How will remain sweetness of Modi Script? | मोडीची गोडी कशी टिकेल?

मोडीची गोडी कशी टिकेल?

-नवीनकुमार माळी

मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाचा अनमोल ठेवा आपल्या गर्भात साठवून ठेवलेली लिपी आणि इतिहास अभ्यासकांच्या संशोधनाचे, प्रेरणेचे मूळ साधन म्हणजे मोडी लिपी होय ! 700 वर्षे आपले अस्तित्व अबाधित ठेवलेली ही लिपी आज आधुनिक होत आहे.
मोडी लिपीचे आधुनिक फॉण्ट तयार झाले आहेत. मोडी लिपीमध्ये पुस्तके, ई-पुस्तके, मासिके प्रकाशित होत आहेत. एवढेच काय तर सर्वप्रकारच्या डिजिटल टंकलेखन, वाचन यासाठी मोडी लिपीचा वापर करता येणारी www.modifier.in ही सोशलमीडिया वेबसाइटही प्रकाशित झाली आहे.
मोडी लिपी काळाबरोबर बदलत आधुनिक होत आहे. पण आपण अधोगतीकडे जात आहोत असे वाटत आहे. कारण आपण आपल्या ऐतिहासिक साधनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहोत. एखाद्या लिपीच्या अज्ञानामुळे संशोधन कार्य अपुरे राहते वा अपुर्‍या साधनांच्या आधारे केलेल्या संशोधनात्मक इतिहास लेखनास दुय्यम दर्जा प्राप्त होतो.
मोडी लिपी ही मराठी भाषेची एक लिपी आहे. मोडी लिपीचा वापर प्रामुख्याने मध्ययुगीन महाराष्ट्रात शीघ्र लेखनासाठी झाला. लेखन करताना शक्यतो हात न उचलता एका लेखणीच्या टाकाने थोडक्या वेळात पुष्कळ मजकूर लिहिता येत असे. राजकीय, आर्थिक, महसुली, न्यायालयीन दस्तऐवजासाठी तसेच सरकारी व खासगी पत्रव्यवहार यासाठी मोडी लिपीचा वापर होत असे. शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडी लिपीचा वापर राजलिपी म्हणून केला होता. शिवपूर्वकाळात मोडीचा वापर झाला होता आणि शिवकाळानंतरही मोडीचा वापर सुरू होता. 
भारतावर राज्य करणारे इंग्रज, पोतुर्गिज, फ्रेंच लोक इथे राहून मोडी लिपी शिकत होते, त्याआधारे ते आपल्याच इतिहासाचा आढावा घेऊन अभ्यास करीत होते. सर विल्यम कॅरे नावाच्या इंग्रज अधिकार्‍याने तर ‘अ डिक्शनरी ऑफ मरहट्टा लँग्वेज’ आणि ‘अ ग्रामर ऑफ मरहट्टा लँग्वेज’ हे दोन ग्रंथ 1810 व 1825 मध्ये लिहिले ज्यामध्ये मोडी हस्तलिखित व इंग्रजी टंकलिखित करून अशी पुस्तके प्रकाशित केली होती. या शिवाय सर विल्यम कॅरे यांनी नवा करार-बायबल, रघुजी भोसल्याची वंशावळ, मराठी भाषेचे व्याकरण अशी मोडी पुस्तके लिथोग्राफचा वापर करून मुद्रित केली होती. 


मोडी लिपीच्या काही अक्षरांचे लाकडाचे फॉण्ट तयार करून मुद्रण करणे त्याकाळी अतिशय अवघड कार्य होते. तरीही काही वृत्तपत्रे मोडी लिपीमध्ये जाहिराती देत असत. तसेच ‘खबरदार’ नावाचे वृत्तपत्र 1905मध्ये बेळगावहून प्रकाशित होणारे मोडी लिपी वृत्तपत्र होते. आज आपल्यापैकी प्रत्येकाच्या सुशिक्षित आजोबांना मोडी येत होती, कारण त्याकाळी मोडी लिपी शालेय अभ्यासक्रमाचा भाग होती.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1950च्या दशकात मोडी लिपीला मुंबई प्रांताच्या सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन मुद्रण तंत्रज्ञानाला र्मयादा होत्या. हस्तलिखित मोडीच्या प्रत्येक अक्षराचे फॉण्ट तयार करणे अशक्य होते. पण आजच्या मुद्रण तंत्रज्ञानाने हस्तलिखित मोडीचे सुंदर फॉण्ट तयार झाले आहेत. 1950च्या दशकात मोडीत निघालेली मोडी लिपी, आज मॉडीफाय होऊन परत आली आहे. 
यामुळे आपल्याला आपला ऐतिहासिक वारसा जपून पुढच्या पिढीस देता येईल. मोडी 700 वर्षांपूर्वी होती, आजही आहे आणि उद्याही असेल; पण आज मोडी लिपी आधुनिक झाल्यावरही आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर भव्यिष्यात ऐतिहासिक दस्तऐवज वाचण्यासाठी माणसे आयात करावी लागतील किंवा सदरचे सर्व दस्तऐवज कालांतराने नष्ट होतील. 
आज मोडीचे सहस्रावधी दस्तऐवज वाचकांच्या अभावी पडून आहेत. सरकारी यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कार्य करीत असते; पण प्रत्येक गोष्टीची सुरुवात सरकारने एखादी योजना आणल्यावरच केली पाहिजे हे धोरण चुकीचे आहे. आपण आपल्या पातळीवर सुरुवात करणे गरजेचे आहे. हजारो मैलांचा प्रवास पहिल्या दोन पावलाने सुरू होतो. गरज आहे ती पहिली दोन पावले उचलण्याची.

me@navinmali.com
(लेखक मोडी लिपीचे अभ्यासक आहेत.)

 

मोडीची गोडी!

Web Title: How will remain sweetness of Modi Script?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.