संत नामदेवांचे घुमान
By Admin | Updated: July 12, 2014 14:51 IST2014-07-12T14:51:10+5:302014-07-12T14:51:10+5:30
अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ म्हणून निवड झाल्यामुळे पंजाबमधील ‘घुमान’ हे गाव चर्चेत आहे. संत नामदेवांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या गावाच्या विकासासाठी व महाराष्ट्राबरोबरचे त्याचे नाते अधिक दृढ करण्यासाठी गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ झटणार्या संस्थेच्या संस्थापकाने घेतलेला हा मागोवा..

संत नामदेवांचे घुमान
संजय नहार
दहशतवाद पंजाबमध्ये जोर धरू लागलेला असताना महाराष्ट्रातून ‘वंदे मातरम्’ संघटनेच्या माध्यमातून आम्ही काही तरुण १९८६ मध्ये पंजाबला शांतता पदयात्रेसाठी गेलो होतो. जर्नेलसिंग भिंद्रानवालेंच्या प्रभावाखालील मेहता चौक गुरुद्वारा भागात वातावरण अतिशय दहशतग्रस्त होते. रस्त्यावरून चालतानाही लोकांच्या मनातील रागाची आणि द्वेषाची जाणीव होत होती; पण या गावापासून केवळ ८ किमी अंतरावर असलेल्या ‘घुमान’मध्ये मात्र दहशतवादाच्या खाणाखुणाही आढळत नव्हत्या. सर्वत्र शीख स्वरूप असलेल्या संत नामदेवांचे फोटो आणि केवळ ‘महाराष्ट्रातून आलो आहे’ म्हटल्यावर पायांवर डोके ठेवणारे लोक भेटले. एकीकडे पंजाबच्या अन्य अनेक भागांत दहशतवादाने थैमान घातले होते, दुसरीकडे पाकिस्तान सीमेवरील गुरुदासपूर जिल्ह्यातील या गावात एकही तरुण मुलगा दहशतवादाकडे वळला नव्हता. या गावात हिंसाचार अथवा दहशतवादाचे लोण पोहोचले नाही, याचे कारण म्हणजे तेथील संत नामदेवांना मानणारा व त्यांचा प्रभाव असलेला वर्ग असल्याचे कळले आणि एका मराठी संताचा तेथील अद्भुत परिणाम पाहून आमचा अभिमान दुणावला. संत नामदेवांना पंजाबी लोक श्रद्धेने ‘बाबा नामदेव’ म्हणतात. त्यांच्या या घुमानची महतीच वेगळी आहे.
पुण्याहून झेलम एक्स्प्रेसने पंजाबात जालंधर स्टेशनवर उतरले अथवा मुंबई किंवा नांदेडहून अमृतसरला जाताना ‘बियास’ या ‘राधास्वामी संत्संग’साठी प्रसिद्ध असलेल्या गावात उतरले, की तेथून २२ किमी अंतरावर घुमान गाव आहे. दिल्लीहून अमृतसरला जाणारी अमृतसर शताब्दी एक्स्प्रेसही बियासला थांबते. महाराष्ट्रातून २१पेक्षा अधिक ठिकाणांहून पंजाबकडे जाणार्या रेल्वेगाड्या जालंधर किंवा बियासला थांबतात. विमानाने अमृतसरला जाता येते. तेथून घुमानचे अंतर ५२ किलोमीटर आहे. भू-मार्गाने जालंधरहून हरगोविंदपूरकडे जाताना वाटेत हे गाव लागते. संत नामदेवांचा जन्म महाराष्ट्रातील नरसी येथे कार्तिक शुद्ध ११ शके ११९२ (इ. स. १२७0) या दिवशी झाल्याचे मानले जाते. लहानपणापासून विठ्ठलभक्तीचे संस्कार असणार्या नामदेवांनी सर्वत्र फिरून भागवत धर्माचा प्रसार केला. ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात ते महाराष्ट्र सोडून, उत्तरेकडून दिल्लीमार्गे पंजाबला गेले. त्यांनी तेथे दीर्घकाळ, म्हणजे अनेक वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केले, असा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. याच काळात त्यांनी अन्याय आणि अत्याचाराला विरोध करतानाच सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक ऐक्याचा पुरस्कार केला. शेकडो अभंग लिहिले, या अभंगांवर हिंदी, फारसी आणि बोलीभाषेचा प्रभाव जाणवतो.
