जर्नी सो फार..

By Admin | Updated: March 1, 2015 14:53 IST2015-03-01T14:53:09+5:302015-03-01T14:53:09+5:30

सिनेमापासून आर्किटेक्चरपर्यंत चौफेर मुशाफिरी केलेले ख्यातनाम कलावंत नचिकेत पटवर्धन यांनी कॅनव्हासवर साकारलेली अनोखी दुनिया आजपासून मुंबईत प्रदर्शित होते आहे.

Journey so far .. | जर्नी सो फार..

जर्नी सो फार..

>शर्मिला फडके
 
मिळवलेलं, गमावलेलं, तुटलेलं, जोडलं गेलेलं, जवळ आलेलं, दुरावलेलं, परतण्याची आस जागवणारं हे विश्‍व आहे. त्यात निरोप आहे, स्वागतही आहे. अस्वस्थतेचे, आव्हानांचे फटकारे, बोचरेपण, जवळ येऊनही हातून सुटत गेलेल्या मौल्यवान क्षणांना गमावण्यातली विफलताही आहे.
--------------
नचिकेत-जयू पटवर्धन नाव घेतलं की आधी आठवण येते २२ जून १८९७ या चित्रपटाची. नंतर आठवतात त्यांचे काही मोजकेच, पण त्यातल्या काळानुरूप कला-दिग्दर्शनामुळे, देखणी अभिजात रंगसंगती आणि वेषभूषांमुळे कायम स्मरणात राहिलेले ‘उत्सव’सारखे चित्रपट. पटवर्धन दाम्पत्याची ओळख अभिजात वास्तुरचनाकार म्हणूनही महत्त्वाची आहे याची माहिती काहींना असते. मात्र त्याही पलीकडे जाऊन कलेच्या इतर प्रांतातही त्यांची मुशाफिरी सातत्याने गेली अनेक वर्षं चालू आहे याची कल्पना मात्र अनेकांना नसेल.
 नचिकेत आणि  जयू पटवर्धन माध्यम प्रसिद्धीच्या गलबल्यापासून स्वत:ला कायम दूर ठेवत आलेले असल्याने हे तसं साहजिकच!
नचिकेत पटवर्धनांची पेंटिंग्ज आणि  स्केचेस, ड्रॉइंग्जचं ‘जर्नी सो फार.’ हे प्रदर्शन मुंबईतल्या सिमरोझा आर्ट गॅलरीमधे आजपासून सुरू होतं आहे, ही बातमी त्यामुळेच सुखद धक्का देणारी आणि कुतूहलाची ठरली. हे प्रदर्शन जयू पटवर्धन स्वत:च क्यूरेट करत आहेत.
या प्रदर्शनात मांडली जाणारी स्केचेस अप्रतिम आहेत. डौलदार रेषा आणि कुठेही क्लटर नाही. स्वच्छ, देखणी ड्रॉइंग्ज.  गेल्या जवळपास चार दशकांच्या काळातलं नचिकेत पटवर्धनांचं आयुष्य या स्केचेसमधे आहे. देश-विदेशात भेटलेली माणसं, निसर्ग, आप्तस्वकीय आहेत. त्यांचं घर आहे. घरातल्या वस्तू अगदी पुस्तकांपासून भांड्यांपर्यंत सगळं आहे. चित्रपटांच्या सेटवरचे, लोकेशनवरचे क्षण, घटना आहेत. अलंकारिक आकृत्या, नक्षी आहेत. इतकी लोभस स्केचेस की ती तशीच्या तशी उचलून कपड्यांवर, स्टोलवर मिरवण्याचा मोह व्हावा. काही कमानी, वळणदार जिने, घरं, भिंती यातून त्यांच्यातला वास्तुविशारदही यात दिसतो. 
स्केचेसमधलं जग वास्तव आहे. पेंटिंग्जमधल्या अमूर्त जगाहून जवळचं, खरं. भूतकाळात हरवून जाण्याचा धोका असणारे अनेक क्षण, व्यक्ती, प्रसंग वेचून या स्केचेसमधे शाबूत ठेवले आहेत.  नचिकेत पटवर्धनांची पेंटिंग्ज ऑइल्स आणि   अँक्रॅलिकमधली आहेत. कॅनव्हासवर वर्चस्व आहे ते रंगांचं. हिरवा, पिवळा, लाल, केशरी, निळा आणि  काळा रंग कॅनव्हासवर उधळलेला. स्वैर पण अभिजात सौंदर्याची पातळी न सोडता रंगात पोहणारे प्रवाही आकार, काही आदिवासी प्रतीकं, भौमितिक तुकडे. पाण्यावरचे रंग, पाण्यातले जलचर, वनस्पती, अवकाशात तरंगणारे आकार. रंगांमधून साकारलेले आणि रंगांमधेच विलीन होणारे. 
ब्रशचे फटकारे तीव्र, धारदार. आजूबाजूच्या अनाग्रही रंगछटांच्या लेपांमधून ते आकस्मिक समोर येतात. काही कॅनव्हासवर नैसर्गिक कापडाचे पोत, टेक्सटाईल मोटिफ्सची आठवण करून देणारे आकार. 
नचिकेत पटवर्धनांची पेंटिंग्ज, त्यातले रंग, आकार, स्केचेसमधलं जग, प्रसंग हे सौंदर्यवादी, सुखद, आल्हाददायी नाही. अशा अनुभवाच्या खूप पलीकडे जातं ते. संवेदनशीलतेनं परिसराशी, वातावरणाशी जोडल्या गेलेल्या मनातले हे पडसाद आहेत. मिळवलेलं, गमावलेलं, तुटलेलं, जोडलं गेलेलं, जवळ आलेलं, दुरावलेलं, परतण्याची आस जागवणारं हे विश्‍व आहे. त्यात निरोप आहे, स्वागतही आहे. अजून विस्तारायला हवं असं वाटणारा आशय आहे, आणि स्वत:तच संकोचलेला अवकाश आहे. अस्वस्थतेचे, आव्हानांचे फटकारे, बोचरेपण, जवळ येऊनही हातून सुटत गेलेल्या मौल्यवान क्षणांना गमावण्यातली विफलता आहे. प्रत्येकालाच आपल्या प्रवासात हे सगळं अनुभवायला लागलेलं असतं कदाचित. 
अमूर्ततेत सामावलेले, विरघळलेले आकार, रचना, आकृत्यांची मूळं का आणि कशी शोधायची असतात? बघणार्‍याच्या संवेदनशीलतेची, सहवेदनेची पातळी एक झाली तर ते आपोआप त्याच्यातही रु जतातच की!!
 
