गूढ
By Admin | Updated: February 21, 2015 14:30 IST2015-02-21T14:30:48+5:302015-02-21T14:30:48+5:30
अनेक माणसे संधीअभावी चारित्र्यवान राहतात. आबा ‘अशा’ चारित्र्यवान लोकांपैकी नव्हते. त्यांना पावलोपावली संधी चालून आल्या मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन या माणसाने आपला नैतिक अधिकार उन्नत राखला.

गूढ
अतुल कुलकर्णी
अनेक माणसे संधीअभावी चारित्र्यवान राहतात. आबा ‘अशा’ चारित्र्यवान लोकांपैकी नव्हते. त्यांना पावलोपावली संधी चालून आल्या मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन या माणसाने आपला नैतिक अधिकार उन्नत राखला. स्वत:च्या मनातली खळबळ चेहर्यावर येऊ न देण्यात त्यांचा हातखंडा होता.
---------------
मुरब्बी राजकारण्यांमध्ये जे गुण असावे लागतात त्या गुणांनी ओतप्रोत भरलेला, पोटातले पाणी हलू न देणारा नेता म्हणजे आर.आर. पाटील. स्वत:च्या मनातली खळबळ चेहर्यावर येऊ न देण्यात त्यांचा हातखंडा होता. ‘आबांना मी ओळखतो’ असे म्हणण्याचे धाडस करणार्यांचा बालीशपणा नेहमी समोर यायचा, कारण हा माणूस असा सहजासहजी कधीच कोणाला कळला नाही. अगदी त्यांच्यावर मनापासून प्रेम करणार्या शरद पवार यांना देखील.. दुसर्यांदा त्यांना उपमुख्यमंत्री केले नाही तेव्हा पवारांविषयीची नाराजी त्यांनी बोलून दाखवली होती मात्र हॉस्पीटलमध्ये अँडमिट झाल्यानंतर त्याच पवारांनी स्वत:च्या हाताने आपल्याला सफरचंद कापून खायला दिले, हे सांगतानाचे त्यांच्या चेहर्यावरचे भाव कधीही विसरता येणार नाहीत असेच होते.
आबांना आपण किती ओळखतो यापेक्षा किती ओळखत नाही याची अनेक उदाहरणे निघतील. हा माणूस जेवढा सत्शील तेवढाच गूढ. त्यामुळेच या व्यक्तीमत्वाबद्दल प्रत्येकाच्या मनात कायम उत्सुकता असायची..
जी गोष्ट ऐकायची नसेल ती गोष्ट सांगणार्याला बगल देण्याचे अफलातून कसब आबांकडे होते. समोरच्याला नको असलेला असा काही विषय ते काढायचे की बोलणारा स्वत:चा विषय सोडून त्यांच्या विषयात गुंतून जायचा.
एखाद्याविषयीची माहिती काढून घेण्याची आबांची हातोटी विलक्षण होती. उदाहरणार्थ त्यांना जयंत पाटलांविषयी काही माहिती काढून घ्यायची असेल तर ते जयंतरावांच्या विरोधकाला आपल्या गाडीत बसवायचे, बोलता बोलता तंबाखूची गोळी स्वत: लावायचे आणि जयंतरावांची अशी काही तारीफ करायचे की जयंतरावांचा विरोधक जयंतरावाबद्दल असेल नसेल ते सगळे बोलून मोकळा व्हायचा. हे मात्र शांतपणे तंबाखू चघळत सगळे ऐकत रहायचे. मधेच ‘ तसं नाही हो..’ असे काहीतरी वाक्य टाकले की पुन्हा तो सुरु व्हायचा!
ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना त्यांनी ग्रामस्वच्छता अभियान राज्यभर राबवले. संत गाडगेबाबांच्या नावाने हाती घेतलेल्या अभियानाची प्रचंड तारीफ झाली. लोक आबांनाच आधुनिक गाडगेबाबा म्हणू लागले. त्यातून त्यांना भरमसाठ प्रसिध्दी मिळाली. ते माध्यमांचे लाडके झाले आणि तिथेच त्यांच्या प्रतिमेला तडा देणारी बीजे रोवली गेली.
गृहमंत्री पद मिळाले आणि सतत बातम्यांच्या शोधात असणार्या पत्रकारांसाठी ते जादूची कुपीच ठरले. रोज कोणत्या पत्रकाराला कोणती बातमी दिली म्हणजे ती ठळकपणे छापून येते याचा त्यांच्याएवढा अभ्यास आज हयात असलेल्या एकाही नेत्याचा नसेल. (हा असा अभ्यास विलासराव देशमुखांचा होता. एकदा त्यांनी गंमतीने नारायण राणे यांच्यासोबत शर्यत लावली- ‘ दिवसभर तुम्ही पत्रकारांशी काय बोलायचे ते बोला, संध्याकाळी ७ नंतर मी थोडावेळच बोलतो, दुसर्यादिवशी हेडलाईन कोणाची येते ते पाहू..’- शेवटी विलासरावांनीच ती शर्यत जिंकल्याचे किस्से आजही सांगितले जातात. असो.)