संत नामदेवांच्या घुमानमधील वास्तव्याच्या अनेक कथा आजही प्रचलित आहेत. घुमानजवळच्या भट्टीपाल या गावी पाण्याची टंचाई असल्याने त्यांनी विहीर खोदली, ती आजही तिथे आहे. संत नामदेव तिथे लोकांना त्यांच्या कामात मदतही करत. कोणा शेतकर्यांच्या पिकाच्या कापणीला ते जात, तर कधी पेरणीसाठी मदत करत.
घुमान गावच्या निर्मितीबद्दलही एक कथा प्रचलित आहे. सतलज नदीच्या पलीकडील तीरावर धराचे नावाचे गाव होते. एकदा तिथे भयंकर दुष्काळ पडला. तिथल्या घुमान गावाच्या जाट लोकांना जंगलात वास्तव्यास आलेले संत नामदेव या जमिनीचे मालक वाटले. त्यांनी तिथे राहण्याची परवानगी मागितली आणि नामदेवांनीही त्यांना निर्भयपणे राहण्यास सांगितले. ते राहिले आणि रमले. त्यांच्या जातीच्या नावावरून या गावाला ‘घुमान’ नाव पडले. जेथे नामदेव तप करीत त्याला ‘तपियाना’ म्हणतात. तिथे आजही ‘तपियानासाहिब’ नावाने मोठा गुरुद्वारा दिमाखाने उभा आहे. शिखांमध्ये मूर्तीपूजा वज्र्य आहे. मात्र, घुमान गावातील मुख्य गुरुद्वाराची रचना मंदिर, मशीद व गुरुद्वारा यांचे एकत्रित स्वरूप असलेली आहे. महमंद तुघलकाच्या काळात त्यांच्या अत्याचाराविरोधात नामदेवांनी जनजागृती केली आणि तुघलकाच्या लोकांनी नामदेवांनाही त्रास दिला. त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुघलकाचा नातू फिरोज तुघलक याने ही समाधी सन्मानाने बांधल्याचेही उल्लेख आहेत.
हे मंदिर आणि गुरुद्वारा इ. स. १७७0मध्ये सरदार जस्सासिंह रामगढिया यांनी बांधला अथवा नूतनीकरण केले, असे प्रसिद्ध लेखक भाईसाहब कानसिंह नाथा यांनी त्यांच्या कोशात म्हटले आहे. या स्मृतिमंदिर संदर्भातील माहिती शिखांच्या ‘गुरुविलास’ व इतर ग्रंथांतही आढळते. शिखांचे सहावे गुरू हरगोविंदजींनीही या मंदिराला भेट दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
शीख धर्माच्या स्थापनेवरही नामदेवांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. किंबहुना शिखांमधील देव ही परंपरा नामदेवांमुळे सुरू झाल्याचे म्हटले जाते. धारकरी आणि वारकरी ही दोन्ही राज्यांची मुख्य वैशिष्ट्ये आजही मानली जातात. मुख्यत: कर्मकांडाविरुद्ध जागृती करणारी प्रभुभक्तीची त्यांची ६१ पद्ये ‘ग्रंथसाहिब’मध्ये समाविष्ट असल्याने देशभर संत नामदेवांना मानणार्या अनुयायांचा एक मोठा वर्ग आहे.
