How much more Nirbhaya ....? | आणखी किती निर्भया ....?

आणखी किती निर्भया ....?

  • डॉ.अजय देशपांडे

पुरोगामी महाराष्ट्रातील महात्मा गांधींच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील ‘निर्भया’चा नाहक जीव गेला. भर दिवसा, भर चौकात ‘भारत की बेटी’ अमानुषपणे जाळली गेली. आता तिच्या अश्रूंना न्याय कधी मिळेल हा प्रश्नच आहे. पुरुषी अमानुषतेच्या पाशवी अत्याचाराने नाहक जीव गमावणाऱ्या असंख्य निरागस बालिका, तरुणी, स्त्रियांना आपण बातम्यांसारखे वाचून विसरून जाणार आहोत? महाराष्ट्रासह या देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सतत वाढत आहे. २०१४ ते २०१९ या काळात आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात बलात्काराचे २६५१२ गुन्हे दाखल करण्यात आले होते. म्हणजे वर्षाला सुमारे ४४१८ आणि दर दिवशी सुमारे १२ बलात्काराच्या घटना या राज्यात घडतात. याशिवाय महिलांवरील इतर अत्याचारांच्या घटनांचा आकडा देखील फार मोठा आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ने यावर्षी नऊ जानेवारीला प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१८ मध्ये देशभरात ३३ हजार ३५६ बलात्काराच्या घटना घडल्या म्हणजे २०१८ मध्ये भारतात दररोज ९१ बलात्काराच्या घटना घडत होत्या .यावर्षी जानेवारी ते जून १९ या काळात आपल्या देशात मुलींच्या लैंगिक शोषणाच्या २४ हजार २१२ घटनांची नोंद झाली, म्हणजे २०१९ या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात देशात दर दिवशी मुलींच्या लैंगिक शोषणाच्या १३३ घटना घडत होत्या. ‘ चाईल्ड राईट्स इन इंडिया अ‍ॅन अन्फिनिश्ड् अजेंडा’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार गेल्या २२ वर्षांत अल्पवयीन मुला-मुलींच्या लैंगिक शोषणाच्या आणि बलात्काराच्या घटनांमध्ये चार पट वाढ झाली आहे. १९९४ मध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या ३,९८६ घटना घडल्या तर २०१६ मध्ये या घटनांचा आकडा
१६ हजार ८१३ एवढा होता. प्रजा फाऊंडेशन नावाच्या एका संस्थेने दिलेल्या अहवालानुसार वर्ष २०१३-२०१४ ते वर्ष २०१७-२०१८ या काळात मुंबईमध्ये बलात्काराच्या घटना ८३ टक्क्यांनी तर विनयभंगाच्या घटना ९५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मार्च २०१८ ते एप्रिल २०१९ या काळात महाराष्ट्रातील ठाणे, पुणे , पालघर , नागपूर येथे महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे जास्त घडले असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने जाहीर केले आहे . एकूणच काय तर भारत सरकारच्या आकडेवारीनुसार २००७ ते २०१६ या काळात भारतातील महिलांवरील अत्याचारांमध्ये ८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे . ‘ग्लोबल एक्सपर्ट’ या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार २०१८ मध्ये महिलांसाठी असुरक्षित असणाºया देशांच्या यादीत भारत पहिल्या क्रमांकाचा देश आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड नुसार २०१६ मध्ये देशभरात एक लाख ३३ हजार बलात्काराची प्रकरणे आणि पोक्सो कायद्यांतर्गत ९० हजार २०५ प्रकरणे प्रलंबित होती म्हणजे पीडितांना न्याय देण्यासाठी देखील खूप विलंब लागतो आहे.
निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना अजूनही शिक्षा झालेली नाही. निर्भया प्रकरणातील फाशीची शिक्षा झालेल्या चारही गुन्हेगारांविरुद्ध आता नव्याने डेथ वॉरंट अर्जावर सुनावणी १७ फेब्रुवारीपर्यंत लांबली आहे. उशीर झाला पण निर्भयाला न्याय मिळाला असे आज म्हणता येत नाही. आजघडीला या राज्यात आणि देशात कितीतरी निर्भया न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत , त्यांना न्याय कधी मिळणार ? या देशातील प्रत्येक निर्भया म्हणजे प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री असुरक्षित आहे. आज घडीला भारतातील सुमारे सहा कोटी तीन लाख मुली बेपत्ता आहेत. याचा अर्थ या देशातील प्रत्येक मुलगी असुरक्षित आहे हे समजून घेतले पाहिजे. या देशात जन्मणारी प्रत्येक मुलगी भारताची सुकन्या आहे, निर्भया आहे, तिला सुरक्षित जगण्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे, पण या देशातील प्रत्येक निर्भया म्हणजे प्रत्येक मुलगी दहशतीच्या वातावरणातच जगत आहे , हे सत्य नाकारता येत नाही. या देशातील प्रत्येक मुलीला प्रत्येक स्त्रीला भयमुक्त वातावरणात जगू देण्यासाठी शासकीय यंत्रणा, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद , न्यायसंस्था, लोकप्रतिनिधी आणि समाज काही प्रयत्न करणार आहेत का नाही ? ‘बेटी बचाव’ म्हणत व्हॉट्सअ‍ॅप वर मेसेज फॉरवर्ड करणाºया बोटांचे हात घराघरातल्या मुलींच्या सुरक्षेचे छत्र कधी होणार?
राजकारणी आणि लोकप्रतिनिधी या राज्यासह देशातील स्त्रियांच्या सुरक्षेसाठी काही प्रयत्न करतील का ? दरदिवशी सकाळी व्हॉट्सअ‍ॅप वरून संस्कारशीलतेचे -आदर्श विचारांचे मेसेजेस फॉरवर्ड करणारा समाज स्त्रीवर अन्याय होऊ नये यासाठी कृतिप्रवण होईल काय ?
निर्भयाला न्याय देणे म्हणजे तिच्या गुन्हेगारांना फाशी देणे होय, हे जेवढे खरे आहे तेवढेच हे देखील खरे आहे की निर्भयाला न्याय देणे म्हणजे या देशातील प्रत्येक मुलीला सन्मानाने जगण्यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण करून देणे होय. नजीकच्या काळात भारतातील निर्भया भयमुक्त होतील अशी आशा बाळगू या.

Web Title: How much more Nirbhaya ....?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.