शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

अंतराळवीरांसाठी आता अवकाशात शेती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 06:05 IST

स्थानिक अन्न खावं, ते आरोग्यासाठी चांगलं असतं, असं आपल्याला नेहेमी सांगितलं जातं, पण अंतराळवीर इतके दिवस अवकाशात असतात, त्यांनी काय करावं? आता त्यांच्यासाठी खास अंतराळात शेतीची लागवड सुरू झाली आहे आणि त्याचे प्रयोग यशस्वीही झााले आहेत.

ठळक मुद्देस्थानिक अन्न खावं असं आहारतज्ज्ञ आपल्याला जसं नेहमी सांगतात; त्याच धर्तीवर अंतराळवीरांनी अंतराळात असताना तिथलं अन्न खाल्लं तर जास्त ठीक राहील असा विचार संशोधकांनी केला आणि वेगवेगळे प्रयोग सुरू केले.

- अतुल कहाते

जीवसृष्टीची निर्मिती झाल्यापासून माणसाला अंतराळाविषयी विलक्षण कुतूहल वाटत आलेलं आहे. आकाशाकडे बघितल्यावर माणसाला दर वेळी वेगळं दृश्य दिसत असल्यामुळे तो कायमच त्याकडे काहीतरी अद्भुत बघितल्याच्या भावनेनं भारून गेलेला आहे. कधी निळंशार आकाश दिसावं तर कधी पांढरफटक आकाश नजरेला पडावं. कधी पावसाचे काळे ढग दाटलेले असावेत तर कधी प्रखर सूर्याकडे बघणं अशक्य व्हावं. रात्रीसुध्दा किती वैविध्यं दिसावीत? कधी चांदण्यानं भरलेलं पांढरं आकाश दिसावं तर अमावस्येच्या रात्री चंद्र नसल्यामुळे एकदम मोकळं आकाश दिसावं. चंद्रसुध्दा कधी पूर्ण तर कधी अर्धा. कधी त्याची कोर दिसावीत? तर कधी तो दिसूच नये. इतर ग्रहतारेसुध्दा चमचमताना अगदी दिमाखात दिसावेत. कित्येक सहस्त्रकं आकाशाविषयीची ही वैशिष्टयं अचंबित होऊन बघण्यात आणि त्याविषयी कविकल्पना रचण्यातच माणसानं घालवली. त्यानंतर विज्ञानाचं माणसाच्या आयुष्यात आगमन झालं आणि आकाशामधल्या या चमत्कारांना ठरावीक नियमांमध्ये बांधण्यासंबंधीच्या संकल्पना जन्मल्या. इथून पुढे चमत्कार घडत गेले. पृथ्वी स्थिर नसते आणि ती फिरते; इतकंच नव्हे तर ती सूर्याभोवती फिरते या विधानामुळे अनेक शतकं नुसता गोंधळ माजला. तसंच चंद्रसुध्दा पृथ्वीभोवती फिरतो हेही समजलं. याखेरीज इतर सगळे ग्रहताऱ्यांविषयी विलक्षण माहिती मिळत गेली. दुर्बिणीचा जन्म झाल्यापासून आणि माणसानं ती आकाशाकडे रोखल्यापासून या माहितीचा स्फोट झाला. खगोलशास्त्र या अत्यंत महत्त्वाच्या शाखेचा जन्म झाला.

आपल्या दृष्टीनं जीवसृष्टीमध्ये पृथ्वी सगळ्यात महत्त्वाची असली तरी इतर सगळे ग्रहतारे ज्या अवकाशामध्ये किंवा अंतराळामध्ये असतात त्यांच्याविषयीचं माणसाचं कुतूहल खूप वाढत गेलं. १९५७ साली सोव्हिएत युनियननं ‘स्पुटनिक’ हे अंतराळयान अंतराळात यशस्वीरीत्या सोडल्यानंतर फक्त पृथ्वीपुरतीच माणसाची मर्यादा राहण्याचं कारण नाही आणि भविष्यात अंतराळामध्ये इतरत्रही माणूस काहीतरी भन्नाट घडवून आणू शकेल अशा कविकल्पना आता वास्तवात यायला लागल्या. अंतराळात जीवसृष्टी असते का, तिथे सजीव टिकू शकतील का, पृथ्वीवर आपण सहजपणे करू शकणाऱ्या गोष्टी अंतराळात करता येतील का अशा अनेक प्रश्नांचा अभ्यास करण्यात वैज्ञानिक गर्क झाले. ‘नासा’ या अमेरिकेमधल्या अंतराळविश्वाशी संबंधित असलेल्या संशोधनामध्ये आघाडी घेणाऱ्या जगविख्यात संस्थेनं याचाच एक भाग म्हणून “अंतराळामध्ये भाज्या पिकू शकतील का?” या विषयाला हात घातला. आता या प्रश्नाचा विचार करावा असं नासाला का वाटलं?