पत्रकारांना हाताळण्याची हातोटी आबांना साधली असे वाटले आणि तिथे त्यांच्या विरोधात रोवल्या गेलेल्या बीजांना अंकुर फुटले..
गृहमंत्री असताना त्यांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला. विलासराव देशमुख दिल्लीतला विरोध सहन करुनही ठामपणे त्यांच्याबाजूने उभे राहीले. ‘माझ्या पक्षाचे मी बघतो, तुमच्या पक्षाचे तुम्ही बघा’- असे म्हणत दोघांनी आपापले पक्ष सांभाळून डान्सबार बंदीची घोषणा केली आणि ती अमलात आणली. या निर्णयातून मिळालेली/ मिळणारी प्रसिध्दी, डान्सबार बंदीवाले मंत्री अशी सततची ओळख नंतर नंतर स्वत:च्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेल्या आबांनाही नकोशी वाटू लागली हा भाग अलहिदा..
राज्यात त्यावेळी पंचावन्न हजार पोलिसांची भरती करायची होती. चार हजार अधिकारी भरायचे होते. पोलिस प्रशिक्षण देण्याची राज्यातील र्मयादा लक्षात घेऊन दरवर्षी अकरा हजार या संख्येने पाच वर्षात पंचावन्न हजारांची भरती करायचे ठरले. आबांच्या जागी दुसरा कोणीही असता आणि तर त्याने या भरती प्रकरणातून आयुष्यभराची तरतूद करून घेतली असती. आबा स्वत: त्या मार्गाने गेले नाहीतच, पण अन्य कोणालाही त्यांनी ‘हात’ मारू दिला नाही. हीच बाब राज्यातील पोलीस दलातल्या बदल्यांच्या बाबतीत सांगता येईल. कधीही कोणाचा एक रुपयाही न घेता आबांनी बदल्या केल्या. मात्र त्यातल्या अनेकांनी नंतर ‘मॉल’ उघडले!
आमदार त्यांच्याकडे पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांचे अर्ज घेऊन येऊ लागले आणि अमूक एखाद्या अधिकार्याविषयी आग्रह धरु लागले तसे त्यांचा अधिकार्यांविषयीचा अभ्यास विलक्षणरित्या वाढला. राज्यातल्या सगळ्याच्या सगळ्या वरिष्ठ पोलिस अधिकार्याचे काय गुण-अवगुण आहेत हे कोणताही कागद हातात न घेता सांगण्याची ताकद त्यांच्यात आली. एकीकडे पत्रकारांचे लाडकेपण आणि दुसरीकडे त्यांनी जवळ बाळगलेली अर्मयाद माहिती.. यातून त्यांच्या विरुध्द रोवलेली बीजे केवळ अंकुरतच नव्हती तर कालांतराने त्यांना पालवी फुटू लागली..
या काळात बातम्यांसाठी आबांच्या मागावर असलेले पत्रकारदेखील कधी त्यांच्या बाजूने तर कधी विरोधात जाऊ लागले. एक पत्रकार एकेकाळी आबांचा खासम्खास. पण त्याने सांगितलेले एक काम आबांनी केले नाही. त्यातून तो दूर गेला. नंतर त्याच पत्रकाराने आबांच्या शारीरिक व्यंगापर्यंत लेखणी चालवली. आज कोणती बातमी छापून आणायची हे ठरवून आबा घरातून निघतात.. असे त्यांच्याच पक्षातील लोक बोलू लागले. त्यांच्याविरोधातील बीजाचे रोप बनले होते!
पोलीस दलावर होणारी टीका आबांना स्वत:वर होणारी टीका वाटू लागली आणि त्या वाटण्याने त्यांनाच अनेकदा अडचणीत आणले. पोलिसांनी केलेल्या चुका ते या खात्याचा मंत्री म्हणून पोटात घालू लागले. हे असे वागण्याचे प्रमाण एवढे वाढले की त्याची त्यांना सवय होऊन बसली. माजी पोलिस महासंचालक पी.एस. पसरिचा यांच्या बाबतीत जेव्हा अधिक संपत्तीचा आरोप झाला त्यावेळी तर गृहमंत्री या नात्याने त्यांनी पसरिचांची बाजू एखाद्या निष्णात वकीलासारखी मांडली. आपण कसेही वागलो तरी आपली बाजू स्वत:च्या अंगावर घेणारा राजकारणी आयपीएस अधिकार्यांना न मागता मिळाला होता. छगन भुजबळ गृहमंत्री असताना त्यांच्यासमोर विदाऊट युनिफॉर्मा येण्याची ज्यांची हिंमत नव्हती तेच आबांशी साध्या कपड्यात येऊन इंग्रजीत बोलून स्वत: किती ग्रेट आहोत हे दाखवून देऊ लागले.
