणि पुन्हा गाणे
By Admin | Updated: January 10, 2015 12:49 IST2015-01-10T12:49:57+5:302015-01-10T12:49:57+5:30
अगदी गुणगुण्यासारख्या निर्हेतुक कृतीपासून ते गाण्यांमध्ये आपले स्वत्त्व शोधण्यासारख्या उत्कट, गहिर्या प्रक्रि येपर्यंत, टाइमपास किंवा तात्कालिक मौजमस्तीपासून ते आयुष्यभरासाठी नादखुळा (फॅन) राहण्यापर्यंत आणि अंताक्षरीसारख्या खेळापासून ते अंत्यविधीसारख्या प्रसंगापर्यंत भारतीयांच्या व्यावहारिक आणि भावनात्मक अनुभवविश्वाचा भाग झालेल्या हिंदी चित्रपटगीतांची एक सफर..

गाणे, जगणे आणि पुन्हा गाणे
- विश्राम ढोले
ये वही गीत है.
हिंदी चित्रपटातील गाणी ही एक अतिशय विलक्षण सांस्कृतिक घटना आहे. हे ‘विलक्षणपण’ अनेक पातळ्यांवर दिसून येते. एकतर चित्रपटांमध्ये गाणी असणे, इतक्या प्रमाणावर असणे आणि इतक्या सातत्यपूर्ण रीतीने असणे हेच एक आश्चर्य. कारण जगभरातील इतर कोणत्याही चित्रपटसंस्कृतीत गाण्यांना इतके मोठे आणि अंगभूत स्थान नाही. त्या अर्थाने नाच-गाणी ही भारतीय चित्रपटसृष्टीची जागतिक पातळीवरील स्वत्त्व-खूण. गाण्यांची निर्मिती, वितरण आणि त्यांचे ऐकले जाण्याचे प्रमाण या निकषांवरही हिंदी चित्रपटातील गाणी एक जागतिक सांगीतिक आश्चर्य मानावे लागते. कारण नावात जरी हिंदी असले तरी या गाण्यांचे निर्माते, वितरक आणि चाहते कधीच फक्त हिंदी भाषक पट्टय़ापुरते सीमित नव्हते. अगदी १९५१च्या आवारा हुँपासून ते २0११च्या ‘छम्मक छल्लो’पर्यंत हिंदी गाण्यांचा संपर्क, संबंध आणि संदर्भ केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक राहिला आहे. नवेगावमधील पानठेल्यापासून ते न्यूयॉर्कमधील थिएटरपर्यंत सर्वत्र, सदैव आणि सहजसंचार करण्याची हिंदी चित्रपटगीतांसारखी ताकद जगातल्या फार कमी संगीत प्रकारांनी दाखवली आहे.
भारतासारख्या देशात भाषा, धर्म, प्रांत, अस्मिता, आर्थिक-सामाजिक वर्ग, व्यवसाय, शिक्षण अशा असंख्य विभाजकांच्या सीमा ओलांडून एकदोन नव्हे तर साठ-सत्तर वर्षे लाखो व्यक्तींच्या अनुभवविश्वाचा भाग होणे, त्यांच्या भावविश्वाला हलका-गहिरा स्पर्श करणे हे एक विलक्षण सांस्कृतिक यश म्हटले पाहिजे. इतका आसेतुहिमाचल सार्वत्रिक ‘भारतीय’ अनुभव आणि गुंतलेपण देण्याची क्षमता हिंदी (चित्रपट आणि) गाण्यांव्यतिरिक्त फक्त रेल्वे, क्रिकेट आणि मतदानामध्येच आहे. पण हिंदी चित्रपटगीतांचे विलक्षणपण या बाह्य निकषांपुरतेच र्मयादित नाही. शब्द आणि सुरांतून अनुभव आणि अभिव्यक्तीचा जो एक विशाल, बहुरंगी आणि बहुढंगी असा पट हिंदी गाण्यांनी निर्माण केला आहे तोही तितकाच विलक्षण आहे. किंबहुना तो पट तसा असल्यानेच हिंदी गाणी ही आधुनिक भारतातील एक विलक्षण सांस्कृतिक घटना बनली आहेत.
नाट्यशास्त्रातील नऊ रस, त्यांच्याशी संबंधित वीस-पंचवीस भाव, पन्नास-साठ प्रकारच्या गाण्यांतील पात्रप्रकृती (कॅरेक्टर्स) आणि शेकडो विषयछटा यांची एक भन्नाट सरमिसळ करून या पटातील शब्दकळा साकारली आहे.
इतकीच भन्नाट आणि चक्रावून टाकणारी सरमिसळ सुरांमध्येही आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय, लोकसंगीत, भक्तीसंगीत अशा देशी संगीतकोटींसोबतच वेस्टर्न क्लासिकल, रॉक, जॅझ, डिस्को, पंक, रॅप अशा संगीतप्रकारांमधून आणि अरबी, आफ्रिकी, लॅटिन अमेरिकी अशा संगीतविश्वामधून सूर, सुरावटी, वाद्ये, ताल आणि शैली उचलत हिंदी चित्रपटगीतांनी सुरांचे एक विलक्षण विश्व उभे केले आहे. इतकी सरमिसळ (आणि बरेचवेळा तर उचलेगिरी) करूनही कुठेतरी आपला खास टच किंवा निजखुण उमटविण्याची हिंदी गाण्यांची स्वभाववृत्तीही विलक्षणच.
