Laxmi Street Clothing Store | लक्ष्मी रस्त्यावरील कापडाचे दुकाने 

लक्ष्मी रस्त्यावरील कापडाचे दुकाने 

अंकुश काकडे-  
धनराज गांधींचं हे दुकान १९७०मध्ये सुरू झालं ३ मजली भव्य दालन, शिवाय धनराज यांची देहयष्टी धिप्पाड, कडक खादीचा स्टार्च केलेला ड्रेस, दुकानाच्या बाहेर खुर्ची टाकून ते बसत. त्यामुळे त्यांचे अनेक ओळखीचे सहज दुकानात आकर्षिले जात. १०-१२ वर्षांपूर्वी वैभव बंद झाले, कुंटे चौकात असलेले जयहिंंद साडी सेंंटर फतेचंद, जीवराज, नगराज जैन यांनी सुरू केलं आणि पाहता पाहता कुंटे चौकात कजरी, वामा, जयहिंंद ही साड्यांची मोठी दालनं उभी राहली. त्यानंतर नगराजजींनी कापड व्यवसायास सुरुवात केली. जयहिंंद, मेवार, मेन्स एव्हेन्यू ही जेन्ट्स कापडासाठी प्रसिद्ध दुकानांची शृंखलाच उभारली, मुलगा दिनेश यांनी लक्ष देत असतानाच पारंपरिक लक्ष्मी रोडबरोबरच औंध, कोथरूड, हडपसर या ठिकाणीदेखील नवीन अद्ययावत भव्य शोरूम सुरू केली आणि नावारूपास आणली. हिंंद साडी सेंटरमध्येदेखील लग्नाच्या बस्त्यासाठी महिलांची मोठी गर्दी असे. ६० वर्षांपासून डायाभाई शहा यांनी सुरू केले. आज त्यांची तिसरी पिढी दुकानात लक्ष देत आहे.
याबरोबरच सिटी पोस्ट चौकात गेलं, की मूळचंद क्लॉथ कॉर्नर हे कुणीच विसरू शकणार नाही. १९४७ साली छोट्या जागेत सुरु झालेलं मूळचंद यांच्या दुकानानं आज तेथील ४ बाजू व्यापून टाकल्या आहेत. सुरुवातीला कॉर्नरवर असलेल्या या दुकानाची वाढ आता तेथेच जवळ असलेल्या तिरंगा भवनमध्ये ४-५ मजली भव्य दालनात झाली आहे. मूळचंद भंडारी यांनी भागीदारीत हे दुकान सुरू केलं होतं. त्यांच्यानंतर आज अनिल, निर्मल, राज या त्यांच्या मुलांनी काळाची पावले ओळखून भव्य शोरूम, वातानुकूलित दालन याकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे. मूळचंदचे आणखी एक वैशिष्ट्य ह्या दुकानाचा बोर्ड हा कायम झाकलेला असतो.
नेहमी कुणाचा ना कुणाचा वाढदिवस, राजकीय कार्यक्रम यांचे मोठे फ्लेक्स येथे लावले जातात; त्यामुळे दुकानचा बोर्ड झाकून जातो, पण काय करणार? यांना तेथे धंदा करायचा आहे ना. सिटी पोस्ट चौकातील आएखी एक भूषण म्हणजे बन्सीलाल क्लॉथ मार्केट. ‘बढिया कपडा-सस्ता दाम’ हे ब्रीद वाक्य, या दुकानचं वैशिष्ट्य आणि कांहीअंशी खरंही होतं. ६०-६५ वर्षांपूर्वी बन्सीलाल रामनाथ आगरवाल यांनी सिटी पोस्टासमोर सुरू केलंलं हे दुकान आज सिटी पोस्टाच्या चारही बाजंूना त्यांची दालनं झाली आहेत. वजनावर कापडविक्री हे या दुकानाचं वैशिष्ट्य होतं आणि या दुकानात मुस्लिम समाजाला आवडणारे कापड, साड्या मिळत असल्यामुळे मुस्लिम समाजात बन्सीलाल लोकप्रिय होतं. राजकुमार आगरवाल ह्यांनीदेखील दुकानाची प्रगती करण्यात मोठा हातभार लावला; पण कापड धंद्यातून शिक्षणक्षेत्रात राजकुमार कसे वळले, हेदेखील एक आश्चर्यच आहे. आज विश्वकर्मा इस्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी ही त्यांची संस्था इंजिीनिअरिंग शिक्षण देण्यामध्ये पहिल्या ३ क्रमांकांत आहे, शिक्षणक्षेत्रातही कापडाप्रमाणेच त्यांनी नाव कमावले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची चांदीची पालखी याच राजकुमार यांनी करून दिली आहे. शिवाय सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिर ही पुण्याच्या वैभवात भर घालणारे मंदिर आणि नवरात्रात तेथे होणारा उत्सव, महालक्ष्मी पुरस्कार यामुळे महाराष्ट्राचे आकर्षण झाला आहे.
या लक्ष्मी रोडवरील कापड दुकानदारांनी सलग ६ दिवस आपला व्यापार बंद ठेवला होता. ग्राहक पंचायतीचे बिंदुमाधव जोशी यांनी लक्ष्मी रोडवरील कापड व्यापारी फार महाग विक्री करतात, अशी तक्रार करत ग्राहक पंचायतीतर्र्फे आंदोलन उभं केले. प्रत्येक दुकानाबाहेर कार्यकर्ते हातात बोर्ड घेऊन उभे राहत. ‘आमची खरेदी बंद, तुमची विक्री बंद’ असे ते ग्राहकांना आवाहन करत. साहजिकच त्याचा व्यापारावर परिणाम झाला. याचा निषेध म्हणून लक्ष्मी रोडवरील सर्व व्यापारी एकत्र येऊन त्यांनीच व्यापार बंद ठेवला; त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ लागली. त्यामुळे शेवटी हे आंदोलनच मागे घेतले गेले.(क्रमश:) (लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक 
कार्यकर्ते आहेत.)

                    

Web Title: Laxmi Street Clothing Store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.