‘Online Mandi’ and ‘Kisan Connect’!... | ‘ऑनलाइन मंडी’ आणि  ‘किसान कनेक्ट’!

‘ऑनलाइन मंडी’ आणि  ‘किसान कनेक्ट’!

ठळक मुद्देशेतीमालाची पावले ऑनलाइन मार्केटिंगच्या दिशेने..

- साहेबराव नरसाळे

शेतकरी - बाजार समिती - व्यापारी - घाऊक विक्रेते - किरकोळ विक्रेते अशा अनेक हातांना चिकटून भाजीपाला-फळे लोकांच्या घरात पोहोचतात़ या सर्व साखळीत 10 रुपये किलो भाजीपाला-फळांचा भाव 40 ते 60 रुपये किलोवर पोहोचतो़ शेतकर्‍यालाही चांगला भाव मिळत नाही अन् महागाई ग्राहकांची पाठ सोडत नाही, अशी या साखळी बाजाराची अवस्था़ म्हणूनच 2010-11 साली शेतकरी ते थेट ग्राहक अशी संकल्पना महाराष्ट्र सरकारच्या कागदावर तयार झाली़ काही वर्षं ती कागदावरच राहिली़ 
2013मध्ये अहमदनगर जिल्ह्यात मोजक्या ठिकाणी ही योजना सुरू झाली़ पण प्रतिसाद शून्य़ कृषिमंत्र्यांच्या हस्ते सुरू झालेली शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्री अवघ्या दोन ते तीन दिवसात बंद पडली़ मात्र, या योजनेत ज्या शेतकर्‍यांनी ट्रेनिंग घेतले होते, त्यातील काहींनी काळाची पावले ओळखली़ शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीतील फायदा ओळखला आणि ऑनलाइन मार्केटिंगच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली़ त्यातीलच संतोष भापकर, सागर उरमुड़े
सागर उरमुडे हा भोयरे पठार (ता़पारनेर) या दुष्काळी गावातला तरुण़ त्याने शेतकर्‍यांची ‘कोरडवाहू फार्मर कंपनी’ स्थापन केली़ कोरोनाने भाजीबाजाराला ऑनलाइन आणून शेतकर्‍याला थेट ग्राहकाशी जोडल़े मात्र सागरसारख्या तरुण शेतकर्‍यांनी फार्मर प्रॉड्यूसर कंपनी तयार करून पाच वर्षांपूर्वीच शेतकरी ते ग्राहक शेतमाल विक्रीच्या ‘ऑनलाइन मंडी’ची गरज ओळखली होती़ म्हणूनच कोरोनाच्या लॉकडाऊन काळात 50 लाखांपर्यंत उलाढाल तो करू शकला़
पुणे शहरात त्याची कंपनी रोज 100 सोसायट्यांमध्ये शेतमाल पोहोच करीत आह़े राहुल पोळ, योगेश उरमुडे, बापू होळकर हे त्याचे साथीदाऱ त्यांच्यासह नगर व पुणे जिल्ह्यातील 914 शेतकर्‍यांची मिळून ही कंपनी आह़े पुण्यातील 100 सोसायट्यांमध्ये 100 जणांना भाजीपाला पोहोचविण्याचा रोजगार त्यांनी दिला आह़े त्याशिवाय प्रत्येक शेतकर्‍याच्या मालाला हातकाट्यावरचा भाव मिळवून दिला़ प्रत्येक सोसायटीचे व्हॉट्सअँप ग्रुप तयार केल़े त्यावर ते मागणी नोंदवितात़ त्यानुसार त्यांना भाजीपाला पोहोच केला जातो़
संतोष भापकर हे गुंडेगाव (ता़ नगर) येथील शेतकरी़ त्यांचे गावही कोरडवाहूच़ ते सेंद्रीय शेती करतात़ ‘संपूर्ण शेतकरी सेंद्रीय शेती’ असे त्यांच्या गटाचे नाव़ या गटातील सुमारे 300 शेतकरी सेंद्रीय शेती करीत आहेत़ ते रोज आत्मा विभागाच्या ‘साई ऑर्गनिक’ ब्रॅण्डद्वारे फळे व भाजीपाला पुणे शहरात विकत आहेत़ त्यासाठी व्हॉट्सअँप ग्रुप व ‘संपूर्ण शेतकरी सेंद्रीय शेती’ हे अँप तयार केले आह़े त्यावर पुण्यातील ग्राहक मागणी नोंदवितात़ दिवसभर शेतकर्‍यांनी काढलेला भाजीपाला, फळे यांचे मागणीनुसार क्रेट भरले जातात़ भाजीपाला व इतर मालाचे ग्रेडिंग, पॅकिंग केले जात़े हा माल रात्री 10 वाजेपर्यंत ग्राहकांना पोहोच केला जातो. त्यामुळे ताजा भाजीपाला ग्राहकांना मिळतो़ त्याच दिवशी भाजीपाला पोहोच करणे शक्य न झाल्यास हा सर्व भाजीपाला एसीमध्ये ठेवला जातो़ दुसर्‍या दिवशी सकाळीच हा भाजीपाला ग्राहकांना पोहोच केला जातो़
‘शेताच्या बांधावरून थेट ग्राहकाच्या दारात’ अशी संकल्पना घेऊन 5 वर्षापासून आम्ही हे काम करीत आहोत, असे भापकर सांगतात़ 


