आई हिंदू, वडील मुस्लीम. मी कोण?
By Admin | Updated: April 12, 2015 16:40 IST2015-04-12T16:40:27+5:302015-04-12T16:40:27+5:30
देवघरातील मूर्तीसमोर तसेच देवतांच्या फोटोसमोर राणीने खिरीचा नैवेद्य दाखवला. तिच्या बाजूला बसलेली समीरा आपल्या मोठय़ा गरगरीत डोळ्यांनी आईची पूजा लक्षपूर्वक बघत होती.

आई हिंदू, वडील मुस्लीम. मी कोण?
मूळ तेलुगु लेखक : सलीम
मराठी अनुवाद : कमलाकर धारप
----------
देवघरातील मूर्तीसमोर तसेच देवतांच्या फोटोसमोर राणीने खिरीचा नैवेद्य दाखवला. तिच्या बाजूला बसलेली समीरा आपल्या मोठय़ा गरगरीत डोळ्यांनी आईची पूजा लक्षपूर्वक बघत होती.
‘‘ही खीर तू कुणाला देणार आहेस अम्मी?’’ - समीराने विचारले.
‘‘तुलाच देणार आहे’’ - राणी म्हणाली.
‘‘मग आत्ताच दे’’ - समीरा लाडावत हट्ट केला.
‘‘असं नाही करायचं, आपण देवाला नैवेद्य दाखवला आहे ना? मग आधी देव खाईल, मग आपण खाऊ’’ -राणीने तिला समजावले.
‘‘देव खरंच येऊन ही खीर खाईल का? त्यालाही आपल्यासारखी भूक लागते का?’’ - बालसुलभ कुतूहलाने समीराने विचारले.
‘‘होय, भगवान येतात आणि गुपचूप प्रसाद खाऊन जातात.’’
‘‘त्यांना आपली भीती वाटते का?’’
‘‘अग देवाला आपली भीती कशी वाटेल? पण ते आपल्याला दिसत नाहीत. एवढं मात्र खरं’’ - राणी म्हणाली.
राणीने सांगितल्यावर समीरा विचारात पडली. मग तिने प्रश्न केला, ‘‘पपा पूजा का करीत नाहीत?’’
समीराने कोणताही प्रश्न केला की तिला उत्तर देण्याचं टाळायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं.
राणी म्हणाली, ‘‘पपा जी पूजा करतात त्याला नमाज म्हणतात.’’
‘‘मग तू का नाही नमाज म्हणत?’’
‘‘कारण पपा ज्यांची पूजा करतात आणि मी ज्यांची पूजा करते ते भगवान वेगवेगळे आहेत’’ - राणी म्हणाली.
‘‘एकूण किती भगवान आहेत?’’
‘‘करोडो देव आहेत असं म्हणतात.’’
समीराला करोडोचा अर्थ समजला नाही म्हणून तिने विचारले, ‘‘त्यांची नावं सांग ना?’’
राणीला उत्तर सुचेना. ती म्हणाली,
‘‘पपांना जाऊन विचार. मला माझी पूजा करू दे.’’
मी समोरच्या खोलीत वर्तमानपत्र वाचत बसलो होतो. समीरा माङयासमोर उभी होत म्हणाली, ‘‘पपाजी, अम्मी म्हणते की तिचा देव वेगळा आहे आणि तुमचा वेगळा. असं का? त्यांचं भांडण झालंय का?’’
‘‘तसं नाही बेटा, मी मुसलमान आहे म्हणून माझा भगवान अल्ला आहे. तुझी अम्मी हिंदू आहे. तिच्या देवघरात जेवढे देव आहेत ते सगळे हिंदूंचे देव आहेत. ती त्यांची पूजा करते’’ - मी खुलासा केला.
‘‘ती तिच्या देवांना प्रसाद ठेवते. तुमच्या देवाला भूक लागत नाही का?’’
‘‘नाही. कारण अल्लाचं कोणतंही रूप नसल्यानं त्यांना भूक-तहान काही नसतं’’ - मी म्हणालो.
‘‘अम्मी हिंदू आहे आणि तुम्ही मुसलमान आहात, मग मी कोण आहे?’’ - समीराने विचारले
‘‘तू तर सोनपुतळी आहेस गं’’ - मी तिला कडेवर घेत म्हणालो, तशी ती हसायला लागली.
समीरा जसजशी मोठी होऊ लागली तसतसे तिचे प्रश्नही अवघड झाले. नाना प्रश्न विचारून ती आम्हाला हैराण करायची.
ती सातवीत शिकत असतांना एकदा मला बिलगून ती म्हणाली, ‘‘ पपा, आपलं हे जग अल्लानं कसं बनवलं हे तुम्ही मला एकदा समजावून सांगितलं होतं - ते पुन्हा समजावून सांगा ना?
