शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

संधी आणि संकटं

By admin | Updated: January 9, 2016 14:41 IST

साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर रंगणा:या वाद-विवादांपासून दूर स्वत:च्या मना-प्रेरणांच्या कल्लोळाशी झगडत गुंतागुंतीच्या समकालातून आपली वाट शोधणा:या तीन तरुण लेखकांशी संवाद.

मुलाखती आणि शब्दांकन - सोनाली नवांगुळ
 
बदलत्या काळाने लेखक-कवी-विचारवंतांच्या सजर्नशक्तीला खुलं अवकाश दिलं, तसे त्यांच्यासमोर नवे पेचही उभे केले आहेत. एक लेखक म्हणून या समकालीन गुंतागुंतीशी तुमचं काय नातं आहे?
 
 गणेश विसपुते 
 
एकविसाव्या शतकाच्या दुस:या शतकात येईतो काळ फार गुंतागुंतीचा झाला आहे. आपण प्रत्येकजण अहोरात्र तंत्रज्ञानाधारित असंख्य यंत्रउपकरणांनी वेढलो गेलो आहोत. गेल्या दोन दशकात या प्रगतीचा वेग अतोनात वाढला आहे आणि आपलं त्यावरचं अवलंबित्वसुद्धा. माहितीची सहज उपलब्धता, तिचं लोकशाहीकरण झालं आहे. ज्ञानाकडे जाणारे हे मार्ग फारसे गांभीर्याने वापरले जात नसले तरीही प्रशस्त झाले आहेत. संगणक किंवा कॅमेरा हाती आलेल्या प्रत्येकाला आपण लेखक किंवा छायाचित्रकार वा फिल्ममेकर आहोत याचा कृतक का असेना आभास करून दिलेला आहे. त्यातून चांगल्या अर्थानं सजर्नाच्या शक्यताही वाढलेल्या आहेत. विशिष्ट व्यक्तीकडे ध्वनिक्षेपक असायचा तो काळ मागे पडून आता नायक बदलले आहेत. त्यामुळे जगभर हे चित्र पालटत असताना कोलाहल निर्माण होत असून, त्यामुळे अंतिम एकच उत्तर, एकच अंतिम विधान असण्याची शक्यता उरलेली नाही. हे म्हणणं बरंच उत्तराधुनिक वाटू शकेल, पण मग यात मिळणारं स्वातंत्र्य हे अटीवर मिळालेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. धार्मिक, वांशिक विद्वेषातून आलेली हिंसा, गरिबी, भूक, लिंगाधारित विषमता, नफेखोरी, युद्धखोरी या गोष्टींना ठाम नकार देत या काळात लिहित राहणं गरजेचं आहे. 
 
 वीरा राठोड 
 
कवी अरुण काळे यांची एक कविता आठवते, ‘मल्टि लुटालुटीचा ङिांगङिांग लापालापा’- ती अगदी चपखल आहे आजच्या काळासाठी. हा काळ चंगळवादी, सुखलोलूप माणसांचा नि विचारांचा आहे. चेह:यावर मुखवटा धारण केलेली माणसं पाहताना अधिक असुरक्षित झालेला समाज मी बघतो आहे. व्यवस्था माणसं गिळंकृत करते. त्यांचा चेहरा हरवून टाकते. भ्रष्टाचार आणि सगळं ओरबाडून घेण्याच्या वृत्तीमुळं विश्वास हरवलाय. माणसं आपापल्या कोशात जगू लागली आहेत, हे साहित्यिकासाठी फारच मोठं आव्हान आहे आणि ते पेलण्याची क्षमता अपवादानेही दिसत नाही. 
 लेखकाची कलाकृती ही ज्या त्या काळाचं अपत्य असते. गांभीर्यानं, जाणीवपूर्वक आणि अर्थातच संवेदनशीलपणो या कालव्यवहाराकडे पाहू शकणा:यासाठी हा काळ फार महत्त्वाचा आहे. जागतिकीकरणाचे, साधनसंपत्तीच्या दुर्मीळ होत जाण्याचे, चंगळवादाचे, कुटुंबव्यवस्था खिळखिळी होण्याचे असे जुन्या प्रश्नात नवे ढीग लागले आहेत. 
नव्या पिढीला नवीन स्वीकारता येईना नि मागचं बाजूला सारता येईना. संक्रमण अवस्था आहे. काळानं खूप काही विषय दिलेत, पण त्याला निर्भीडपणो सामोरं जाऊन, आकळून, व्यवस्था आपल्याला टारगेट करेल याचं भय न बाळगता परखड भाष्य करेल तो तगेल आणि तगवेलही. सावध राहून पुढच्या हाका ऐकण्याचा हा काळ आहे. रंजनप्रधान लिहिणा:यांना ही सुगी आहे आणि भंजनासाठी लिहिणा:यांना संघर्ष! लेखक हा काळाचं होकायंत्र असतो, त्यानं वाटय़ाला येईल त्या कुठल्याही परिस्थितीत दिशा चुकवता कामा नये.
 