‘किसान कनेक्ट’
भाजीपाला व फळांचे ग्रेडिंग, पॅकिंग आणि स्वच्छता करण्यासाठी मशिनरी, हातात हॅण्डग्लोव्हज, अंगात अँप्रन, तोंडावर मास्क आणि डोक्यावर डिस्पोजेबल कॅप घातलेले कर्मचारी - ही कोणत्या फाइव्ह स्टार किंवा इंटरनॅशनल कंपनीतील व्यवस्था नाही तर हे आहे र्शीरामपूरमधून पुणे, मुंबईसारख्या महानगरांना भाजीपाला पुरविणार्‍या ‘किसान कनेक्ट’मधील चित्ऱ एव्हढेच नाही तर आपला भाजीपाला घेणार्‍या ग्राहकांशी थेट संवाद ठेवण्यासाठी चक्क एक कॉल सेंटरही उभे राहिल़े
या कॉल सेंटरमधून रोज पुणे, मुंबईतील ग्राहकांना कॉल जातो़ तुम्हाला आज काय भाजी हवी आहे, कोणती फळे पाहिजेत, अशी थेट विचारणा होत़े तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी किसान कनेक्ट हे अँप व संकेतस्थळही सुरू करण्यात आले आह़े त्याशिवाय एक टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आला आह़े या टोल फ्री क्रमांकावरही पुणे, मुंबईतील ग्राहक भाजीपाल्याची मागणी नोंदवितात़ लॉकडाऊन काळात घरोघर स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळावा म्हणून र्शीरामपूर (जि़ अहमदनगर) या खेड्यात किशोर निर्मळ यांनी ही सुसज्ज यंत्रणा उभारली़
आतबट्टय़ाच्या शेतीला पूर्णपणे व्यावसायिक रूप देण्यासाठी उद्योजक किशोर निर्मळ यांनी ‘किसान कनेक्ट’ या फार्मर प्रॉड्यूसर कंपनीची स्थापना केली़ नगर जिल्ह्यातील राहाता, र्शीरामपूर, कोपरगाव, नेवासा, राहुरी, संगमनेर आणि पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील किसान निर्मळ यांच्याशी कनेक्ट झाल़े
7 एप्रिल 2020 रोजी त्यांनी ऑनलाइन बाजाराची मुहूर्तमेढ रोवली़ त्यातून पुणे, मुंबईतील दोन हजार ग्राहक जोडल़े आता ठाणे, नाशिक या शहरांमध्येही ‘किसान कनेक्ट’चा भाजीपाला आणि फळे घरपोहोच जात आहेत़ डिलिव्हरी बॉय, पॅकिंग, कॉल सेंटर, वाहनचालक अशा सुमारे 200 जणांना यातून रोजगार उभा राहिला आह़े 
खडकेवाकी (ता़ राहाता) येथे नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा, तर मंचर येथे पुणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा भाजीपाला घेतला जातो़ तेथे तो मशीनमध्ये स्वच्छ केला जातो़ त्यानंतर त्याचे ग्रेडिंग होऊन पॅकिंग केले जात़े एक किलो, दीड किलो असे मागणीनुसार पॅकिंग करून एका ग्राहकांच्या वस्तूंचा एक बॉक्स असे जेवढय़ा ग्राहकांची मागणी असेल तेवढे बॉक्स तयार केले जातात़ हे बॉक्स गाडीत टाकून नवी मुंबईत पोहोच होतात़ तेथून हा माल प्रत्येक ग्राहकापर्यंत छोट्या वाहनांमधून पोहोचविला जातो़ मंचरचा माल पुणे व पिंपरी शहरात तर राहाता केंद्राचा माल मुंबईत जातो़ त्यासाठी 17 वाहने भाडेतत्त्वावर घेतली आहेत, असे निर्मळ सांगतात़ 
सुरुवातीला केवळ 16 वस्तू घरपोहोच दिल्या जात होत्या़ हळूहळू मागणी वाढत गेली आणि आता आंबट चुका ते ड्रॅगन फ्रूट अशा 80 वस्तू घरपोहोच दिल्या जात आहेत़ ग्राहकांची संख्या वाढली आह़े त्यामुळे र्शीरामपूरमध्ये ‘किसान कनेक्ट’चे कस्टमर केअरसाठी एक कॉल सेंटरही उभे केले असून, तेथे 25 पदवीधर तरुणांची नियुक्ती करण्यात आली आह़े मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये हे तरुण ग्राहकांशी संवाद साधतात़
शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव मिळावा आणि बाजार समित्यांमध्ये होणार्‍या लुटीला आळा बसावा, यासाठी अनेक शेतकर्‍यांनी एकत्र येऊन स्वत:च्या मालाला बाजारपेठ निर्माण करण्याची गरज अनेक वर्षांपासून व्यक्त होत होती़ त्यादृष्टीने र्शीरामपूरमधून सुरू झालेले ‘किसान कनेक्ट’ देशभरातील शेतकर्‍यांना दिशादर्शक ठराव़े गावोगावात असे कॉल सेंटर उभे रहावेत आणि तेथे गावातल्याच तरुणांना रोजगार मिळावा़ एका शेतकर्‍याने किमान 100 ग्राहकांची बाजारपेठ जरी निर्माण केली तरी कर्जबाजारी शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी हे महाराष्ट्रातील चित्र इतिहासजमा होईल आणि शेतकरी खर्‍या अर्थाने आत्मनिर्भर होईल़
 
sahebraonarasale@gmail.com
(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आहेत़)

Web Title: ‘Online Mandi’ and ‘Kisan Connect’!...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.