लिओनेल मेस्सी - कॅच मी. इफ यू कॅन!

By Admin | Published: July 2, 2016 02:42 PM2016-07-02T14:42:54+5:302016-07-03T16:49:47+5:30

त्याच्या पायातली जादू वयाच्या पाचव्या वर्षीच प्रशिक्षकांच्या लक्षात आली होती. पण हार्मोन्सच्या कमतरतेमुळे दहाव्या वर्षीच त्याचं फुटबॉल करिअर जवळजवळ संपलं होतं. मात्र काहीही झालं तरी तो संघात हवाच म्हणून तेराव्या वर्षी अगदी पेपर नॅपकिनवर स्पेनच्या बार्सिलोना क्लबसोबत त्याचा करार झाला आणि त्याला नवं आयुष्य अन् जगाला ‘गोल्डन बूट’ मिळाला.

Lionel Messi - Catch Me If you can! | लिओनेल मेस्सी - कॅच मी. इफ यू कॅन!

लिओनेल मेस्सी - कॅच मी. इफ यू कॅन!

googlenewsNext

- पवन देशपांडे 

त्याच्या पायातली जादू वयाच्या पाचव्या वर्षीच प्रशिक्षकांच्या लक्षात आली होती. पण हार्मोन्सच्या कमतरतेमुळे दहाव्या वर्षीच त्याचं फुटबॉल करिअर  जवळजवळ संपलं होतं. मात्र काहीही झालं तरी तो संघात हवाच म्हणून तेराव्या वर्षी अगदी पेपर नॅपकिनवर स्पेनच्या बार्सिलोना क्लबसोबत त्याचा करार झाला आणि त्याला नवं आयुष्य अन जगाला ‘गोल्डन बूट’ मिळाला. सचिनप्रमाणेच दहा नंबरचा जर्सी घालून त्यानंही फुटबॉलच्या  मैदानात राज्य केलं.पण एका पराभवानं निराश होऊन
तडकाफडकी निवृत्तीही घेतली. त्यानं आपला निर्णय बदलावा म्हणून सारं जग आता त्याच्या
‘रिव्हर्स किक’ची वाट पाहतंय..

जर्सी नंबर दहा. योगायोग असेल, पण हा दहा नंबर आपल्याकडे होता क्रिकेटच्या देवाचा. 

जर्सीवर १० दिसलं की सचिन आठवतो आपल्याला. सचिन तेंडुलकरसारखाच हा दहा नंबर आणखी एकाच्या जर्सीचा. लिओनेल मेस्सीचा. हा योगायोग असला तरी दोघांच्याही चाहत्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात. वागणंही सारखंच. मितभाषी. संयत. आणि खेळही तसाच. अफलातून! 

एक बॅटनं बोलणारा, दुसरा पायांची जादू दाखवणारा. सचिन मैदानात असेपर्यंत टीम इंडियाच्या विजयाची खात्री. तसंच मेस्सीचं. 

तो टीमममध्ये आहे म्हटलं तरी समोरच्या टीमचा पराजय पक्का समजायचं. हेच सूत्र चालत आलंय गेल्या कित्येक वर्षांपासून. अगदी मेस्सी लहान असल्यापासून त्याचं आणि यशाचं रसायन असं जुळलं की ते त्याला यशोशिखरावर घेऊन गेलं. आयुष्याच्या मैदानात अन् फुटबॉलच्या जीवनात आलेले सारेच अडथळे त्यानं लीलया पार केले अन् प्रत्येक क्षण गोलपोस्टमध्ये नेऊन साजरा केला. आपल्या देशाकडून सर्वांत लहान खेळाडू म्हणून खेळण्याचा मानही त्याला मिळाला. (सचिनसारखाच).