सिनेमापासून आर्किटेक्चरपर्यंत चौफेर मुशाफिरी केलेले ख्यातनाम कलावंत नचिकेत पटवर्धन यांनी कॅनव्हासवर साकारलेली अनोखी दुनिया आजपासून मुंबईत प्रदर्शित होते आहे. त्यानिमित्ताने या मनस्वी कलावंताशी केलेला हा संवाद..
 
फॅशन येते-जाते, टिकून राहते, ती अभिजातता!
 
> तुमच्या कलाप्रवासात ‘आर्ट, आर्किटेक्चर आणि  सिनेमा’ असा एक आगळा समन्वय आहे. ही तीन दिशांची मुशाफिरी कुणाही कलावंताला किती समृद्ध करणारी!  या इतक्या वेगळ्या अभिव्यक्तींचं काय नातं असतं परस्परांशी?
- ‘‘माझी पेंटिंग्ज आणि स्केचेस या पूर्ण स्वतंत्र कलाकृती आहेत. त्यांचा एकमेकांशी थेट संबंध काहीच नाही. मी पेंटिंग्ज फक्त स्टुडिओत करतो आणि स्केचेस बाहेरच्या जगात. स्केचेस करणं हे माझ्या दृष्टीने कलेच्या रियाझासारखं आहे. दिवसभरात कधीही, अगदी जेवायला रेस्टॉरंटमधे गेल्यावरही, घरी-दारी, प्रवासात कायम माझं स्केचबुक सोबत असतंच. घरातच चित्रकलेचं वातावरण असल्याने ड्रॉइंग आणि पेंटिंग मी लहानपणापासूनच करत होतो. माझी आई चित्रकार, शांतिनिकेतनमध्ये जाऊन ती चित्रकला शिकली होती. 
कोणत्याही व्यवसायाचं एक ड्रील असतं, स्वयंशिस्त असते. स्केचेस नियमित करण्याची शिस्त मला लागली बरोड्याच्या आर्किटेक्चर कॉलेजात शिकायला असताना. तिथे आमचे पहिल्या वर्षाचे क्लासेस थोड्या उशिरा सुरू  व्हायचे. म्हणून फाइन आर्टच्या वर्गात सकाळी जाऊन बसायला मला आमचे डीन शंखो चौधरी यांनी परवानगी दिली होती. तिथे स्केचिंगच्या सरावावर भर होता. आठवड्याच्या अखेरीला स्केचबुकची सगळी पानं भरली गेली पाहिजेत, जराही कोरी जागा शिल्लक राहता कामा नये; ही अटच होती जणू. हे सोपं नाही. 
त्यामुळे मग विद्यार्थ्यांच्या हातात कुठेही, बसस्टॉपवर, कॅन्टीनमधे स्केचबुकच दिसे. त्यावेळी लागलेली सवय पुढे कायम राहिली.’’
 
