इस रात की सुबह नहीं?
By Admin | Updated: September 17, 2016 12:34 IST2016-09-17T12:34:27+5:302016-09-17T12:34:27+5:30
काही प्रदेश वर्षानुवर्षे लष्करी छावण्यांत जगतात; तेव्हा काय मानसिकता होत असेल त्या लोकांची? या बाबी निदान समजून तरी घ्यायच्या की नाही?

इस रात की सुबह नहीं?
>समीर मराठे / सुधीर लंके
‘राष्ट्रवाद’ आपण अनेकदा सोयीने वापरतो. माणसांपेक्षा भौगोलिक सीमा, जात, धर्म या फुटपट्ट्यांतून तो मोजतो. पोलिसांनी साधी एखादी मिरवणूक अडवली तरी स्वातंत्र्य हिरावल्याच्या भावनेतून संतापतो. काही प्रदेश वर्षानुवर्षे लष्करी छावण्यांत जगतात; तेव्हा काय मानसिकता होत असेल त्या लोकांची? या बाबी निदान समजून तरी घ्यायच्या की नाही?
- काश्मीरबाबतच्या आपल्या विचारांमध्ये हाच पेच आहे!
शब्द वेगवेगळे, पण त्यामागची भावना हीच. सततचा तणाव आणि ‘बंद’मुळे बुडालेला रोजगार. काम नसल्याने रिकामे बसलेले हात हे चित्रही सर्वत्र दिसते..
काश्मिरी तरुणांच्या हातात दगड का आहेत?
- हा प्रश्न वेगवेगळी उत्तरे घेऊन येतो. त्यातून काश्मीरबाहेर असताना आणि माध्यमांमधून जे दिसेल ते पाहताना / वाचताना तर या उत्तरांच्या दिशा बदलत जातात आणि त्यामागचे संदर्भही.
- एका वेगळ्या, स्वतंत्र आणि फक्त काश्मीरपुरत्याच मर्यादित नसलेल्या लेखनप्रकल्पासाठी केलेल्या प्रवासात हा प्रश्न आमची पाठ सोडणे शक्य नव्हते.
तसेच झाले.
बुरहान वानीच्या हत्त्येनंतर दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला, काश्मिरातला धुमसता बर्फ ना विझला, ना शांत झाला. ईदच्या दिवशीही श्रीनगर पेटलेले देशाने पाहिले. गेल्या फक्त दोन महिन्यात सुरक्षा दलांच्या गोळीबारात पाऊणशेच्या वर काश्मिरी तरुण मृत्युमुखी पडले आहेत आणि अकरा हजाराच्या वर जखमी झाले आहेत. या संघर्षात लष्कराच्या जवानांचेही दुर्दैवी बळी गेले.
तरीही हा अंगार का शांत होत नाही?
श्रीनगरच्या श्री महाराजा हरिसिंग (एसएमएचएस) हॉस्पिटलातल्या डोळ्यांच्या वॉर्डमध्ये फिरत असताना पेलेट गन्समुळे आंधळे झालेले जे जे भेटले त्यात फक्त तरुणच होते असे नाही, चार वर्षांच्या चिमुरड्यापासून दहा-बारा वर्षांची मुले ते ८० वर्षाच्या म्हाताऱ्यांपर्यंत आणि काही वृद्ध स्त्रियांचाही समावेश होता.
‘क्या हुआ था?’ असे विचारल्यावर ‘मैं नमाज पढने जा रहा था..’, ‘क्रिकेट, फुटबॉल खेल रहा था..’, ‘टॉयलेट जा रहा था’... अशीच उत्तरे बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळाली. ती सगळीच खरी नव्हती. हॉस्पिटलच्या रेकॉर्डमध्ये नोंदवलेली नावेही बहुतांश खोटी. काहींनी तर आपले नाव ‘बुरहान वानी’ असेच सांगितल्याचे नोंदलेले दिसते. आपली खोटीच नावे आणि खोटेच पत्ते नोंदवलेत हे कबूल करणारेही भेटले.