 
सचिनसारखंच तोही म्हणायचा. ‘‘जेव्हा मला वाटेल माझ्यातला फुटबॉलचा आनंद कमी होतोय, तेव्हा मी फुटबॉल खेळणं सोडून देईन.’’ यावेळी घडलं वेगळंच. त्याचा आनंद कमी झाला नसेल, पण त्याच्यावर अपेक्षांचं दडपणच एवढं आलं की तो आनंद कुठच्याकुठे पळून गेला अन् निराशेतच त्यानं निवृत्ती जाहीर करून टाकली.

साऱ्या फुटबॉलप्रेमींना धक्का देणारा निर्णय होता हा. सगळं जग ज्याच्याकडे एक सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून पाहत होतं; त्यानंच ‘अपूर्ण मी’ म्हणत फुटबॉलचं आंतरराष्ट्रीय मैदान सोडलं. 

अर्जेंटिनासाठी भूकंपच. चिलीसोबत कोपा अमेरिकेच्या फायनलमध्ये झालेला पराभव पचवणं सोप्पं; पण मेस्सीची निवृत्तीची घोषणा पचनी पडणं अवघड. फुटबॉलप्रेमींना शिरोधार्ह असणाऱ्या दिओगो मॅराडोनानं अर्जेंटिनाच्या प्लेअर्सना दिलेला इशारा साऱ्यांना आठवला.. ‘चषक घेऊन या, अन्यथा परतूच नका!’ 

फुटबॉल जगतातल्या बाप माणसानं दिलेला हा आदेश पाळता न आल्याचं बहुधा मेस्सीच्या जिव्हारी लागलं असावं. 

वयाच्या पाचव्या वर्षापासून मेस्सीची फुटबॉलशी नाळ जुळली. त्याला दोन भाऊ अन् एक बहीण. भावांसोबत तो फुटबॉलचा आनंद लुटायचा. (नंतर तेही फुटबॉलपटू झाले.) आपल्या मोठ्या भावांचे फुटबॉल सामने पाहायला मेस्सी जायचा. वडील जॉर्ज मेस्सी आणि सेली हे त्याला एकदा त्याच्या भावाच्या क्लबमध्ये सराव दाखवायला घेऊन गेले. तेव्हा मेस्सी होता पाच वर्षांचा. त्याला तिथं ‘लहान बाळ’ म्हणूनच ट्रीट केलं जात होतं. पण त्या वयातही जवळ असलेल्या फुटबॉलशी मोठ्या खुबीनं तो खेळत होता. हीच गोष्ट एका प्रशिक्षकानं पाहिली अन् त्याला मेस्सीतलं अनोखं रूप दिसलं. त्यांनी त्याला मैदानात उतरायला सांगितलं.

इथून पुढे मेस्सीचे पाय फुटबॉलला चिकटले. घरातल्या तिन्ही मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देणं खरं तर त्याचे वडील जॉर्ज यांच्यासाठी कठीण होतं. एका स्टील कंपनीत ते मॅनेजर होते. पण खर्चाला पुरेल एवढा पगार नव्हता. तरीही त्यांनी मेस्सीला फुटबॉल प्रशिक्षणाला पाठवलं आणि तो त्याच्या मोठ्या भावांपेक्षा सरस निघाला. त्याचा खेळ पाहून प्रशिक्षकही अवाक् व्हायचे. तीन-चार खेळाडूंचे अडथळे तो तेव्हापासूनच सहज पार करायचा.

