मुंबई ते पॅरिस
By Admin | Updated: November 22, 2015 18:03 IST2015-11-22T18:03:19+5:302015-11-22T18:03:19+5:30
दहशतवादी हल्ल्याला सामोरे जाणारे शहर आणि त्या हल्ल्याचे वार्ताकन करणारी माध्यमे यांनी अशा कसोटीच्या प्रसंगी कसे वागावे याचा नवा वस्तुपाठ पॅरिसचे नागरिक, सुरक्षा यंत्रणा आणि माध्यमांनी जगासमोर ठेवला आहे.

मुंबई ते पॅरिस
>- विश्राम ढोले
सार्वजनिक मानसिकता आणि माध्यमशैलीतल्या महत्त्वपूर्ण स्थित्यंतराचा प्रत्यय
पॅरिसमध्ये कॉन्सर्ट हॉल, स्टेडियम, रेस्तॉँसारख्या गर्दीच्या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. मृत्यू झाले. रक्तपात झाला. पण वाहिन्यांच्या चित्रफितीमध्ये ना रक्ताची थारोळी दिसतात, ना विखुरलेले मृतदेह. जखमींना मदत केली जात असल्याची, हादरून गेलेल्यांना धीर दिला जात असल्याचीच दृश्ये जास्त दिसली.हल्ल्यांचे गांभीर्य, त्यातील तीव्रता, दु:ख नक्कीच सांगितले जात होते; पण त्याला उत्तेजनेचे, आक्रोशाचे, आक्रंदनाचे, भयचकित झाल्याचे कोंदण दिले जात नव्हते. एका विचलित तरीही संयमित, शिस्तबद्ध मानसिकतेचे अस्तर सा:या वार्ताकनाला लाभले होते.
पॅरिसमधील 13/11चा आणि मुंबईतील 26/11चा दहशतवादी हल्ला यांच्यात बरेच साम्य आहे, असे म्हटले जाते. काही प्रमाणात ते खरेही आहे. हल्ल्यांचे लक्ष्य, स्वरूप, मृतांची संख्या वगैरे गोष्टी पाहिल्या तर हे साम्य जाणवतेही. पण अर्थात फरकदेखील बरेच आहेत. त्यातला एक महत्त्वाचा फरक प्रत्यक्ष हल्ल्यांपेक्षा हल्ल्यांना दिलेल्या प्रतिसादात दिसून येतो. अशा अघटिताला सुरक्षा यंत्रणा व सरकार यांना जसा प्रतिसाद द्यावा लागतो तसाच माध्यमे आणि लोकांनाही. या प्रतिसादातील फरक म्हणूनच बरेच काही सांगून जातो. विशेषत: माध्यमांनी दिलेल्या प्रतिसादातील फरक तर खूप बोलका आहे.
26/11च्या हल्ल्याचे भारतीय माध्यमांनी विशेषत: वृत्तवाहिन्यांनी जे चित्रण केले त्यावर खूप टीका झाली होती. आजही वृत्तवाहिन्यांच्या बेजबाबदार कामगिरीच्या संदर्भात 26/11चे उदाहरणच प्राधान्याने दिले जाते. मुंबईतील हल्ल्यांना वृत्तवाहिन्यांनी रनिंग कॉमेण्ट्रीसारखी सलग जवळजवळ 72 तास सलग प्रसिद्धी दिली आणि सुरक्षा यंत्रणा व कमांडोंच्या कारवाईचेही चित्रण दाखविल्याने आत दडून बसलेल्या दहशतवाद्यांचेच फावले हे या टीकेतले दोन महत्त्वाचे मुद्दे. याशिवाय वाहिन्यांनी असंवेदनशील पद्धतीने वार्तांकन केले, छत्रपती शिवाजी टर्मिनसपेक्षा ताज व ओबेरॉय या उच्चभ्रू हॉटेल्सवरील हल्ल्यांना जास्त प्रसिद्धी दिली, टीआरपी वाढविण्याच्या नादात चुकीची किंवा गोपनीय माहिती पसरवली असेही आरोप झाले.
ही टीका सरसकट योग्य आहे किंवा आरोप पूर्णपणो खरे आहेत असे येथे मुळीच सुचवायचे नाही.