 मनस्विनी लता रवींद्र
 
 प्रत्येक गोष्टीसाठी असंख्य पर्याय हा आजच्या काळाचा स्वभाव सोय देतो आणि फार ताणही आणतो. सगळीकडून होणा:या माहितीच्या मा:याने गांगरून जायला होतं. अमुक माहिती नसल्याच्या ताणातून सुटका म्हणून मग वरवर सगळंच नुसतंच चाळणं होतं. खोलात जाऊन एकतरी गोष्ट माहिती करून घ्यावी हे होत नाही. माझं काम टेलिव्हिजनशीसुद्धा संबंधित आहे. तिथं वेगळं सुचत असलेलं सगळं बाजूला ठेवून ‘वारा’ काय आहे त्या पद्धतीनं लिहावं लागतं. अशावेळी लेखनावर पोट चालवणा:यांचा कोंडमारा होतो. रोजच्या रोज अमुक इतकं लिहिण्याची सक्ती असते. त्यावेळी दुसरं काही सुचलं तरी प्राधान्यक्र माचा विचार करून ते बाजूला सारावं लागतं. आपली एकाग्रता टिकवून काम करत राहणं हे या काळाचं खरं आव्हान आहे.
 
 
समाजमाध्यमांनी खुल्या केलेल्या संपर्काच्या-व्हच्यरुअल अनुभवांच्या शक्यता, सहज उपलब्ध होणारं माहितीचं भांडार ही एकीकडे लेखकाची नवी आयुधं आहेत. मात्र त्याचवेळी या सा:याच्या अतिवापरानं मनाला शून्यता येते, एक विचित्र त:हेचा ताण व थकवा येतो. त्याबद्दलची चर्चाही सुरू झाली आहे. या कोलाहलातून तुम्ही कसा मार्ग काढता?
 
 गणोश विसपुते 
इंटरनेट आणि सॉफ्टवेअर तंत्रज्ञानानं माहिती आणि तंत्रज्ञानात विराट क्रांतीच केली आहे. ई-पुस्तकांनी ख:या  अर्थाने पुस्तकांचं लोकशाहीकरण केलं. चोरी, गहाळ होणं, खराब होणं या गोष्टी बाद झाल्या. जागेची अडचण मिटवली. जगभरातली अभिजात पुस्तकं इंटरनेटवर सहज उपलब्ध होऊ लागल्यामुळं वाचकांची मोठीच सोय झाली. 
 परंतु, प्रत्येक सोयीमध्ये काही दोषही असतात. माहितीच्या समुद्रात सगळीच काही रत्नं सापडत नाहीत, कचराही असतो. शिस्तीनं त्याचं व्यवस्थापन करणंही जिकिरीचं, बधिर करणारं असू शकतं.  
माहितीच्या एवढय़ा साठय़ाचं, मिळवलेल्या खजिन्याचं आणि ते सगळं वापरू न शकल्याचंही मोठं दडपण येऊन वैफल्याची सावज झालेली अनेक उदाहरणं आपल्याला आसपास आता दिसू शकतात.
अंतिमत: तंत्रज्ञानाचा वापर तुम्हाला कशासाठी करायचा आहे याचं भान असणं गरजेचं आहे. 
वाचक म्हणून आपली वाढ होताना जसे आपण हळूहळू सिलेक्टिव्ह होत जातो, काय वाचायचं नाही हे आपल्याला कळतं, तशाच प्रकारे इंटरनेटच्या महासागरात मला काय शोधायचं आहे ते मिळतं का? आणि मिळत नसेल तर बुडण्यासाठी मी तिथं क्षणभरही थांबणार नाही असा कणखरपणा तुमच्याजवळ हवा. एवढय़ा साधन उपलब्धतेमुळे आता पुस्तकांचा आणि ग्रंथालयांचा अंत झाला आहे अशी घोषणा करायची घाई करू नये. सोळाव्या शतकापासून तंत्रज्ञान निर्माण होत गेलं ते विवेकाच्या कौतुकाच्या नादात, विवेकाला लहान करून. तत्त्वज्ञानाचं महत्त्व कमी करून नफाकेंद्री, लढाईकेंद्री राक्षसी महत्त्वाकांक्षेसाठी तंत्रज्ञान निर्माण होत गेलं. ज्ञानप्रसारानंतर आलेल्या विज्ञानाची जागा पहिल्या महायुद्धापर्यंत तंत्रज्ञानानं घेतली. त्यालाच टेक्नॉलॉजिकल रॅशनॅलिटी असं म्हटलं गेलं. आजच्या तंत्रज्ञानाच्या तथाकथित प्रगतीमागच्या इतिहासाचा मला समकालाशी अन्वय लावता यायला हवा. कारण लेखकाच्या दृष्टीनं मानवाचं हित आणि त्याचं कल्याण हेच प्राथमिक असायला हवं. 
 