अर्जेंटिनामध्ये त्याचा खेळ बहरत होता. एकापाठोपाठ एक स्पर्धा आपल्या सुंदर अशा गोलने गाजवत होता. त्यातच त्याला एक आजार झाला. तो होता ‘ग्रोथ हार्मोन’ कमी असण्याचा. तेव्हा तो केवळ दहा वर्षांचा होता. ग्रोथ हार्मोनची कमतरता हे त्याच्यासाठी खरं तर धोक्याचं होतं. कारण वाढत्या वयातच त्याची वाढ खुंटणार होती. हाडं मजबूत होणार नव्हती आणि मेंदूचाही नैसर्गिकरीत्या विकास होणार नव्हता. शिवाय ‘मसल पॉवर’ही वाढणार नव्हती. त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याकाळी एक हजार डॉलर दरमहा खर्च होता. वडिलांच्या कंपनीकडून विमाखर्च मिळायचा पण तो केवळ दोन वर्ष पुरेल एवढाच होता़ मेस्सी त्या काळात ‘नेवेल्स ओल्ड बॉईज’ नावाच्या क्लबकडून खेळायचा़ वडिलांनी आर्थिक मदतीसाठी नेवेल्स क्लबकडे विनंती करून पाहिली, पण प्रतिसाद मिळाला नाही. एका क्लबच्या मालकानं आधार देण्याचा प्रयत्न केला, पण त्या काळात देशात मंदी आली. त्या क्लब मालकाचा धंदा डबघाईस आला अन् त्यानंही मदत बंद केली. 

मेस्सीचे उपचार बंद झाले. पण त्याच्या घरच्यांनी प्रयत्न थांबवले नाही. बार्सिलोनाच्या कॅटालोनिया भागात त्यांचे नातेवाईक होते. त्यांनी तिथे प्रयत्न केले. अखेर स्पेनमध्ये आधार मिळाला. पण अडथळ्यांची शर्यत नसेल तर तो मेस्सीचा प्रवास कसला. बार्सिलोना क्लबच्या संचालक मंडळाने एवढ्या लहान वयात खेळाडूशी करार करण्यास नकार दिला. पण चार्ली रेक्सश नावाचे संचालक मात्र मेस्सीसाठी अडून बसले. त्यांना मेस्सी हवाच होता.त्यांना मेस्सीवर उपचार होणं गरजेचं वाटत होतं. म्हणून त्यांनी केवळ एका पेपर नॅपकिनवर करार केला. 

मेस्सीचं करिअर बदललं. अर्जेंटिना आणि आपला क्लब सोडून दुसऱ्या देशात खेळायला जाणं हा मेस्सीसाठी टर्निंग पॉइंट ठरला. त्याला चांगले उपचार मिळाले. मैदानात उतरण्यास आर्थिक बळ मिळालं आणि बार्सिलोनासारखा क्बलही मिळाला. त्यात त्याची कामगिरी डोळे दिपवणारी होती. 
काही वर्षांनी त्याला आपल्या देशाच्या अर्जेंटिनाच्या टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. 
दिएगो मॅराडोनासारखा दिग्गज खेळाडू याच टीमकडून खेळायचा. अगदी कमी वयात अर्जेंटिना संघात त्याला स्थान मिळालं. 

बार्सिलोनाकडून खेळताना त्यानं अनेक विक्रम प्रस्थापित केले. अनेक पुरस्कारही मिळवले. पण अर्जेंटिना संघाकडून खेळताना त्याला फारसं यश मिळालं नाही. त्याचं कारणही तसंच असल्याचं सांगितलं जातं. जी साथ त्याला बार्सिलोना संघात मिळते, ती अर्जेंटिना संघात मिळत नाही. एकखांबी तंबू असल्यासारखं टीम पुढे रेटत न्यायची हा एकच अजेंडा मेस्सीच्या डोक्यावर होता आणि कालांतराने तो अजेंडा ओझं व्हायला लागला. बार्सिलोनाकडून यशाच्या मार्गावर सुसाट धावणारा मेस्सी अर्जेंटिनाकडून खेळताना मात्र अपयशाचा धनी होऊन बसला. 

ज्या देशात फुटबॉलशी पाचव्या वर्षी नाळ जुळली त्या देशाच्या टीमसोबतची नाळ तोडायची वेळ त्याच्यावर आली. त्यानं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय फुटबॉलचं मैदान सोडलं. आता त्याची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.  मॅराडोनानंही त्याला परतण्याची विनंती केलीय. निर्णय मेस्सीच्या हाती आहे.  फुटबॉलला मिळालेली ही दैवी देणगी अवेळी आंतरराष्ट्रीय मैदानातून जावी, अशी कोणाचीच इच्छा नाही. 