नाटय़मयता, उत्तेजना यांनी भारलेल्या परिस्थितीजन्य गोष्टींमुळे काही चुका नकळतपणो होत गेल्या हेही खरे आहे. तरीही या टीकेतील आणि आरोपांतील तथ्यांश मात्र नाकारता येत नाही.
त्या पाश्र्वभूमीवर पॅरिसमधील हल्ल्याला माध्यमांनी दिलेला प्रतिसाद खूप वेगळा वाटतो. इथे भारतात बसून आपल्याला फ्रेंच माध्यमांचे वार्तांकन मिनिटामिनिटाला कळत होते असे नाही. भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहचणारे बहुतेक वार्तांकन बीबीसी किंवा अमेरिकी वृत्तवाहिन्यांनी केलेले होते. व्यवस्थेची जुळवाजुळव होईपर्यंत सुरुवातीचा काही काळ या वाहिन्यांनीही स्थानिक फ्रेंच वाहिन्यांचेच वार्तांकन उचलले. हे सर्व लक्षात घेतले किंवा वाहिन्यांच्या यू टय़ूबवर उपलब्ध असलेल्या चित्रफिती पाहिल्या तरी पॅरिसमधील हल्ल्यांना फ्रेंच माध्यमांनी किंवा तिथे असलेल्या इतर पाश्चात्त्य माध्यमांनी कसा प्रतिसाद दिला याची काही एक कल्पना येते. त्यामध्ये जाणवणारा एक महत्त्वाचा भाग म्हणजे हे सर्व वार्तांकन करताना त्यांनी दाखवलेला संयम. हा संयम जसा माध्यमांच्या प्रतिनिधींनी दाखवला तसाच तो माध्यमांना सामोरे जाणा:यांनीही दाखविला. कॉन्सर्ट हॉल, स्टेडियम, रेस्तॉँसारख्या गर्दीच्या ठिकाणी हे हल्ले झाले. मृत्यू झाले. रक्तपात झाला. पण वाहिन्यांच्या चित्रफितीमध्ये ना रक्ताची थारोळी दिसतात ना विखुरलेले मृतदेह. हल्ल्यांच्या ठिकाणावरच्या बहुतेक चित्रीकरणामध्ये जखमींना मदत केली जात असल्याचे, हादरून गेलेल्यांना धीर दिला जात असल्याचे किंवा जखमींना हलविले जात असल्याचीच दृश्ये जास्त आहेत. स्फोट, ओलिसनाटय़, गोळीबार, पोलिसांची कारवाई, चकमक अशा अनेक नाटय़मय गोष्टी घडल्या तरी गोळीबाराची, पळापळीची किंवा नाटय़मय घडामोडींची दृश्ये फारशी नाहीत. जी दृश्ये आहेत ती खूप लॉँग शॉटमधील. मूळ घडामोडींमधील नाटय़मता, दहशतक्षमता ब:यापैकी उणावून दाखविणारी. पोलिसांची कारवाई काय आणि कशी सुरू आहे याची फारशी कल्पना न येऊ देणारी. बहुतेक सा:या चित्रीकरणांमध्ये बातमीदारांचा ना घटनास्थळाच्या जवळ जाण्याचा अट्टहास होता ना ‘एक्सक्लुजिव्ह’ काही दाखविण्याची स्पर्धा होती. मदतकार्य सुरू असताना जखमींकडे किंवा त्यांच्या नातेवाइकांकडे जाऊन ‘प्रतिक्रिया’ घेण्याची किंवा त्यांच्या भावना टिपण्याची चढाओढही नव्हती. ज्या काही प्रतिक्रि या घेतल्या जात होत्या त्या मुख्यत्वे जरा शांत झालेल्या, धीर आलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या होत्या. काय झाले ते थोडक्यात सांगणा:या होत्या. या प्रतिक्रियांवर किंवा इतर चित्रणावर ना दु:खी सुरांचे पाश्र्वसंगीत लावले होते ना कॅमे:यासमोर वार्ताहरांने उत्तेजित स्वरात केलेला ‘हे बघा इथे कसे आक्रि त घडले. किती भयंकर झाले’ असा काही समारोप होता. हल्ल्यांचे गांभीर्य, त्यातील तीव्रता, दु:ख नक्कीच सांगितले जात होते, पण त्याला उत्तेजनेचे, आक्रोशाचे, आक्रंदनाचे, भयचकित झाल्याचे कोंदण दिले जात नव्हते. एका विचलित तरीही संयमित, शिस्तबद्ध मानसिकतेचे अस्तर सा:या वार्तांकनाला लाभले होते. हे खरे आहे की, मुंबईतल्या हल्ल्याचे भयनाटय़ एक दोन नव्हे तब्बल 72 तास चालले. त्या तुलनेने पॅरिसमधील हल्ल्याच्या सारा घटनाक्र म स्थानिक वेळेनुसार रात्री 9.2क् ते पहाटे 1 असा जेमतेम चार तासांत संपला. पण मुंबई हल्ल्याच्या पहिल्या चार तासांमधील भारतीय वाहिन्यांचे वार्तांकन आठवून पाहिले तरी दोन्हीमधला फरक लक्षात येईल. घटनास्थळाच्या अधिकात अधिक जवळ जाण्याची, राहण्याची, मिळेल ते टिपण्याची, टिपलेली प्रत्येक गोष्ट लाईव्ह दाखविण्याची, घटनाक्रमात नाटय़ शोधण्याची आणि ते शब्दांतून, हावभावातून आणि प्रसंगी पाश्र्वसंगीताचीही जोड देऊन अधोरेखित करण्याची आपल्याकडची टिपिकल शैली पहिल्या चार तासांमध्येच दिसून आली होती. पॅरिससारख्या शहरामध्ये मीडियाची उपस्थिती निश्चित लक्षणीय असते. गोष्टी क्षणार्धात टिपण्याची पत्रकारितेतील कौशल्ये आणि लाईव्ह जाण्याच्या सा:या तांत्रिक सुविधा तिथेही आहेतच. शिवाय हल्ले झाले त्या सर्व जागा सार्वजनिक असल्याने सीसीटीव्हीचे फुटेजही उपलब्ध असणार. असे असूनही पॅरिसमध्ये सात ठिकाणी झालेल्या चारेक तासांच्या हल्ल्यांची वाहिन्यांवर दाखविलेली एकूण दृश्ये आणि त्यातील विविधता संख्येच्या निकषावर तुलनेने खूपच कमी आहेत आणि सार्वजनिकरीत्या उपलब्ध चित्रीकरणामधील नाटय़मयता, उत्तेजना वगैरे गोष्टीही आपल्या तुलनेत ब:याच कमी आहेत. या चित्रीकरणामध्ये पोलीस फक्त पोलिसांचेच काम करताना दिसतात. कॅमे:यासमोर येऊन माहिती वगैरे देताना किंवा कामगिरी कशी फत्ते केली वगैरे तपशील देताना दिसत नाहीत.
आपल्याकडे 26/11च्या वेळी पोलीसच नव्हे तर एनएसजी आणि कमांडो पथकांच्या अधिका:यांनीही कॅमेरासमोर येण्याबाबत उत्सुकता आणि उत्साहच दाखविला होता हा फरक इथे लक्षात घेण्यासारखा आहे.