‘‘ अल्लानं ही सृष्टी सहा दिवसात निर्माण केली’’- मी तिला सांगायला सुरुवात केली, ‘‘ पहिल्या दिवशी त्याने अंधार आणि उजेड निर्माण केला. दुस:या दिवशी आकाश आणि समुद्र, तिस:या दिवशी पृथ्वी व झाडे, झुडुपे, चौथ्या दिवशी आकाशातील सुर्य, चंद्र, तारे पाचव्या दिवशी पाण्यात वास्तव्य करणारे जीव आणि आकाशात उडणारे पक्षी निर्माण केले. तर सहाव्या दिवशी जमिनीवर वास्तव्य करणारे प्राणी आणि मानव यांची त्याने निर्मिती केली’’
काही क्षण विचार करुन तिने मला विचारलं ,
‘‘ अल्लाने सूर्य व चंद्र यांची निर्मिती चौथ्या दिवशी केली होती. तेच आपल्याला उजेड आणि अंधार देत असतात ना? मग पहिल्या दिवशी अंधार आणि उजेड कुठून आला?’’
तिचं म्हणणं बरोबर होतं. तिच्या या प्रश्नाचं उत्तर माङयाजवळ नव्हतं. कारण माङया मनात हा प्रश्न कधी आला नव्हता! समीरा केवढी विचार करते, या विचाराने मी चकित झालो. पण तिच्या प्रश्नाचं काहीतरी उत्तर देणं आवश्यक होतं, ‘‘ अग, हा सगळा उजेड अल्लानेच निर्माण केला त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नसतं.’’
‘‘ मग हे आकाशातील ग्रह, आकाशगंगा, कुणी निर्माण केले?’’
-तिच्या या प्रश्नाचं उत्तर माङयाजवळ नव्हतं म्हणून मी काहीच बोललो नाही.
समीरा दहावीत गेली तेव्हा तिला जात-धर्म यांच्यातील फरक समजायला लागला. काहीजातीची माणसं अहंकारी का असतात आणि त्याच्यात ताठा का असतो हेही तिला कळायला लागलं होतं. खालच्या जातीचे लोक समाजात नीच का समजले जातात आणि तसे समजण्यामागे कुणाचें कारस्थान आहे हे ही तिला समजू लागलं होतं. विज्ञानावर तिचा जसजसा विश्वास बसू लागला तसतसा तिचा परमेश्वरावरचा विश्वास उडू लागला होता.
एक दिवस समीरा मला म्हणाली, ‘‘ सहा दिवसात या सृष्टीची निर्मिती झाली ही बाब खोटी आहे. एकेक प्राणी तयार करण्यापासून मनुष्य तयार करण्यार्पयत सर्व काही तयार करायला कित्येक कोटी वर्षे लागली असतील.’’
‘‘ तुझं म्हणणं बरोबर आहे पण परमेश्वराचं एक वर्ष कोटी वर्षाइतंक असतं,’’- राणीने खुलासा केला.
पण समीराचं तेवढय़ानं समाधान झालं. ‘‘ नाही तुमचं म्हणणं विकासाच्या सिद्धान्ताच्या अगदी विरुद्ध आहे. जमिनीवर राहणारे प्राणी निर्माण करण्यापूर्वी परमेश्वराने जलचर आणि पक्षी यांची निर्मिती केली हे मी मान्यच करु शकत नाही.’’- तिने ठामपणो सांगितले.
राणी जेव्हा पूजेला बसायची तेव्हा ती कधीकधी समीराला बाजुला बसवून पूजा करायची. मग समीरा तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती करायची.
‘‘ आपण परमेश्वराची पूजा कशासाठी करायची?’’- तिने तिच्या अम्मीला विचारले.
‘‘ परमेश्वराने आपल्याला जन्म दिला म्हणून त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण पूजा करतो.’’- राणीने सांगितले.
‘‘मला जन्म देणारी तू आहेस, पिताजी आहेत. न दिसणा:या परमेश्वराला येथे स्थान नाही’’- समीरा म्हणाली.
‘‘ हे बघ समीरा आपण परमेश्वराची पूजा मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती व्हावी यासाठी करीत असतो.’’- राणीने खुलासा केला.
‘‘ अम्मी, स्वर्ग, नरक या सगळ्या मानवनिर्मित संकल्पना आहेत. पाप केले तर आपल्याला शिक्षा होईल असे भय वाटावे यासाठी स्वर्ग आणि नरकाची कल्पना माणसानेच निर्माण केली आहे. माणसाला आता ब:याच गोष्टीची जाणीव झाली आहे. देवळात चोरी होते तेव्हा परमेश्वर त्या चोराला शिक्षा करु शकत नाही.’’- समीराने आपले विचार मांडले.
