चक्रीवादळ
By Admin | Updated: November 22, 2015 17:24 IST2015-11-22T17:24:53+5:302015-11-22T17:24:53+5:30
अमृता शेरगिल. इतक्याशा लहान आयुष्याच्या कॅप्सुलमधे ठासून भरलेलं चक्रीवादळ. या चक्रीवादळाचा जन्म झाला, त्याला शंभर वर्षे झाली आता. काही वादळं शमत नसतात.

चक्रीवादळ
>
चंद्रमोहन कुलकर्णी
अठ्ठावीस वर्षांच्या आयुष्याच्या एका लहान कॅप्सुलमधे समजा झंझावात ठासून भरला तर काय होईल?
आई, वडील, भावंडं, मित्र,
नातेवाईक, ऐश्वर्य, नोकरचाकर,
गाडय़ाघोडे, शिक्षण, प्रवास, पत्र, वादविवाद, चर्चा,
शरीर, सौंदर्य, सेक्स, मन, चित्र, नवरा, प्रदर्शनं,
पाटर्य़ा, सोशल कॉण्टॅक्ट्स, स्फोटक विधानं,
मतमतांतरं, मतभेद.
मोडायचं, तोडायचं, नाकारायचं.
फाटय़ावर मारायचं,
गोंजारायचं नाही कोणालाच.
जपायचं, पण जुमानायचं नाही.
नवीन करायचं. मनमुराद मोकळं,
बेफिकीर बेछूट जगायचं.
ओसंडून. मस्ती.
चित्रं काढायची, चित्रं काढायची,
चित्रं काढायची. चित्रं काढायची. चित्रं काढायची!
मरायचं पण लगेच.
गूढ मागे ठेवून. विजा चमकतात. कोसळतात.
आग लागते, विझते, राख होते.
वारे वाहतात, शांत होतात. लाटा येतात, ओसरतात.
अमृता शेरगिल.
इतक्याशा लहान आयुष्याच्या कॅप्सुलमधे ठासून भरलेलं चक्र ीवादळ.
या चक्र ीवादळाचा जन्म झाला,
त्याला शंभर वर्षे झाली आता.
काही वादळं शमत नसतात.
professional model हे चित्र काढलं तेव्हा अमृताचं वय होतं वीस र्वष; आणि होती पॅरिसमधे. दुसरं चित्र दिसतं ते आहे भारतातल्या बाईचं.
1935 साली काढलेलं.
दोन्ही चित्रं जीवघेणी.
अमृता चित्रकला शिकली, ते परदेशात. professional model हे चित्र तिनं काढलं ते तिकडं शिकलेल्या तंत्रचा वापर करून. भारतात ती परत आली तेव्हा इथली माती तिच्याशी वेगळंच काही बोलली. इथल्या मातीतल्या, इथल्या माणसांची तिला चित्रं काढावी वाटली, तेव्हा परदेशात शिकलेल्या विशिष्ट प्रकारच्या तंत्रचा उपयोग होईना.
तिनं ते गुंडाळून ठेवून दिलं.
परदेशात ती होती तेव्हापासूनच तिच्या मेंदूचा एक भाग Paul Gauguin या माणसाच्या चित्रनं व्यापलेला होता. ताहिती बेटावरच्या माणसांची त्यानं चित्रं काढली होती, त्या चित्रंचं तंत्र काही वेगळंच होतं. पॅरिसच्या चित्रशाळेत केलेल्या कामात जे कमी पडत होतं, त्याचं सोल्युशन तिला Gauguinमधे मिळालं.
तिला इथं जे दिसत होतं, जे व्यक्त व्हावं असं वाटतं होतं ते पॅरिसमधे मिळालेल्या शिक्षणातल्या तंत्रनं साध्य होईल असं वाटलं नाही.
मग Gauguin च्या चित्रतले तंत्र आणि रंग तिनं भारतीय मातीत मिसळले.
Modigliani, Picasso मधेही तिला ते दिसले.
Ajintha, Mughal,Rajput,kangra शैलीत दिसले.
मग झाली: two women, Hill women, The story teller, child wife, Namaskar, Brahmacharis, Bride's toilet, Girl with pitcher, Fruit vendors अशी पुष्कळ.
आपण शाळेत जे शिकतो, त्यातलं आपल्याला नेमकं काय हवंय हे एकदा कळलं की मिळालेल्या ज्ञानापैकी हातात काय ठेवायचं आणि गुंडाळून काय ठेवायचं हेही कळतं.
कळतं, पण अमृतासारख्यांना फार लवकर कळतं.
वीस बाविसाव्या वर्षी माणसांची करिअरं सुरू होतात. अमृता गेली तेव्हा तिचं वय होतं सदतीस.
शंभर वर्षे झाली तिच्या जन्माला.
अजून प्रभाव आहे जगावर तिच्या कामाचा.
राहीलसुद्धा.
जग बुडेल एखाद्या वेळेला,
पण काम राहील तिचं.
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)
chandramohan.kulkarni@gmail.com