 वीरा राठोड
 
भान न ठेवून केलेली कुठलीही गोष्ट व्यसनाकडेच जाते. इंटरनेटचा अतिरेकी वापर होतो हे खरं. किती वेळ कोणत्या गोष्टींकरता द्यायचा हा निर्णय आपणच घ्यायला हवा. ज्या गोष्टीपर्यंत आपण रोजच्या दिनक्रमात सहजगत्या पोचू शकत नाही त्या आपल्यार्पयत आणून पोहोचवणारी ही सामाजिक माध्यमं आहेत. तुम्ही स्वत:ला नेमकं काय हवंय यावर फोकस करू शकत नसाल तर भ्रमनिरास होणार आहेच. या माध्यमातलं नवं लेखन, चर्चा याकडे मी ओढला जातो, पण सरसकट प्रतिक्रिया देत नाही. ही ‘निवड क्षमता’ येतेच, यायला हवी.
 मनस्विनी लता रवींद्र
 
प्रत्येक काळामध्ये खूप मोजकी माणसं अशी असतात जी महत्त्वाचं, मोठं काही करून ठेवतात. ती त्या काळाचं प्रतिनिधित्व स्वत:च्या कलाकृतीतून करतात, जे नंतर कालातीत होतं. तुमची भाषा, तुमचा प्रदेश, तुमचे म्हणून वैशिष्टय़पूर्ण कपडेलत्ते, खाणंपिणं याच्यातील फरक आता पुसले जाताहेत. मर्यादा पुसल्या जाताहेत. भारतात आणि मेक्सिकोतही एकाच त:हेचे कपडे आपण बघतो आहोत. संस्कृतींची वैशिष्टय़पूर्णता सपाट होते आहे. 
यातून जी नवी संस्कृती तयार होतेय त्यावर भाष्य करणारं कुठंतरी काहीतरी निर्माण होत असणार आहे. दुस:या महायुद्धातल्या भीषण संहारानंतर जो भकासपणा, निराशा आली त्यातून लोक लिहिते झाले होते. एक नवा फॉर्म, नवी भाषा, नवी समजूत त्यांना सापडली होती. तुम्ही त्याला अस्तित्ववाद किंवा अॅब्सर्डिजम काहीही म्हणा. आपण वाट बघूया.. सध्याच्या काळाच्या कॉन्फ्लिक्टमधूनही काहीतरी निराळं हाती लागेल कदाचित. या सगळ्या धुमसण्याचं रूपांतर कशाततरी होईलच.
 
 
पूर्वीची लेखकीय वाटचाल साधारणपणो एकरेषीय होती. लिहिणं, पुस्तकाचं प्रकाशन, प्रसिद्धी, बरंवाईट स्वागत, पुरस्कार-सत्कार, अगर टीका आणि दुर्लक्ष. आता संकेतस्थळं, ई-बुक्स, सेल्फ पब्लिशिंग, ऑडिओ पुस्तकांसारखे प्रयोग यामुळे लेखकाला अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या व्यावसायिक शक्यता लेखकाच्या प्रतिभेचं बळ ठरतात की अडसर?
 गणोश विसपुते
 