अंतराळवीर सुरुवातीला काही तास, फार तर काही दिवस अंतराळामध्ये राहून पृथ्वीवर परतत असत. मुळात पृथ्वी सोडून परग्रहावर किंवा पृथ्वीभोवती जाऊन येणं ही कल्पनाच अद्वितीय असल्यामुळे याहून आणखी काही करण्यााच विचार तेव्हा होत नव्हता. कालांतरानं तंत्रज्ञान प्रगत होत गेल्यावर अंतराळामध्ये खूप जास्त दिवस राहून संशोधन करण्याची गरज भासायला लागली. अंतराळवीर आता तिथे बराच काळ मुक्काम करतील असं साधारण २०१० सालच्या सुमाराला नासानं ठरवलं. गंमत म्हणून सांगायचं तर स्थानिक अन्न खावं असं आहारतज्ज्ञ आपल्याला जसं नेहमी सांगतात; त्याच धर्तीवर अंतराळवीरांनी अंतराळात असताना तिथलं अन्न खाल्लं तर जास्त ठीक राहील असा त्यामागचा सूज्ञ विचार होता! म्हणूनच अंतराळवीरांच्या ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ या तेव्हाच्या मोहिमेदरम्यान अंतराळात भाज्यांची लागवड करून त्या पिकवण्यासंबंधीचे तब्बल वीसेक प्रयोग करण्यात आले. यातून पृथ्वीवर आणि अंतराळात भाज्यापिकण्यासंबंधीचे फरक शास्त्रज्ञांच्या लक्षात आले.

माती, पाणी, हवामान, बियांचा दर्जा अशा घटकांबरोबरच सर्वसामान्यपणे आपल्याला माहीत नसलेल्या अनेक घटकांचा रोपांच्या वाढीमध्ये सहभाग असतो. उदाहरणार्थ पृथ्वीवरच्या गुरुत्वाकर्षणाचं भान रोपांना असतं! अन्यथा जमिनीत ती टिकाव धरून कशी राहू शकतील? अंतराळवीरसुद्धा पृथ्वीवर असताना आरामात जमिनीवर चालू शकतात; पण अंतराळात असताना ते जणू हवेत तरंगत असल्याची दृश्यं आपण सगळ्यांनी बघितलेली असतीलच. नेमक्या याच गोष्टीसाठी पृथ्वीवर रोपं वाढत असताना त्यांच्यामधला एक घटक याची नोंद घेत असतो. आता अंतराळामध्ये गुरुत्वाकर्षण कमी प्रमाणात असतं किंवा जवळपास नसतंच; त्याचं काय? तर खूप कमी गुरुत्वाकर्षण असूनसुद्धा रोपांची वाढ होऊ शकते आणि म्हणूनच कमी गुरुत्वाकर्षणाची रास्त नोंद घेणं या रोपांना शक्य होतं असं अंतराळवीरांच्या लक्षात आलं. टिकाव धरून राहण्यासाठी रोपांना खास ‘उश्या’ही पुरवण्यात आल्या.

भाज्यांची लागवड करण्यासाठी ‘व्हेजी’ असं नामकरण करण्यात आलेल्या पद्धतीचा वापर करून अंतराळामध्ये मोहरी, कोबी यांच्यासकट अनेक गोष्टींची यशस्वी लागवड करण्यात आली. अंतराळवीरांनी हे सगळं खाऊनही बघितलं. त्यादरम्यान लक्षात आलेले काही दोष दूर करण्यात आले. चीन तर बटाट्यांच्या बिया आणि रेशीम किडा यांना एकत्रितरीत्या अंतराळात धाडण्याचा प्रयत्न करतो आहे. रेशीम किडे या बियांवर प्रक्रिया करून कर्बवायू बाहेर टाकतील, तो कर्बवायू वापरून बटाटे वाढतील आणि ते करत असताना प्राणवायू बाहेर टाकतील, तो प्राणवायू पुन्हा रेशीम किडे वापरतील अशी यामागची कल्पना आहे. आता अंतराळात पिकवण्यात आलेल्या गाजरांचा अभ्यास पृथ्वीवर करण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. नासाच्या अहवालानुसार सलग २७ दिवस कुठल्याही मानवी हस्तक्षेपाविना अंतराळात भाज्यांची वाढ चांगल्या जोमानं होताना दिसून आली आहे.

शेतीमध्ये गेली कित्येक दशकं अनेक प्रयोग करण्यात आले आहेत. विज्ञानाच्या आधारे शेती अधिकाधिक सोपी करणं आणि त्यातून जास्त पीक घेण्यासाठी प्रयत्न करणं यातूनच हरितक्रांतीसारख्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. कमी पाणी वापरून शेती, उत्तम दर्जाची रोपं वापरून शेती, रसायनविरहित खतांचा वापर करून करण्यात आलेली शेती असे अनेक प्रयोग अलीकडच्या काळात होताना दिसतात. याच्याच जोडीला आपण ‘कॅलिफोर्नियामधली सफरचंदं’, ‘इराणमधले कांदे’ अशा असंख्य गोष्टी कळत-नकळत खातो. आता याच्या जोडीला ‘अंतराळामधली गाजरं’ किंवा तत्सम पदार्थ काही वर्षांनी आपल्यासमोर आले तर नवल वाटायला नको अशी परिस्थिती आहे. न जाणो एलॉन मस्क, रिचर्ड ब्रॅन्सन आणि इतर लोकांच्या म्हणण्यानुसार खरोखरच काही दशकांनी इतर ग्रहांवर मानवी वस्त्या उभ्या राहू शकल्या तर तिथली माणसं “अन्नाच्या बाबतीत आम्ही स्वयंपूर्ण आहोत” असं म्हणू शकतील असं आता वाटायला लागलं आहे!

(लेखक विज्ञान अभ्यासक आहेत.)

akahate@gmail.com