दंगल
By Admin | Updated: December 31, 2016 13:09 IST2016-12-31T13:03:46+5:302016-12-31T13:09:02+5:30
हरयाणातल्या बलाली गावातल्या घरी अंगणातल्या खाटेवर हुक्का पितापिता महावीरसिंग फोगट ‘लोकमत’ला सांगत होते, ‘मेरा बस इतणाही कहणा था, की लडकी अगर प्रधानमंत्री बण सकती है, डाक्टर बण सकती है, तो कुश्ती क्यूं नही लड सकती?’

दंगल
- सचिन जवळकोटे
मुली जन्मालाच येऊ नयेत म्हणून त्यांना गर्भातच खुडून टाकण्यात माहीर लोकांचा बेरहम दणकट प्रदेश.. हरियाणा.
तिथल्या एका कोपऱ्यातल्या गावातला मल्ल चारचार पोरी जन्माला घालतो, वरून भावाच्या दोन दत्तक घेतो, या सहा जणींना थेट कुस्तीच्या आखाड्यात उतरवून घुमत्या नौजवान पोरांबरोबर त्यांची ‘दंगल’ लावतो आणि ‘गोल्ड मेडल आणलंत तरच तुमची खैर, रिकाम्या हाताने घरी परताल, तर काठीने फोडून काढीन’ असा दम भरून पोरींना घाम गाळायला लावतो, हे सगळं भैताडच.
महावीरसिंग फोगट त्या मल्लाचं नाव.
आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट करणाऱ्या गीता फोगट आणि बबिताकुमारी या त्याच्या पोरी.
सुरुवात कशी झाली, हे आठवताना गीता सांगते,
‘एक दिन बडी सुबह पापाने हमे जगाया और पुछा, कितनी दूरीतक दौड सकते हो? चलो, दौड लगाते है..’
- दिवसही धड फुटला नव्हता.
दहा वर्षांची गीता आणि आठ वर्षांची बबिता.
दोघी पोरी डोळे चोळत, आपापसात खुसखुसत बापाच्या मागे शेतात निघाल्या...
आणि इशारा झाल्यावर जीव खाऊन पळत सुटल्या. ...आपल्या पळत्या पावलांखालच्या वाटेला अंत नसणार आहे, हे कळण्याचं वय नव्हतं त्यांचं.
‘बहोत मजा आया... फिर रोज हम दौड लगाने लगे’ - गीता सांगते.
महावीर ताऊंची नजर पक्की होती. त्यांनी पोरींचं पाणी जोखलं आणि आठव्या दिवशी घराशेजारच्या शेतात नवा आखाडा खणायला घेतला.
माती उपसली. वर एक पत्र्याचं छप्पर टाकलं.
दंगल सुरू झाली...
गीता आणि बबिता रोज नेमाने आखाड्यात घुमू लागल्या.
आजा-पणजाने बापाला शिकवलेले कुस्तीतले पेच अंगात मुरवू लागल्या.
कुस्ती करायची म्हणजे अडचणी दोन. बायकांचे कपडे आणि केस.
बापाने पोरींसाठी गुडघ्यापर्यंत येतील आणि अंगालगत बसतील अशा घट्ट चड्ड्या शिवून घेतल्या आणि दोघींचे केस पार मानेच्या वर कापून घेतले.
अशा अवतारात पोरी पळायला जात. चारचौघांदेखत दोरीच्या उड्या मारत.
गावात कुजबुज होतीच. बघता बघता रान पेटलं.
महावीरसिंगांना विरोध वाढू लागला.
कधी समोरासमोर, कधी आडून प्रश्न विचारले जाऊ लागले.
‘शरम नही आत्ती तुझे? लडकीसे दंगल लडवायेगा? उन्हे लंगोट पहनायेगा? बेशरम है क्या?’
- पण ना पोरी मागे हटल्या, ना त्यांचा बाप!
(लेखक लोकमतच्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)