सामाजिक माध्यमात लोकशाहीकरण आहे त्याप्रमाणो अपार संधीही आहेत. ब्लॉग्ज, ई-मॅगङिान्स, ई-बुक्सनी मोठी क्रांती केली आहे. हे साहित्य दर्जेदारही दिसतं आहे.  साधनं मिळवण्याच्या पद्धती सुलभ व वेगवान आहेत. तरीही अंतिमत: स्वत:ची मोहर असलेला शब्द आणि वाक्य लिहिणं लेखकासमोरचं आव्हान असतंच आणि त्यासाठीची रसद जगण्यातून, भोवतालच्या हवेतून, दृश्य-अदृश्य जगातल्या अनुभवांतून मिळवावी लागते. त्याला इलाज नाही.
 वीरा राठोड
 
मी या बदलाचा सकारात्मक विचार करतो. काळाची हाक ऐकून बरोबर जाता आलं पाहिजे. एकभाषीय वा्मयीन संस्कृतीला छेद जाऊन भारतातल्या विविध संस्कृतीतले लोक समाजमाध्यमांमुळेच निकट आले, संवाद करू लागले, प्रगल्भ होऊ लागले हे दिसतं आहे. व्यक्त होणारा त्याच्या मातृभाषेतून, प्रादेशिक भाषेतून, राष्ट्रभाषेतून आणि जागतिक भाषेतूनही व्यक्त होतो. एकभाषीयतेची रेषा पुसट होत जाऊन आकाराला येऊ लागलेलं हे बहुभाषिक पर्यावरण लोभस आहे. आज भारतातल्या किंवा जगातल्या कुठल्याही लेखकाच्या सोशल वॉलवर जायला मला कुणाची मध्यस्थी लागत नाही. त्यांच्या लेखनातून मी अधिक मोकळा होतो, आश्वस्त होतो व माझा शब्द आत्मविश्वासाने लिहितो. याअर्थी सोशल मीडिया ही वैश्विक कार्यशाळा आहे. भाषा, संस्कृती, त्यातले निरनिराळे प्रवाह, राजकीय भान अशी विचारांची घुसळण इथे होते. अशा सामाजिक माध्यमांमागचं भांडवली अर्थकारण लक्षात घेऊनही मला असं वाटतं की नवा समाज घडवण्याचं, दिशा देण्याचं क्रांतिकारक पाऊल उचलण्यात या माध्यमांचा सहभाग आहे नि असेल. आपलं पुस्तक कोण छापेल असा प्रश्न आता उरला नाही. पुस्तक प्रसिद्ध होण्याची निकडही उरली नाही.  नवी प्रतिभा समोर येण्याचं श्रेय या माध्यमांना द्यावं लागेल. यातूनही नको तेही समोर येतं हे खरं, पण साहित्याचा प्रचार-प्रसार व वा्मयीन संस्कृती आणि चिंतन यांच्या विकासासाठी हे मोलाचं आहे.
 मनस्विनी लता रवींद्र
 
बदल आवश्यक असतात. पूर्वी संपर्कज्यांचे चांगले, पुरस्कार ज्यांना जास्त मिळाले ते नावारूपाला आले असं होत असे. पण आज सोशल मीडियावर जे लोक अॅक्टिव आहेत, जास्त लाडके आहेत त्यांना फोकस मिळतो. पुस्तकांमध्ये, टेलिव्हिजनमध्ये जी गोष्ट तुम्ही बोलू शकत नाही ती नवमाध्यमांमुळे मांडण्याची सोय उत्तमच की! पण तरी गाळणी अखेर लागणारच असते. मराठी साहित्य विशिष्ट समाजाचं प्रतिनिधित्व करत होतं, पण चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपासून बदल झाले आणि सर्व त:हेच्या अनुभवांना, बोलींना एक व्यासपीठ मिळालं. आता सगळ्या त:हेच्या अभिव्यक्ती हाच मुख्य प्रवाह आहे. जगाची दारं खुली होणं, इंटरनेट व समाजमाध्यमांची सोपी हाताळणी ही जमेची बाजू ठरते आहे.
 
नव्याने घडू पाहणा:या लेखक-कवीची मुळं पोसली जातील, अशी व्यवस्था आपल्याकडे नाही. पूर्वीच्या काळात ज्येष्ठ लेखक उमेदवारीतल्या लेखकांचे पाठीराखे म्हणून उभे असत. आता तेही दुर्मीळ आहे. परदेशी विद्यापीठांमध्ये ‘रायटर इन रेसिडेन्स’ सारखे उपक्रम चालतात, त्या प्रकारची संस्कृती आपल्याकडे यावी, तिचा काही उपयोग होईल, असं वाटतं का?
 