कारण?
- केसेस दाखल होतील आणि पोलिसांचे, कोर्टकचेऱ्यांचे लफडे पाठी लागेल म्हणून!
..पण आपली ओळख लपवणारे तरुण जसे भेटले, तसेच ‘हां, किया हमने पथराव, हमें आजादी चाहिए’ असं उघडपणे सांगणारेही खूप जण भेटले.
- तरीही दगड उचलणाऱ्या हातांमागे संताप आहे. कशाचा? सतत तैनात असलेल्या लष्कराचा. त्यापायी सतत सोसाव्या लागणाऱ्या ताणाचा. त्याबद्दल माणसे उघडपणे बोलतात.
‘टुरिस्ट हमारे लिए भगवान है’ असं सांगताना एक जण म्हणाला, ‘कुछ दिन पहले टुरिस्ट के एक गाडी का बुरी तरह अॅक्सिडेंट हुवा. कितने घायल हुए. उन टुरिस्ट्स को हमनेही अस्पताल पहुॅँचाया, हमारा खुन उन्हें चढाया.. इन्सानियत तो हम भी जानते है..’
तत्कालिक कारणावरून उफाळलेल्या संतापाचा उद्रेक आम्ही जरूर पाहिला, पण संताप होता म्हणजे ती ‘आजादीची जंग’ होती का?
- नाही!
शिक्षण नाही, रोजगार नाही, हाताला काही काम नाही, मग गर्दीच्या पाठीमागे जाण्यावाचून काही पर्याय नाही.. अशा हतबल मानसिकतेने काश्मिरी तरुणांची पार गोची केलीय..
दर दोनशे फुटावर एक बंदूकधारी जवान दिसतो. खोऱ्यात आजच्या घडीला काही लाख जवान आणि पोलीस तैनात आहेत. गेल्या साठ वर्षांत अनेक पर्याय तपासले गेले, पण कुठलेच ठोस उत्तर मिळाले नाही.
कधी पद्धत चुकतेय, तर कधी उत्तर!
श्रीनगरच्या लाल चौकात भेटलेले साठीचे सलीममियॉँ सांगत होते, ‘‘बाप ने चाटा मारा, हररोज पिटा, तो बच्चा भी बाप का दुश्मन बन जाता है. पत्थर का जवाब गोली नहीं, प्यार होता है मेरे भाई, वो तो कभी घाटी को मिलाही नहीं! पत्थर का जवाब गोली से, गोली का फिर पत्थर से.. यही आजतक हुआ है, होता रहेगा’..
‘धुम्मस - श्रीनगरमध्ये फिरताना दिसलेलं ‘बंद डोळ्यां’आडचं जग’ (मंथन ४ सप्टेंबर २०१६) या आमच्या लेखावर अनेक प्रतिक्रिया आल्या (मंथन ११ सप्टेंबर २०१६). काश्मिरी तरुण म्हणतात, आम्ही दगड मारले नाहीत तर मग लष्कराला दगड मारणारे हात कोणाचे? असा या प्रतिक्रियांचा सूर आहे. या प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे.
- त्यामुळेच काही मुद्द्यांचा खुलासा महत्त्वाचा वाटतो. आम्ही काश्मीरमध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील सचिवालयात काम करणारा एक कर्मचारी आम्हाला भेटला होता. त्याने दिलेला सल्ला आम्हाला महत्त्वाचा वाटला. तो म्हणाला, ‘काश्मीरमध्ये आलात खरे, पण एकच करा जमलेच तर तुमचा ‘राष्ट्रवादी’ दृष्टिकोन थोड्या काळासाठी बाजूला ठेवून इथल्या मुला-माणसांना भेटा. ते काय म्हणतात ते फक्त ऐका.’ आम्ही तेवढेच केले. प्रत्यक्ष फिरताना दिसणारी परिस्थिती एवढी गुंतागुंतीची आहे, की निष्कर्ष काढणे मुश्कील व्हावे! कर्तव्य बजावत काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या लष्कराला मारल्या जात असलेल्या दगडांचे आम्ही कोठेही समर्थन केलेले नाही. त्याचबरोबर लष्कराकडून जे पेलेट चालविले जातात त्याचेही समर्थन केलेले नाही.