पॅरिस हल्ल्यांच्या वार्ताकनात फ्रेंच माध्यमांनी प्राधान्य दिले ते मुख्यत्वे फ्रेंच राष्ट्रध्यक्षांच्या निवेदनाला. माध्यमांचे कॅमेरे गल्लीतल्या पुढा:यापासून ते स्वयंघोषित तज्ज्ञांपर्यंत प्रतिक्रि या घेत फिरले नाहीत. फुटबॉल मॅच किंवा रॉक कॉन्सर्ट अशा मुळातच उत्तेजनेसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि एकाचवेळी अनेक कॅमे:यांनी टिपल्या जात असलेल्या जागांवर दहशतवादी हल्ल्यांसारखी भीषण नाटय़मय घटना घडूनही त्यासंबंधी वाहिन्यांवरून दाखवलेल्या चित्रफितींमध्ये त्यापैकी कशाचाही फारसा अंदाज लागत नाही. हे एकतर माध्यमांनी स्वत:हून घातलेले बंधन असेल. किंवा सुरक्षा यंत्रणांनी घातलेले निर्बंध. बहुधा दोन्हीही. घटनेनंतर काही वेळातच फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी आणीबाणी जाहीर केली. सर्व सार्वजनिक व्यवहारांवर कडक निर्बंध लादले. परिस्थिती हाताळण्यासाठी आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना सर्वाधिकार बहाल केले. आणि एरवी स्वातंत्र्य, मुक्त अभिव्यक्ती वगैरेचा आपल्यादृष्टीने बरेचदा अतिरेकी वाटणारा आग्रह धरणा:या फ्रेंच जनतेने आणि माध्यमांनी त्याचा स्वीकारही केला. इतकेच नव्हे तर अडकलेल्या लोकांना निदान रात्रीपुरता आसरा देण्यासाठी, त्यांना मोफत टॅक्सीसेवा पुरविण्यासाठी सोशल मीडियाचा आणि मास मीडियाचा उत्तम वापरही लोकांनी केला.
फ्रान्स आणि जर्मनीची फुटबॉल मॅच जिथे सुरू होती त्या स्टेडियमबाहेर तीन आत्मघातकी बॉम्बस्फोट झाले. आत प्रचंड गर्दीत चक्क फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हा सामना पहात होते. अशा परिस्थितीत घबराट, गोंधळ, चेंगराचेंगरी आणि प्रचंड जीवितहानी होण्याची मोठीच शक्यता होती. पण सुरक्षा यंत्रणा आणि राष्ट्राध्यक्षांनी अतिशय धैर्याने, समयसुचकतेने आणि शांततेने ती परिस्थिती हाताळली. सामना पूर्ण झाल्यावरच लोकांना झाल्या प्रकारची कल्पना देण्यात आली. लोकही कोणतीही घबराट न पसरविता राष्ट्रगीत गात शिस्तीत स्टेडियमबाहेर पडले. एवढय़ा मोठय़ा स्टेडियमवरील हल्ल्यात एकूण चार लोक ठार झाले. त्यातले तीन तर सुसाइड बॉम्बर होते.
त्यामुळे हा फक्त माध्यमांच्याच कार्यशैलीतला फरक आहे असे नाही. अशा परिस्थितीचा सामना करणा:या सा:याच व्यवस्थांच्या आणि एकूणच समाजजीवनाच्या वैशिष्टय़ांमधील हा फरक आहे. शिस्त, संयम, नेमकेपणा, सावधगिरी, सुसंघटन, व्यवस्थाप्रियता ही काही आपल्या सामाजिक, सार्वजनिक वर्तनाची वैशिष्टय़े नाहीत. त्यामुळे याच समाजव्यवस्थेचा, सार्वजनिक व्यवस्थेचा भाग असलेल्या माध्यमांमध्ये ती वैशिष्टय़े पुरेशा प्रमाणात सापडणार नाहीत, हे उघड आहे. आपल्या सार्वजनिक जगण्यामध्ये बोलघेवडेपणा, अघळपघळपणा, मेलोड्रामा, भावनाप्रधानता, स्वयंस्फूर्तता, जुगाडूपणा भरपूर. सिनेमा आणि टीव्हीच्या पडद्यावर मेलोड्रामा बघण्याची सवयही जुनी. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब अगदी बातम्यांमध्येही दिसते. एरवी या सगळ्यांकडे एकेका समाजाची ऐतिहासिक, सांस्कृतिक वैशिष्टय़े म्हणूनही बघता येऊ शकते. पण आणीबाणीच्या प्रसंगी, संकटाच्या प्रसंगी ही सांस्कृतिक वैशिष्टय़े, वैशिष्टय़े न राहता दुर्गुण बनतात आणि दहशतवादी हल्ल्यांसारख्या प्रसंगात तर घातकही.