राजकारण बाजूला सारुन आबांनी ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव योजना राबवल्या. अगदी सार्याच नाही तरी निदान निम्म्या गावांना या योजनांचा फायदा झाला आहे हे विसरता येणार नाही. सतत प्रसिध्दीच्या प्रेमापोटी त्यांनी अशा अनेक योजना आखल्या असे बोलणारा एक वर्ग त्या काळात तयार झाला. पण अशा योजनांचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन करण्याची तयारी त्या वर्गाने दाखवली असती तर या माणसाचे मोठेपण कळले असते.
पुढेपुढे माध्यमांचे लाडके बनलेल्या आबांना त्यांच्या विरोधात काहीही लिहून आलेले रुचेना. एका ठिकाणी काही विरोधात आले तर दुसर्या ठिकाणी त्याची भरपाई कशी करायची याच्या खेळात पत्रकारांनीच त्यांना पध्दतशीरपणे गुंतवून टाकले. खूप काही करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असणारा हा मनस्वी नेता या सगळ्यात काही काळ अडकत गेला. २६/११ च्या घटनेने या सगळ्यावर कडी केली. ज्या माध्यमांनी त्यांच्यात प्रसिध्दी कशी मिळवावी याची बीजे रोवली, वाढवली त्यांनीच त्यांच्या एका वाक्याचा अर्धवट अर्थ लावून हे रोप उखडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्या काळात घडलेल्या सगळ्या प्रकाराने त्यांच्यातला सहृदयी माणूस अत्यंत अस्वस्थ झाला. त्यातून कसलेही स्पष्टीकरण देण्याच्या नादात न पडता राजीनामा देऊन एक तासाच्या आत स्वत:चे शासकीय निवासस्थान, गाड्या सोडून साधा अंगरक्षकही बरोबर न घेता ही वल्ली तासगावच्या दिशेने निघून गेली होती.
२६/११ नंतर झालेल्या बदनामीतून त्यांना पद सोडावे लागले खरे पण ते सोडताना त्यांनी दाखवलेल्या साधेपणाच्या प्रेमात ते स्वत:च पडले. वाचनाची प्रचंड आवड असलेला हा नेता. गृहमंत्रीपद सोडावे लागले त्यावेळी ते मनोरा आमदार निवासात रहायला आले. ज्या माध्यमांनी त्यांच्यावर सतत प्रकाशझोत ठेवला ती देखील त्यांच्यापासून दूर गेली, त्या अकरा महिन्याच्या अनुभवाने त्यांना खूप काही शिकवले.
नाफ्ता, पेट्रोल माफियांकडून आलेली आमिषे ‘मला लोकांच्या अन्नात माती कालवायची नाही’ असे म्हणत त्यांनी दूर सारली. मात्र तीच तडफ नाठाळ अधिकार्यांना वेसण घालताना त्यांना दाखवता आली नाही.
राजकारणात सगळे दिवस सारखे नसतात याची अखंड जाणिव असलेला हा नेता. पण त्यांनी कधी पुण्या मुंबईत स्वत:साठी घर घेतले नाही. ‘राजकारणातून बाहेर पडावे लागले तर सर्वाधिक काळ गृहमंत्रीपद भूषविणार्या या नेत्याकडे घर देखील नसेल’, असे म्हटले तर ते हसून त्यावर काहीही न बोलता दुसराच विषय सुरु करायचे..
- महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक गुढ रम्य कहाण्या त्यांच्या जाण्याने त्यांच्यासोबत कायमच्या पडद्याआड गेल्या आहेत. असा नेता तयार होण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात..
त्यांना स्वार्थही कधी कळला नाही. मंत्री असेपर्यंत आपले कुटुंब त्यांनी कधीही मुंबईच्या शासकीय घरात आणले नाही. पोलीस दलात असलेल्या सख्ख्या भावाला त्यांनी सतत साईडपोस्टींग दिल्या. त्यांच्या साधेपणा जपण्याचा त्रास त्यांच्या कुटुंबाला सहन करावा लागला.
स्वत: नामानिराळे रहात एखाद्याला वठणीवर कसे आणायचे एवढा मुरब्बीपणा त्यांच्यात नक्कीच होता. एखाद्याला खुले आव्हान देण्याची नैतिकता त्यांच्याजवळ खचाखच भरली होती. किंबहुना ती होती म्हणूनच ते असे आव्हान देण्याची भाषाही करायचे. शाळेत एखादा खोडकर मुलगा पहिल्या बाकावर बसलेल्या मुलाला चिमटा काढून मागे जाऊन कशी गंमत बघत बसतो तसे ते अनेकदा करत. मात्र एखादा गरीब, फाटका माणूस त्यांच्याकडे कोणाचाही वशिला न घेता आला तर त्याच्या मदतीसाठी ते धावून जात असत.