‘‘ इस्लामने एकच जन्म मानला आहे. परमेश्वराला दागिने घालणो, पोशाख चढवणो हे अवडंबर इस्लामला मान्य नाही. हात तोंड धुवून दररोज पाच वेळा नमाज केला तरी पुरेसा होतो.’’- मी म्हणालो.
त्यावर समीरा म्हणाली, ‘‘ पप्पा पद्धत कोणतीही असो पण धर्म माणसाच्या प्रगतीत अडथळे निर्माण करीत असतो. जे लोक अल्लाची प्रार्थना करीत नाहीत त्यांचा सर्वनाश होईल असे म्हणतात. पण इतर धर्माचे लोक अल्लाची प्रार्थना करीत नसूनही सुखाने जीवन जगत असतात. लोकांना भीती दाखवून त्याच्यावर हुकूमत गाजवता यावी म्हणून हे सारं नसतं का?’’
आम्ही समीराचे म्हणणो खोडून काढण्याचा प्रयत्न केला नाही.
समीरा इंटरला गेली तेव्हा मी तिला माङयाजवळ बसवून सांगितले, ‘‘ हे पहा बेटा, आम्ही दोघांनी तुङयावर धर्म लादण्याचा प्रयत्न केला नाही. मोठी झाल्यावर तूच याबाबत निर्णय करशील असे आम्हाला वाटत होते.’’
‘‘ पण पप्पा, माझा भगवान आणि अल्ला या दोघांवरही विश्वास नाही. तेव्हा मी धर्म निवडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही’’- समीरा म्हणाली.
‘‘ बेटा धर्म म्हणजे केवळ भगवान किंवा अल्ला नाही. तर तो जीवन जगण्याची पद्धतीही देत असतो’’- मी म्हणालो.
‘‘ माणसाला धर्माशिवाय जगता येणार नाही का? माझी जीवन जगण्याची पद्धत तुमच्या दोघांपेक्षाही निराळी आहे तर मग मी कशाला धर्माची निवड करु?’’- समीरा म्हणाली.
‘‘ तू नीट विचार करुन हा निर्णय जर घेतला असशील तर मग ठीक आहे.’’ राणी म्हणाली.
‘‘ अम्मी, मी नीट विचार केलाय. जन्मापासून मुलांना धर्माशी जखडण्यात येतं, मग त्यांच्या रोमारोमातून धर्म भिनू लागतो. तुमच्याप्रमाणो सगळे आईबाप मुलांना त्यांचा धर्म निवडण्याची मुभा देतील तर सर्व मुले धर्मापासून दूर राहण्याचीच निवड करतील. मी कुंकू लावते कारण ते लावल्याने मी सुंदर दिसते, ती हिंदुत्वाची निशाणी आहे म्हणुन नव्हे. बुरखा घालणं जर मला आवडलं तर मी बुरखा घालीन पण मी मुस्लिम धर्म मानते म्हणून नाही. मला स्वातंत्र्य हवे आहे. धर्म आम्हाला बेडय़ा घालू पाहतो, जे मला बिलकुल पसंत नाही.’’- समीराने स्वच्छपणो स्वत:चे विचार मांडले.
‘‘ हे बघ मुली, माणुस चांगला व्हावा यासाठी काही नियम असणं, काही बंधन असणं आवश्यक आहे.’’- राणी समीराला म्हणाली.
‘‘ तुझं म्हणणं मला मान्य आहे.’’- समीरा म्हणाली, ‘‘ पण चांगला माणुस होण्यासाठी धर्म आवश्यक आहे हे मला मान्य नाही. त्यासाठी गरज आहे जीवनासंबंधी चांगली समज असण्याची आणि निर्धाराची! या दोन्ही गोष्टी माङयापाशी आहेत. असा विचार करणारी कदाचित आज मी एकटी असेन. अल्पसंख्याक असेन पण येणारा काळ माङया विचारांचा असेल. त्यावेळी जात, धर्म गोष्टी कुठल्या कुठे वाहून गेलेल्या असतील.’’
- तिच्या बोलण्यात मला निर्धार जाणवत होता आणि तिच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसत होती.
(समाप्त)
---------------------
राणीची गोष्ट : चार
सय्यद सलीम या तेलुगु भाषेतील आघाडीच्या लेखकाची नवी कादंबरी : राणीची गोष्ट! एका आधुनिक हिंदू- मुस्लीम जोडप्याचा सहप्रवास अनेक टप्पे ओलांडून एका नव्या वळणावर येतो. या जोडप्याची तरुण मुलगीही त्यांच्यासारखीच किंबहुना त्यांच्यापेक्षा आधुनिक विचारांची. आयुष्य जगायचं तर त्यासाठी कशाला हवा धर्म? - असा बंडखोर विचार ती मांडते. काय आहे तिचं नेमकं म्हणणं? धर्माशिवाय कसं जगता येऊ शकतं?. या लेखमालेतला हा चौथा आणि अखेरचा संपादित अंश!