‘‘कॅच मी! इफ यू कॅन!!’’ म्हणत मैदान गाजवणाऱ्या मेस्सीच्या निर्णयाकडे आता फुटबॉलपे्रमींचे डोळे आहेत. त्यानं पुनर्विचाराची किक मारावी एवढंच!

ब्रँड मेस्सी
मेस्सी संघात असावा याची किंमत किती असेल? जवळपास ५५१ कोटी रुपये. (८१४ लाख डॉलर). शिवाय जाहिराती आणि कंपन्यांसोबत केलेले कोट्यवधी रुपयांचे करार वेगळे. रिअल माद्रिदचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि बार्सिलोनाचा मेस्सी यांच्यात ही स्पर्धा कायमच असते. गेली काही वर्षं मेस्सी यात पुढे होता़ पण आता रोनाल्डो अव्वल नंबरी आहे. त्याला संघात असण्याची सर्वाधिक ६०० कोटी रुपये किंमत मोजली जाते. 
दोघांची शैली वेगळी, आक्रमकता वेगळी. त्यामुळं ते दोघंही जेव्हा एकमेकांसमोर उभे असतात तेव्हा तो सामना डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच मेस्सीला नायकेसारखा स्पॉन्सर मिळाला होता. त्यानंतर आदिदास. आतातर मेस्सीचाच एक ब्रँड आहे.. ‘आदिदास मेस्सी’ अशा नावाचा.

पेपर नॅपकिनवर करार
बार्सिलोना क्लबने मेस्सीला जेव्हा आपल्यात घेण्याचं ठरवलं तेव्हा मेस्सी केवळ १३ वर्षांचा होता. तोपर्यंत तो वाढला अर्जेंटिनामधल्या रोसारिओ शहरात. तेथून थेट स्पेन गाठलं तेही वयाच्या १३ व्या वर्षी. क्लबमध्ये समाविष्ट करण्याचा प्राथमिक करार केवळ एका पेपर नॅपकिनवर झाला होता. 

बोटासारखे पाय!
आम्हाला वाटायचं तो बोलूच शकत नाही. ‘म्यूट’ असल्यासारखा राहायचा, असं बार्सिलोना क्लबमध्ये मेस्सीसोबत खेळलेला गेरार्ड पिक्यू सांगतो. गेरार्ड म्हणतो, ड्रेसिंग रूममध्येही मेस्सी एका बेंचवर एकटाच बसलेला असायचा. जेव्हा तो संघात आला तेव्हा महिनाभर तर काहीच बोलला नाही. पण त्यानंतर आमचा संघ स्वीत्झर्लंडला स्पर्धेसाठी जाणार होता. तेव्हा कुठे तो खुलला. त्यानं इतरांशी बोलायला सुरुवात केली. त्याचे दोन्ही पाय हातांच्या बोटांसारखे होते. बारीक़ नाजूक़ आमचे कोच आम्हाला सांगायचे, ‘‘त्याच्या पायाशी जरा जपून राहत जा. तुमच्या धक्क्यानं ते तुटतील.’’ आम्ही म्हणायचो, ‘‘तशी वेळच येणार नाही. कारण तिथपर्यंत आम्ही पोहोचूच शकत नाही.’’ 
त्याचे पाय बारीक होते, पण तो इतका चपळ, वेगवान अन् बॅलेन्स सांभाळून असायचा की अनेक खेळाडूंचे अडथळे तो सहज पार करायचा. त्याच्या साऱ्याच सामन्यात हेच दर्शन घडतं. 