‘मै नमाज पढने जा रहा था, मै दोस्तों के साथ जा रहा था, मै क्रिकेट खेल रहा था, तब आर्मीने पेलेट चलायी’ अशी कारणे सांगणारे तरुण खरे बोलत असतील वा खोटे, त्यांचे डोळे गेले आहेत ही वस्तुस्थिती आहे. आधीच सुलगणाऱ्या काश्मीरच्या संदर्भात हे वास्तव किती भयाण आहे आणि त्यामुळे आधीच नाजूक असलेली परिस्थिती कशी अधिक चिघळते आहे, हे या प्रवासात आम्ही अनुभवले आहे.
काझीगुंड गावाजवळ आम्हाला एक वृद्ध भेटले. ६५ वर्षांचे. ते म्हणाले, ‘माझी पत्नी गोळीबारात गेली. दुसरी एक गर्भवती महिला गेली. एक सात-आठ वर्षाचा मुलगा गेला. यांचा दगड लष्करापर्यंत पोहोचू शकतो? लष्करी जवानांच्या मृत्यूचे मोल मोठेच आहे. पण, लष्करी कारवाईत होणारा एखाद्या निरपराध माणसाचा मृत्यूही दुर्दैवीच मानला पाहिजे.’
देशाच्या इतर भागात जेव्हा कधी आंदोलने होतात, त्यात रिक्षा-एसटी बस फोडल्या जातात, जाळपोळ होते, पोलिसांना मारहाण होते तेव्हा आंदोलकांना गोळ्याच घातल्या पाहिजेत अशी आपली भूमिका असते का? याउलट पोलिसांनी साधी लाठी उगारली अथवा बळाचा वापर केला म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठली, अधिकारी निलंबित झाले अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. ‘राष्ट्रवाद’ आपण अनेकदा सोयीने वापरतो. माणसांपेक्षा आपण भौगोलिक सीमा, जात, धर्म या फुटपट्ट्यांतून तो मोजतो. पोलिसांनी साधी एखादी मिरवणूक अडवली तरी आपण संतापतो, पोलीस आपले स्वातंत्र्य हिरावून घेताहेत असे वाटते. काही प्रदेश वर्षानुवर्षे लष्करी छावण्यांत जगतात; तेव्हा काय मानसिकता होत असेल त्या लोकांची? लष्कराला दिलेल्या विशेषाधिकाराविरोधात इरोम शर्मिला या महिलेने १६ वर्षे उपोषण केले. काही बायकांनी नग्न होऊन आंदोलने केली. हे नेमके काय आहे? या बाबी निदान समजून तरी घ्यायच्या की नाही?
- आम्ही तेवढाच प्रयत्न केला.
कहॉँ का है ये इन्साफ?
‘हम ना बाहर घुम सकते है, ना घर बैठ सकते है. कहां जा रहे हो? क्यों जा रहे हो? पहचानपत्र दिखाओ, नहीं है, तो मारो, पिटो, खाल खिंचवा दो हमारी.. कितने बार तलाशी? तलाशी के नाम पे थाने ले जाओ और बंद कर दो हमें. पिटो वहां भी. कभी बाप को, तो कभी बेटे को. सब तरफ से पाबंदी. क्या ऐसाही होता है आप के यहॉँ? कितने साल सहेंगे? हमने पत्थर उठाया, तो वो बंदूक उठायेंगे.. हमने पत्थर फेंके तो वो गोलीयों की बौछार करेंगे.. कहॉँ का है ये इन्साफ?.. हिंदुस्तानी भी हमें आतंकवादी समझते है, शक से देखते है, वहॉँ भी ना कोई हमें किराये से घर देता है, ना नौकरी..’
- हे आम्ही ऐकले आहे.