 गणोश विसपुते
 
 संगीतासारखी गुरू-शिष्य परंपरा साहित्यात नसतेच. उलट ज्येष्ठांच्या चकव्यापासून दूर राहायला हवं. लेखनासाठी आपणच आपला गुरू होणं बरं!  
पाश्चिमात्य देशांमध्ये वा्मय आणि सर्जनशील लेखनाच्या विद्याशाखा गांभीर्यानं चालवल्या जातात. भारतात रायटर्स इन रेसिडेन्ससारख्या योजना शिमल्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅडव्हान्स स्टडीजसारख्या संस्थांमध्ये आहेत. मी ही संस्था पाहिली आहे. विनोदकुमार शुक्ल किंवा भालचंद्र नेमाडेंना फेलोशिपच्या काळात भेटून, त्यांच्याशी चर्चा करून बरंच काही मिळाल्याचं सांगणारे तरुण मला भेटलेले आहेत. भारतीय विद्यापीठांमध्ये ती दृष्टी असल्याचं मला दिसत नाही. लेखनासाठी आपणच आपला गुरू होणं बरं!  राजा वज्र आणि मरकडेय ऋषींची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. आपल्या दैवताची साधना करता येण्यासाठी त्यांच्या मूर्ती घडवता याव्यात म्हणून वज्राला मूर्तिकला शिकायची होती. तर ऋषी म्हणाले, त्याकरिता तुला संगीत शिकावं लागेल. ते शिकल्यावर पुन्हा म्हणाले, आता तुला लय समजून घेण्यासाठी नृत्य शिकावं लागेल. असं करता करता त्याला संगीत, चित्रकला अशा ब:याच विधा शिकल्यावर शिल्पकला यायला लागली. लेखकाला आपल्या भाषेचा, भूभागाचा, राजकारणाचा, कलांचा आणि साहित्याचा इतिहास नीट माहिती पाहिजे. हे स्वत:लाच करावं लागतं.
 वीरा राठोड
 
संगीत, अभिनय यांसारख्या कलांमध्ये तुम्ही कौशल्य शिकता, पण लेखनात, मला वाटतं की उपजतच तुमच्यात ते असावं लागतं. निरीक्षण, संवेदनशीलता आणि आकलन यातून लिहिणा:याला गुरूची गरज भासत नाही. बहिणाबाई किंवा अण्णा भाऊ साठे शाळेतही गेले नाहीत, पण त्यांनी लिहिलं! तुमच्यात जर्म असेल तर जाणकार तुम्हाला मार्गदर्शन करतात, पण याचा अर्थ तुम्ही शिष्यत्व पत्करलंय असा होत नाही. 
 
 मनस्विनी लता रवींद्र
 
लेखनात गुरू-शिष्य परंपरा असणं धोक्याचंच. लेखक हा स्वतंत्र बुद्धीचा व स्वातंत्र्याचं आकलन असणारा असतो, असायला हवा. बंडखोरी ही पूर्वअटच असते लेखकपणाची. ज्येष्ठांचा पाठीवर हात असणं वेगळं आणि गुरू असणं वेगळं! विजय तेंडुलकरांसारख्या लेखकानं माङया लेखनाचं कौतुक करावं ही गोष्ट मला पुढे नेणारी असते, पण ते तितकंच. 
साहित्याची गोडी, लिहिण्याचा हात, भाषेची जाण असे संस्कार पूर्वी शिक्षणात होत. आज अशा संवादासाठी शाळा-कॉलेजात जागाच कुठे असते? ‘ललित कला केंद्रा’त शिकताना आम्हाला सतीश आळेकर, समर नखातेंसारखे जाणकार शिक्षक होते. पंधरा-वीस विद्यार्थीच असल्यामुळे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, विचारू शकायचो. पण हे दुर्मीळच असतं.
संपर्कमाध्यमं आणि सुविधा खूप आहेत, पण संवादाचा पैसच घटतो आहे. दोष कुणाला देणार? प्रत्येकाची व्यवधानं आहेत व ती खरीही आहेत. जगताना जे बोचत राहतं, त्रस देतं त्यावर व्यक्त होण्यासाठी जो अवकाश लेखक म्हणून मिळायला हवा त्याचा शोध संयमानं घेत राहावा लागणार आहे.