पायाला चुंबक
मेस्सी जेव्हा फुटबॉलशी खेळत असतो तेव्हा त्याच्या पायामध्ये बहुधा चुंबकत्व तयार होत असणार. कारण त्याचे पाय फुटबॉल सोडायला तयार नसतात. बॉल या पायातून त्या पायाकडे जात असतो. एखाद्या चेंडूवर हाताची बोटं फिरावी तसे त्याचे पाय फुटबॉलशी खेळत असतात. गोलपोस्टकडे जाताना अडथळा आला की लगेच तो चपळाईनं पार करतो. एकाच वेळी चार ते पाच अडथळे पार करताना त्याला प्रत्येक सामन्यात पाहिलं जाऊ शकतं. एकदा त्याच्या मार्गातले अडथळे दूर झाले की त्याचा स्पीड अचानक वाढतो. आणि बॉल गोलपोस्टच्या दिशेने गेलेला दिसतो.. 

आकाशाकडे डोळे अन् हात
शतक झळकावल्यानंतर सचिन तेंडुलकर आकाशाकडे बघतो, बॅट आणि हेल्मेट हाती घेऊन वर पाहून वडिलांना अभिवादन करतो. तसंच मेस्सीचंही. गोल मारल्याच्या आनंदानंतर मेस्सीही वर पाहतो. प्रत्येक गोलनंतर त्याची आजी त्याला आठवत असते. प्रत्येक गोल तो आपल्या आजीला समर्पित करतो. कारण त्याची आजी लहानपणापासून त्याला फुटबॉलसाठी प्रेरित करायची. त्याला क्लबमध्ये घेऊन जायची. घरातही त्याच्याशी खेळायची. तो अकरा वर्षांचा असताना तिचं निधन झालं अन् मेस्सीला एकटं पडल्यासारखं झालं. तेव्हापासून गोल डागल्यानंतर त्याचे डोळे आकाशाकडे आपोआप जाऊ लागले. 

प्रेमात पडलेला मेस्सी 
मेस्सीची प्रेयसी अ‍ॅण्टोनेल रोकुझो. वयाच्या पाच वर्षांपासूनच मैत्रीण. खरं तर ती त्याच्या मित्राची बहीण होती. आपण प्रेमात असल्याचं मेस्सीनं एकविसाव्या वर्षी जगजाहीर केलं अन् त्यानंतर तिच्याशीच लग्नही केलं. इतर दोन मॉडेलसोबतही त्याचं नाव जोडलं गेलेलं. पण ते तेवढ्यापुरतंच. मेस्सी घरात रमणारा. लग्न झाल्यानंतर आपण बाप होणाार असल्याचं त्यानं एका सामन्यात गोल झाल्यानंतर दर्शवून दिलं होतं. २०१२ साली इक्वेडोरसोबतच्या सामन्यात गोल मारल्यानंतर त्यानं फुटबॉल चक्क टीशर्टमध्ये टाकून बाप बनणार असल्याचं जगाला दाखवलं. त्याचं हे आगळंवेगळं सेलिब्रेशन पाहून चाहतेही खूश झाले होते. 

दाता मेस्सी
स्वत:ला झालेला आजार आणि त्यानंतर आलेल्या समस्यांना इतर कोणत्याही मुलाला तोंड द्यावं लागू नये यासाठी मेस्सीनं दाता म्हणून काम सुरू केलं. जेवढी कमाई करतो तेवढेच भरघोस दानही करतो. अनेक हॉस्पिटल, शैक्षणिक संस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधन, औषधोपचारातील संशोधन, गरिबांसाठी काम करणाऱ्या संस्था, क्रीडा संस्था, क्लब अशा साऱ्यांनाच तो मोठी आर्थिक मदत करतो. यासाठी त्याची खास ट्रस्टही आहे. युनिसेफच्या कामासाठीही तो हातभार लावतो. चांगल्या खेळाडूंना शिष्यवृत्तीही देतो.

(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

pavan.deshpande@lokmat.com

 

Web Title: Lionel Messi - Catch Me If you can!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.