आमचे पोट्टे असले गुंडे, त्यांचे तिन्ही लोकी झेंडे !
By अतुल कुलकर्णी | Updated: November 9, 2025 13:38 IST2025-11-09T13:37:00+5:302025-11-09T13:38:08+5:30
आजचे नेते, "सगळ्या गोष्टी सरकारला कशा मागता? तुम्ही पण जरा हात-पाय हलवा ना..." असा प्रेमळ, पण दादागिरीचा सल्ला जनतेला देतात. त्याच नेत्याचा पोरगा अत्यंत धाडसीपणे १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत घेत असेल तर तोच बाप आपल्या पोराने "चुकीचे काही करू नये असे आपण आधीच सांगितले होते"

आमचे पोट्टे असले गुंडे, त्यांचे तिन्ही लोकी झेंडे !
-अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)
मिस्टर अब्राहम लिंकन नमस्कार.
कधीकाळी तुम्ही तुमच्या पोरासाठी गुरुजील पत्र लिहिले होते. "सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ, हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र, त्याला हेदेखील शिकवा की जगात प्रत्येक बदमाषागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी असतात जगात, तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही. असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही..." असा अनुवाद आमच्या वसंत बापट यांनी मराठीत केला होता.
मिस्टर लिंकन, आता काळ बदलला. तुमच्या पत्राचा आम्हाला काही उपयोग नाही. आता न्यायप्रिय, सत्यनिष्ठ, साधुचरित, पुरुषोत्तम, समर्पित आयुष्य... हे शब्द बिनकामाचे आहेत. आता आम्हाला फार वेगाने पुढे जायचे आहे. राज्याची इकॉनोमी तीन ट्रिलियन डॉलर करायची आहे. त्यासाठी आम्हाला दिसेल ती जमीन मोठ्या प्रमाणावर विकत घ्यावी लागणार आहे. कधी प्रेमाने, कधी बळाने, कधी गांधीजींचे फोटो देऊन... "जेवढ्या जमिनी जास्त तेवढा वेगवान विकास" हे आम्हाला कायम लक्षात ठेवावे लागेल. म्हणूनच आजचे नेते, "सगळ्या गोष्टी सरकारला कशा मागता? तुम्ही पण जरा हात-पाय हलवा ना..." असा प्रेमळ, पण दादागिरीचा सल्ला जनतेला देतात. त्याच नेत्याचा पोरगा अत्यंत धाडसीपणे १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत घेत असेल तर तोच बाप आपल्या पोराने "चुकीचे काही करू नये असे आपण आधीच सांगितले होते" असे म्हणत त्याच्या कर्तृत्वाला दाद देतो. मीडियावाले फार आगाऊ आहेत. निष्कारण साप म्हणून भुई थोपटण्याचे काम करतात. अशा विषयांची फार बोंबाबोंब झाली, तर जमीन खरेदीचा व्यवहारच रद्द केला आहे, असे सांगणारे नेते आमच्याकडे आहेत. म्हणूनच म्हणतो मिस्टर लिंकन, अशी फिरवाफिरवी आजच्या पिढीला शिकविण्याची गरज असताना तुम्ही कसले धडे शिकवण्याचा आग्रह धरला होता?
मिस्टर लिंकन, तुमच्या पत्रात तुम्ही, "मला माहीत आहे, सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत... तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा, घाम गाळून कमावलेला एकच छदाम आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे," असे लिहिले होते, पण नेत्यांची पोरं एसी घरात राहतात. एसी गाड्यात फिरतात. मग त्यांना घाम कसा येणार? घाम आला नाही तर त्यांनी कमवायचे
कसे..? त्यामुळे तुमचा हा मुद्दाही आता गैरलागू आहे. त्यापेक्षा नेत्यांची पोरं कोणते कायदे, कसे वाकवायचे याचा अचूक अभ्यास करून कोट्यवधी रुपयांचा कर वाचवतात...
त्यासाठी तुम्ही त्यांना शिकवणाऱ्या बापाचे कौतुक करायला हवे!