मराठी विश्वकोशाचे जनक..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 07:00 IST2019-06-02T07:00:00+5:302019-06-02T07:00:09+5:30

वेद, उपनिषदे, धर्मशास्त्र, अशा प्राचीन धर्मग्रंथांचे गाढे अभ्यासक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा नुकताच २५ वा स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख... ..........

Marathi encyclopedia founder ..! | मराठी विश्वकोशाचे जनक..! 

मराठी विश्वकोशाचे जनक..! 

 - अमेय गुप्ते- 
थोर विचारवंत व संस्कृत आणि मराठी भाषेचे गाढे अभ्यासक म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी! २७ जानेवारी १९०१ रोजी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे जन्मलेल्या जोशींनी, विनोबा भावे यांच्याकडून इंग्रजी शिकून आधुनिक पाश्चात्य विचार आत्मसात केले. त्यांचे वडील बाळाजी जोशी हे खान्देशातील पिंपळनेर येथे पौरोहित्य करीत असत. वयाच्या आठव्या वर्षी बाळाजींनी लक्ष्मणला वेदांचे अध्ययन करण्यास आरंभ केला.
सन १९१४ मध्ये त्यांच्या वडिलांनी त्यांना सातारा जिल्ह्यातील वाई येथे आणले व तेथील नारायणशास्त्री मराठे, स्वामी केवलानंद यांच्याकडे लक्ष्मणशास्त्री न्याय, वेदांत, मीमांसा यांचे अध्ययन करू लागले. पुढील अभ्यासासाठी ते काशीला गेले व बामाचरण भट्टाचार्य आणि राजेश्वरशास्त्री द्रविड या विद्वान पंडितांकडे त्यांनी न्यायाचे धडे घेतले. कोलकाता येथील संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ‘तर्कतीर्थ’ ही पदवी प्राप्त केली. त्या नंतर ते वाई येथील प्राज्ञपाठशाळेत अध्यापन करू लागले. रॉयवादी विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. लक्ष्मणशास्त्रींनी धर्मकोशाच्या संपादनाचे अवघड कार्य केले. यात जुन्या धर्मग्रंथातील समाजशास्त्रीय हिंदूंच्या सामाजिक संस्थांबद्दल आध्यात्मिक असे सर्व विचार एकत्र करून कोशाच्या स्वरूपात मांडले. शिवाय सांस्कृतिक, सामाजिक आणि तत्त्वज्ञानविषयक, चिंतनपर साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी ‘नवभारत’ हे मासिक सुरू केले. महत्त्वाचे म्हणजे हरिजन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय वसतिगृह त्यांनी सुरू केले.
शास्त्रीजींची साहित्यसंपदा विपुल असून, त्यांनी ‘शुद्धी सर्वस्वं’ (१९३४) हा पहिला संस्कृतग्रंथ लिहिला. त्यानंतर ‘आनंदमीमांसा’ (१९३८), ‘हिंदुधर्माची समीक्षा’ (१९४१), जडवाद (१९४१), वैदिक संस्कृतीचा इतिहास (१९५१), आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धान्त (१९५३) हे ग्रंथ लिहिले. तसेच राजवाडे लेखसंग्रह (१९५८), लोकमान्य टिळक लेखसंग्रह (१९५८) या ग्रंथांचे संपादन केले. त्यांचे अनेक लेख साप्ताहिके व नियतकालिकांतून प्रसिद्ध होत असत. महात्मा फुले याच्या जीवनकार्यावर त्यांच्या ‘ज्योती निबंध’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. १९ नोव्हेंबर १९६० रोजी मराठी भाषा व साहित्य यांच्या सर्वांगीण विकास करून साहित्याबरोबर इतिहास व कला या क्षेत्रातील महाराष्ट्राचा थोर वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ’ या संस्थेची स्थापना केली. त्याचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान लक्ष्मणशास्त्रींना मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसमयी जी धोरणेविषयक सूत्रे हाती घेतली, त्यानुसार शास्त्रीजींच्या अध्यक्षतेखाली या मंडळांचे काम चालत असे. १ डिसेंबर १९८० रोजी साहित्य मंडळाची पुनर्निर्मिती होऊन, ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश  निर्मिती मंडळ’ या संस्थेची स्थापना झाली व त्याचे प्रमुख लक्ष्मणशास्त्री होते. विसाव्या शतकातील विज्ञानयुगात मराठी वाचकाला वेगवेगळ्या गोष्टींची मराठीत माहिती मिळावी यासाठी त्यांनी ‘मराठी विश्वकोश’ या ग्रंथाची निर्मिती केली. आज इंग्रजीत अनेक संदर्भग्रंथ असताना, मराठीत मात्र विश्वकोश हाच समग्र संदर्भग्रंथ ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन, प्रत्येक नोंद परिपूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विश्वकोशाचे हे कार्य म्हणजे जणू  ज्ञानप्रसाराची मुहूर्तमेढच आहे. त्यांनी विश्वकोशाच्या एकूण १७ खंडांचे संपादन केले.
या विश्वकोशाच्या निर्मितीमागे जनतेच्या भाषेत ज्ञानसंक्रमण करणे हीच सांस्कृतिक भूमिका आहे. १९५४ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण असे अनेक मानसन्मान लाभले. भारताच्या घटनेचे ‘संविधान’ हे संस्कृत भाषांतर त्यांनी केले. दि. २७ मे १९९४ रोजी वयाच्या ९३ व्या वर्षी शास्त्रीजींचे निधन झाले. एक प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व या विश्वातून निघून गेले. पण जरी आज ते आपल्यात देहाने नसले, तरी मराठी भाषेचा मानकरी असलेल्या विश्वकोशाद्वारे आपल्यातच आहेत यात शंका नाही. 
 (लेखक साहित्याचे अभ्यासक आहेत).

Web Title: Marathi encyclopedia founder ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.