अशा प्रसंगी चेकाळल्यासारखी वागणारी माध्यमे प्रत्यक्ष परिस्थिती चिघळविण्यास कशी कारणीभूत ठरतात हे आपण 26/11च्या वेळी पाहिले, वाचले आणि अनुभवले आहे. अशा हल्ल्यांचा सामना करण्यास हळूहळू तयार होणारे जग आता अशा प्रसंगी माध्यमांच्या वापराबाबत अधिक सजग होत चालल्याचे दिसते आहे. त्याचे फार सकारात्मक प्रत्यंतर फ्रान्समध्ये आले, असे नक्की म्हणता येईल. दहशतवादविरोधातल्या व्यूहरचनेमध्ये माध्यमांचा सकारात्मक वापर करून घेण्याचा अधिकार सुरक्षा यंत्रणांना असला पाहिजे. त्यासाठी थोडे निर्बंध सहन करण्याची, संयम बाळगण्याची, उत्तेजना कमी करण्याची सवयही लावायला हवी. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बेलारूस, कॅनडा यासारख्या देशांनी त्यादृष्टीने माध्यमांसाठी कायदे केले आहेत. आचारसंहिता तयार केल्या आहेत. मुंबई हल्ल्यानंतर आपल्याकडेही त्यादृष्टीने काही कायदे करण्याचा प्रयत्न झाला, पण माध्यमांनी त्याला विरोध केल्यामुळे तो बारगळला. अर्थात हे खरेच आहे की, त्याच दरम्यान वृत्तवाहिन्यांच्या संघटनांनी स्वनियमनाची एक आचारसंहिता स्वत:साठी तयार केली. ते स्वागतार्ह आहे. पण पुरेसे नाही. 26/11च्या सार्वजनिक मानसिकतेला आणि माध्यमशैलीला 13/11कडून शिकण्यासारखे बरेच आहे.
दहशतीचा ‘माध्यम’ मुकाबला
हल्ला करणो, माणसांना ठार करणो ही दहशतवाद्यांच्या योजनेतील फक्त एक पायरी असते. उद्दिष्टय़ नव्हे.
नावाप्रमाणोच त्यांचे उद्दिष्टय़ दहशत पसरविणो हे असते. त्याकामी माध्यमांचा वापर त्यांच्यासाठी अपरिहार्य असतो. आधुनिक समाजव्यवस्थेतील माध्यमांच्या स्थानाचा आणि कार्यपद्धतीचा दहशतवादी अगदी चपखलपणो वापर करून घेत असतात. हिंसक, नाटय़मय, दृश्यात्मक घटना घडवून नाक दाबले की माध्यमांकडून मिळणा:या प्रसिद्धीचे तोंड अगदी अपरिहार्यपणो उघडते हे दहशतवाद्यांना चांगलेच माहीत असते. जितकी जास्त हिंसा, नाटय़मयता, उत्तेजना, दृश्यात्मकता तितकी प्रसिद्धी जास्त हे माध्यमांच्या डीएनएचे वैशिष्टय़ही त्यांना माहीत असते. ही प्रसिद्धी आणि त्यातून निर्माण होणारी, स्थानिक ते जागतिक पातळीवर पसरत जाणारी दहशतीची भावना हाच दहशतवाद्यांचा खरा प्राणवायू.
ही प्रसिद्धी त्यांचे उद्दिष्ट तर साध्य करूनच देतेच, पण नव्या दहशतवाद्यांच्या भरतीला पोषक वातावरणही निर्माण करते.
हा केवळ तर्क किंवा अनुभव नाही. या संबंधात झालेल्या विविध संशोधनातूनही त्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यामुळे दहशतवादीविरोधी लढय़ामध्ये अशा हल्ल्यांना अजिबातच प्रसिद्धी देऊ नये हा उपाय तत्त्वत: सुचविता येण्यासारखा असला तरी तो अजिबातच व्यवहार्य नाही. आणि योग्यही नाही. पण अशा हल्ल्यांना एक अतिविशिष्ट परिस्थिती मानून माध्यमांनी त्याला प्रसिद्धी दिली पाहिजे आणि त्यासाठीचे वेगळे, अधिक जबाबदार निकष तयार करून ते निभावले पाहिजेत.
ही जबाबदारी कशी निभावता येते, याचा धडा फ्रान्समधल्या माध्यमांनी घालून दिला आहे.
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)
vishramdhole@gmail.com