जगभरातील नवे-जुने स्वीकारण्याची, विरोधाभासासकट वैविध्याला सामावून घेण्याची, सगळ्या वृत्ती-प्रवृत्तींची आपल्या आवडीनुसार खिचडी करण्याची आणि एका विचित्र तटस्थ-गुंतवणुकीतून काळाच्या सोबत वाहत राहण्याची भारतीय मनोवृत्ती या गाण्यांच्या आशय-विषय आणि मांडणीतून सतत दिसत राहते. आणि म्हणूनच उचलेगिरी, सवंगता, अश्लीलता, निलाजरे व्यापारीकरण, सौंदर्यहीनता वगैरे आरोपातील सत्यांश मान्य करूनही हिंदी चित्नपटगीते हे आधुनिक भारतीय मनाचे अस्सल स्वगत आहे किंवा हिंदी चित्नपटगीते हे आधुनिक भारताचे खरे लोकसंगीत आहे असे म्हणावे लागते.
यातला आधुनिक शब्द महत्त्वाचा आहे. कारण इंग्रजी राजवटीपासून ते नव्वदीनंतरच्या भांडवली जागतिकीकरणापर्यंत आधुनिक या शब्दाच्या आवरणामध्ये जे जे बाहेरून येत गेले त्यातील काय स्वीकारायचे, काय नाकारायचे आणि काय, किती बदलायचे ही खूप मोठी आणि गहिरी सांस्कृतिक निर्णयप्रक्रि या भारतीय समुदायाने अनुभवली आहे. स्व, कुटुंब, नाती, प्रेम, मैत्री, लैंगिकता, आकांक्षा, स्त्री-पुरुष संबंध, अधिकार, समाज, देश, नैतिकता, जगण्यातील श्रेयस-प्रेयस, मानवी स्खलनशीलता, निसर्ग, धर्मसत्ता, दैवीसत्ता अशा अनेकानेक मूलभूत संकल्पनांच्या मांडणी-फेरमांडणीचा हा सारा काळ. एका पातळीवर हा सारा काळ म्हणजे परंपरा आणि आधुनिकतेमधील एक उत्कट संवाद-संघर्ष आहे. हिंदी चित्रपटाची गाणी हा त्यातलाच एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात लोकप्रिय आविष्कार. परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील संवाद-संघर्षाची शिकवण आणि आठवण देणारा. या संवाद-संघर्षाला सांगीतिक सौंदर्याच्या कोंदणात बसवून आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग करून टाकणारा.
हिंदी चित्रपटगीतांच्या माध्यमातून हे सदर याच संवाद-संघर्षाच्या प्रक्रियेचा आढावा घेणार आहे. हा गाण्यांचा नॉस्टॅल्जिया नाही. गाण्यांचा सौंदर्य-आस्वाद नाही किंवा त्यांच्यावर टीका-स्तुतीही नाही. कलाकारांचे चरित्र नाही की किस्से नाहीत. प्रसंगोपात त्यासंबंधी उल्लेख आले तरी नॉस्टॅल्जिया, आस्वाद किंवा व्यक्तिगत गुणगान ही या सदराची उद्दिष्टे नाहीत. पारंपरिक आणि आधुनिकतेच्या घनघोर वाटाघाटींमध्ये गुंतलेल्या भारतीय मनाची अवस्था त्या त्या स्थळकाळामध्ये हिंदी चित्रपटगीतांनी कशी व्यक्त केली हे एका गाण्याच्या किंवा गीतसमूहाच्या साह्याने उलगडून दाखविण्याचा हा एक र्मयादित प्रयत्न.
‘मान जाईए’ (१९७२/गायक- किशोरकुमार/सं.- जयदेव/ गीत- नक्ष लायलपुरी) या चित्रपटामध्ये एक गाणे आहे-
ये वही गीत है जिसको मैने धडकन मे समाया है.
तेरे होठों से इसको चुराकर. होठोंपे सजाया है.
भारतीय हृदयाच्या स्पंदनातून उगवलेली ही गाणी. ती फक्त तिथल्या संदर्भांसहित या सदरामध्ये सजवण्याचा हा प्रयत्न. गाणी आपली आणि त्यातील स्पंदनेही आपलीच. हे सदर आणि लेखक तर फक्त एक वार्षिक निमित्त.
.आणि तब्बल ७१ गाणी
एका चित्नपटात सर्वाधिक गाण्यांचा विक्रम मदान थिएटरच्या इंद्रसभा (१९३२) या चित्नपटाच्या नावावर आहे. विश्वास बसणे अवघड आहे, पण त्यात तब्बल ७१ गाणी होती. अर्थात ही सर्व काही आजच्या रूढार्थाने गाणी नव्हती. हा चित्नपटच काव्य-संवादाच्या स्वरूपात होता. त्यामुळे गाण्यांची (की काव्य तुकड्यांची) संख्या ७१ वर गेली.
एका सिनेमात १८ गाणी
आलमआरा प्रदर्शित झाला त्याचवर्षी कृष्णा फिल्मचा घर की लक्ष्मी आणि मदान थिएटरचा शीरीं फरहाद हे बोलपट आले. शीरीं फरहाद मध्ये चक्क १८ गाणी होती.
पहिले-वहिले गाणे
भारतात कथात्मक चित्नपटांची सुरुवात १९१३ साली दादासाहेब फाळकेंच्या राजा हरिश्चंद्रने झाली. अर्देसीर इराणींचा आलमआरा १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झाला आणि बोलपटांचे युग सुरू झाले आणि अर्थातच चित्नपटातील गाण्यांचेही.
आलमआरामध्ये एकूण सात गाणी होती. त्यातील डब्ल्यू.एम. खान यांनी गायलेले दे दे खुदा के नाम प्यारे. ताकत है गर देने की हे भारतीय चित्नपटसृष्टीतील पहिले गाणे मानले जाते.
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि
संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)