> तुमच्या कॅनव्हासवरचं रंगांचं वर्चस्व आणि त्यातून वाहणारे अमूर्त, प्रवाही आकार, काही आदिवासी प्रतीकं, भौमितिक तुकडे हे सारं विलक्षण वाटतं. त्याबद्दल काय सांगाल?
- ‘‘रंग हा माझ्या पेंटिंगमधला स्टार्टिंग पॉइंट. रेषा आणि आकार नंतर येतात. नेणिवेत अनेक प्रभाव असतात. त्यातले नेमके कोणते उतरतात रंगवताना हे सांगता येत नाही. अनेक अनुभवांचे, दृश्यांचे ते रिकॉल्स असतात. फार विचार करून त्याचा शोध लावणं मला महत्त्वाचं वाटत नाही. मला वाटतं पेंटिंग बघताना ते आवडलं तर का आणि काय हे प्रश्न बघणार्‍याने स्वत:लाच विचारायला हवे.’’
 
> ‘आर्ट आणि आर्किटेक्चर’ यातल्या नात्याकडे तुम्ही कसं पाहता?
- ‘‘अनेकांना वाटतं की आर्किटेक्चरमधे उत्तम ड्रॉइंग असणं खूप महत्त्वाचं आहे. पण तसं अजिबात नाही. त्यापेक्षा संगीत, नाटकासारख्या कला, अर्थशात्र-भूगोलासारख्या विषयातलं प्रावीण्य, समजूत जितकी जास्त तितका तो उत्तम आर्किटेक्ट. आर्किटेक्चरमधल्या डिझाइन स्किलचं महत्त्व कागदावर काढलेल्या सुंदर ड्रॉइंगपेक्षा कितीतरी जास्त असतं.  आर्किटेक्चरशी माझ्या ड्रॉइंग आणि पेंटिंग्जचा थेट संबंध नाही. माझ्यातले हे सर्व कलाप्रकार स्वतंत्रपणे विकसित झाले.’’
 
>...आणि नंतर चित्रपट हे तुमच्या अभिव्यक्तीचं आणखी एक सशक्त माध्यम झालं.?
- ‘‘चित्रपटांमधली कारकीर्द सुरू झाली आम्ही फिल्म अर्काईव्हच्या परिसरात राहत होतो तिथेच. गिरीश कर्नाड, मणी कौल आमच्या शेजारी राहायचे. अनेक देशी-परदेशी फिल्मस आम्ही एकत्र बघितल्या. त्यावर बोललो. ते बेस्ट ट्रेनिंग होतं. खरं तर ही प्रक्रिया आर्किटेक्चरला समांतरच आहे. आपली वास्तू बांधायला येणारी प्रत्येक व्यक्ती निराळी. बजेट, गरजा, जमिनीचा आकार-उकार जाणून घेतल्यावरच त्यावर रचना करता येते. तसंच सिनेमाच्या बाबतीत. सिनेमाची कथा काय सांगते, ती आजची आहे की काही शतकांपूर्वीची याचा अभ्यास करून त्यानुसार काम करायचं. आम्हाला हे करणं जड गेलं नाही. उलट नैसर्गिकच वाटलं. 
२२ जून १८९७ ला खूप पुरस्कार, मान-सन्मान मिळाले. महत्त्वाचं म्हणजे कलादिग्दर्शनासाठीचा स्वतंत्र पुरस्कार या चित्रपटापासूनच मिळायला सुरुवात झाली. ‘उत्सव’ आमच्याकडे आला गिरीश कर्नाडांमुळे. ते शशी कपूरला म्हणाले होते, या दोघांशिवाय ‘उत्सव’ होऊच शकणार नाही. शशी कपूराकडे, विशेषत: त्याची पत्नी जेनिफरकडे चित्रपटाच्या दृष्टीने चांगलं, वाईट काय याची उपजत जाण होती. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कलेच्या क्षेत्रात तुमची दृष्टी तयार होण्यासाठी खूप काळ जाऊ द्यावा लागतो. कला कशी ‘बघावी’ याचं प्रशिक्षण लहान वयापासून द्यायला हवं. फॅशन येते-जाते, टिकून राहते, ती अभिजातता! आम्ही डिझाईनमधली अभिजातता महत्त्वाची मानतो.’’

Web Title: Journey so far ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.