अशा या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या घुमान गावाची लोकसंख्या २६000 हून अधिक आहे. घुमान गावात भाविकांच्या वाढू लागलेल्या संख्येमुळे आणि ‘सरहद’ संस्थेच्या पाठपुराव्यामुळे पाच वर्षांपूर्वी अर्थसंकल्पामध्ये रेल्वेची तरतूद करण्यात आली असून, मार्च २0१७ पर्यंत घुमानपासून एक किलोमीटर अंतरावरील कादियाना गावात रेल्वे स्टेशन बनणे अपेक्षित आहे. ‘सरहद’ संस्थेने या गावाच्या नियोजनबद्ध विकासासाठी प्रारंभापासून पुढाकार घेतला असून, १९९३, १९९७, २000, २00८, २0१0, २0११ मध्ये सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठपुराव्याने पंजाबच्या प्रमुख नेत्यांनी हे गाव राष्ट्रीय तीर्थक्षेत्र घोषित करण्यासाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्र सरकार आणि पर्यटन मंत्रालयानेही यात पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र फारसे काही घडले नाही.
महाराष्ट्राशी भावनिक नाते असणार्या पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील बटाला तालुक्यातील या गावासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान सडक योजनेतून रस्ते करण्यात आले. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचीही भेट घेऊन शिंदे यांनी त्याचा पाठपुरावा केला. काकासाहेब गाडगीळ यांची परंपरा राज्यपाल शिवराज पाटील हे मात्र पुढे नेऊ शकले नाहीत. काकासाहेब गाडगीळ यांचेही नाव महाराष्ट्र आणि पंजाब यांना जोडणारे संत नामदेव, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शिवराम हरी राजगुरू यांच्यासारखाच दुवा म्हणून आदराने घेतले जाते. शिवराज पाटील यांच्या कारकिर्दीत तसे विशेष काहीच घडले नाही.
वैष्णोदेवी, अमरनाथ आणि काश्मीरला प्रतिवर्षी चार लाखांहून अधिक भाविक आणि पर्यटक महाराष्ट्रातून भेट देतात. घुमानपासून जम्मू केवळ साडेतीन तासांच्या अंतरावर आहे. यंदाच्या वर्षी आतापर्यंत साठ हजारांहून अधिक भाविकांनी घुमानला भेट दिली आहे. दहा वर्षांपूर्वी या गावात पाचशेपेक्षा अधिक भाविक जात नव्हते. ती संख्या दिवसेंदिवस लक्षणीय प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्राचे भावनिक नाते असणार्या घुमानकडे वाढणारा भाविकांचा ओघ लक्षात घेऊन घुमान ग्रामपंचायत व गुरुद्वारा समितीच्या वतीने रस्ते, यात्री भवन, बाग, शाळा, कॉलेज उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून, ‘सरहद’ संस्था नियोजनाचे आणि समन्वयाचे काम करीत आहे.
महाराष्ट्रातील भाविकांनी वैष्णोदेवी, काश्मीर अथवा अमरनाथचे नियोजन करताना आता घुमानलाही भेट द्यावी. केवळ दर्शन म्हणून तर आहेच; पण पर्यटनाच्या दृष्टीनेही घुमान एक रमणीय ठिकाण होऊ पाहत आहे. महाराष्ट्र आणि पंजाबचे नाते अधिक दृढ करणार्या घुमानला ‘राष्ट्रीय तीर्थक्षेत्र’ घोषित करण्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासाठी यापूर्वीही पंजाब सरकारशी पत्रव्यवहार केला आहे आणि आताही यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले आहे. त्यांच्या कामाचा आवाका पाहता आणि प्रभाव पाहता त्यांच्या पाठपुराव्यामुळे जर हे प्रत्यक्षात उतरले, तर ज्याप्रमाणे नांदेड हे शिखांसाठी तीर्थक्षेत्र आहे, तसेच ‘घुमान’ हे अल्पावधीत मराठी माणसासाठी नांदेड झाल्याशिवाय राहणार नाही.
(लेखक सामाजिक कार्यकर्ते व ‘सरहद’ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)