self esteem | हवी आत्मश्रध्दा 
हवी आत्मश्रध्दा 

- सत्येंद्र राठी-  

‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे...’ ही उक्ती सर्वश्रुत आहेच, याचा साधा सोपा अर्थ एवढाच की मनाचे करायच्या आधी जनांच्या मतांचाही विचार करावा... एका मर्यादेत ही उक्ती उपायकरक ठरतही असेल पण नेहमीच जनांचे ऐकणे हितकारक ठरते असे होत नाही. कारण आपल्याला सल्ला देणाऱ्या लोकांना आपली कुवत, आवड, क्षमता कळत असेलच असे हमीपूर्वक सांगता येणार नाही आणि मग त्यांच्या नको त्या सल्ल्यामुळे मानसिक गोंधळ उडतो आणि आपले लक्ष्यापर्यंत पोहोचायचे राहून जाते.
या उलट कधी कधी अशा मंडळींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे घवघवीत यश मिळवलेली माणसंही दिसून येतात. एका रानात बेडकांची टोळी उनाडक्या मारत इकडं तिकडं भटकत होती. दंगा करण्याच्या नादात काही बेडकं एक कोरड्या विहिरीत पडली, लगोलग त्यांनी वरती येण्याचे प्रयत्न सुरू केले. पण या प्रयत्नात ती खाली पडत, विहिरीत विखुरलेले काचेचे तुकडे, काटेरी झुडुपं, अणकुचीदार दगडं यामुळे त्यांच्या प्रयत्नांना खिळ बसत होती. वर चढताना पुन्हा पुन्हा पडत असल्यामुळे ती रक्तबंबाळ होत होती, त्यांना काही केल्या वर येणं काही जमेना.
हे बघून विहिरीच्या कठड्यावर असलेल्या बेडकांनी ओरडायला सुरुवात केली, ‘तुम्ही वर येण्याचा नाद सोडा, ते शक्य दिसत नाही, एकूण स्थिती पाहता तुमचं मरणं अटळ दिसत आहे. मग मरण्याआधी स्वत:ला का यातना करून घेताय?’ हा वडिलकीचा सल्ला ऐकून खालच्या बेडकांनी कच खात वर येण्याचे प्रयत्न थांबवले. पण एक बेडूक मात्र प्रयत्नपूर्वक वर येत राहिला, जायबंदी असूनही तो फांद्यांचा, खाचांचा आधार घेत शेवटी वर पोहोचलाच. वर येऊन वरच्यांचा आभार मानत तो  म्हणाला, ‘मला थोडं कमी ऐकू येतं पण ज्या पद्धतीने तुम्ही ओरडून माझा उत्साह वाढवत होता त्यामुळेच मला वर येणे शक्य झाले...’ जगात अशी बरीच उदाहरणं दिसून येतील की ज्यांनी लोकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच ते स्वत:चे उद्देश गाठू शकले. अनावश्यक सल्ले किंवा चुकीच्या लोकांकडून घेतलेले मार्गदर्शनाने  बºयाचदा संभ्रम निर्माण होतो, जे आपल्या यशोगाथेस बाधक ठरते. ही मंडळी कधी-कधी नको ती भीती घालून आपल्यातील उर्मी संपवून टाकतात, या उलट कधी कधी ‘तुला जमणार नाही’ अशा नकारात्मक वक्तव्याने पेटून उठत काही लोकं इतिहास घडवतात, अशी आव्हानं झेलणे बऱ्याचदा पथ्यावर पडते.
प्रख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्टने प्रवेश नाकारला. त्यांनी प्रवेशासाठी नमुन्यादाखल पाठविलेले चित्र पुरेसे गुण मिळवण्यास पात्र नाही, असे कारण देत, वर ‘दुसरं काही बघा!’ अशी उफराटी सूचनाही केली. पण दुसरं काही न करता त्यांनी आपला सराव चालू ठेवला, आणि काही काळातच ते राजकीय व्यंगचित्रकार म्हणून नावरूपास आले. पुढं त्याच स्कूलमध्ये त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले तेव्हा त्यांनी तेथील अधिष्ठात्यांचे आभार मानले. ते म्हणाले ‘चांगले झाले मला इथं प्रवेश नाही मिळाला, अन्यथा जाहिराती बनविण्याच्या नादात समाजातील विसंगती वेचणारा माझ्यातील व्यंगचित्रकार मेला असता.’
एवढ्या मोठ्या संस्थेच्या नकारानंतर ही त्यांनी स्वत:च्या कामाबद्दलची श्रद्धा ढळू दिली नाही. त्याकडे दुर्लक्ष करून आपले सायास चालूच ठेवले आणि जगमान्य ठरले. आपल्याला नेमके काय कारायचे आहे? ध्येय काय आहे? आपला स्वभाव व स्थिती त्याला पूरक आहे का ? नसेल तर आपण हवे ते बदल घडवू शकू का? आपला आत्मविश्वास काय म्हणतो? इत्यादींची चाचपणी करून स्वत: ला झोकून देणाºया मंडळीपुढे इतरांचे बोल म्हणजे ‘शब्द बापुडे केवळ वारा’ इतकाच राहतो. 
 (लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत)


Web Title: self esteem
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.