सन्मान ‘प्राचीन’तेचा, ‘आज’चे काय?
By Admin | Updated: February 21, 2015 14:23 IST2015-02-21T14:21:35+5:302015-02-21T14:23:15+5:30
आपल्या शैक्षणिक, भौतिक प्रगतीतच आपल्या भाषांचा विनाश आहे. कारण आपल्या भाषा आपल्या भौतिक, बौद्धिक व्यवहाराच्या माध्यमभाषा बनलेल्या नाहीत.

सन्मान ‘प्राचीन’तेचा, ‘आज’चे काय?
डॉ. प्रकाश परब
आपल्या शैक्षणिक, भौतिक प्रगतीतच आपल्या भाषांचा विनाश आहे.कारण आपल्या भाषा आपल्या भौतिक, बौद्धिक व्यवहाराच्या माध्यमभाषा बनलेल्या नाहीत. तो मान तर आपण इंग्रजीला दिला आहे.या परिस्थितीत मराठीला ‘अभिजातते’चा दर्जा मिळाल्याने असे काय साधणार?
------------
एकविसाव्या शतकाच्या अखेरीस जगातील पन्नास ते नव्वद टक्के भाषा आपल्या प्रमुख व्यवहारक्षेत्रांतून नामशेष होतील असा समाज-भाषा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. जागतिकीकरणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम म्हणून जगभर खूप मोठय़ा प्रमाणात भाषिक ध्रुवीकरण घडत असून, गरीब राष्ट्रे आपली भाषा आणि संस्कृती सांभाळण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत.
- आपला देशही याला अपवाद नाही.
आपले भाषिक-सांस्कृतिक हितसंबंध आणि आर्थिक हितसंबंध यात विरोध निर्माण झाल्यामुळे भारतीय भाषांपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे म्हणता येईल, की आपल्या शैक्षणिक, भौतिक प्रगतीतच आपल्या भाषांचा विनाश आहे. कारण आपल्या भाषा आपल्या भौतिक, बौद्धिक व्यवहाराच्या माध्यमभाषा बनलेल्या नाहीत. तो मान आपण इंग्रजीला दिला असून, केवळ भावनिक व प्रतीकात्मक पातळीवरच आपण आपल्या भाषांच्या अस्तित्वाचा विचार करतो आहोत.
मराठी भाषा दिनापूर्वी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार म्हणून सध्या जे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे तेही याच मानसिकतेचे निदर्शक आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्याचा मराठी भाषक म्हणून कोणालाही आनंदच होईल. पण तो दर्जा मिळाला आणि मिळाला नाही तर मराठीच्या आजच्या स्थितीत काही फरक पडणार आहे काय, या प्रश्नाचे उत्तर मात्र नकारात्मकच आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा आधुनिक मराठी भाषेचा किंवा वर्तमान मराठी समाजाचा गौरव नसून तो प्राचीन मराठी भाषेचा व प्राचीन महाराष्ट्रीय समाजाचा गौरव आहे. या सन्मानामुळे वर्तमान मराठी समाजाचा नाकर्तेपणाच जगासमोर येणार आहे.
एका समृद्ध वारसा लाभलेल्या भाषेची आपण काय अवस्था करून ठेवली आहे, याचा एकदा विचार करून पाहा. मराठी समाजात आज खूप मोठय़ा प्रमाणात मराठीकडून इंग्रजीकडे भाषापालट (छंल्लॅ४ंॅी रँ्रा३) चालू आहे. मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडू लागल्यामुळे मराठी समाजाच्या दोन पिढय़ांतील भाषिक संक्रमण धोक्यात आले असून, तिथेही भाषा गळती (छंल्लॅ४ंॅी छ२२) होत आहे. शहरी, सुशिक्षित मराठी समाजाचा कल स्वभाषेला ज्ञानभाषा करण्याऐवजी ज्ञानभाषा इंग्रजीलाच स्वभाषा करण्याकडे आहे. उच्च शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग व वाणिज्य, विधी व न्याय आदि प्रगत व्यवहारक्षेत्रात मराठी भाषेची जागा इंग्रजीने घेतली असून, अभिजात भाषेच्या दर्जामुळे तीत फरक पडण्याची शक्यता नाही.
केंद्राकडून अभिजात भाषांना मिळणारे जे आर्थिक लाभ आहेत ते प्रामुख्याने संबंधित भाषेचा पुरातन वारसा जतन करण्यासाठी, त्यांच्या संशोधनात्मक अभ्यासाकरिता संस्थात्मक यंत्रणा उभारण्यासाठी आहेत. त्यांचा भारतीय भाषांच्या वर्तमान स्थिती-गतीशी काही संबंध नाही. पण भाषेकडे केवळ अस्मितेच्या अंगाने पाहणार्यांना आणि ‘भाषाविकास’ म्हणजे नक्की काय याबाबत अनभिज्ञ असणार्यांना राजकीय ताकद पणाला लावून असा एखादा किताब मिळत असेल तर तो पदरात पाडून घ्यावयाचा आहे.
- मुळात ज्या हेतूने भारतीय भाषांना हा दर्जा जाणार आहे तो हेतू साध्य करायला आपल्याला एरवीही कोणी रोखले आहे? विद्यापीठ स्तरावर किंवा स्वतंत्र भाषाविद्यापीठ स्थापन करून जे काम करता येणे शक्य आहे ते करण्यासाठी केंद्र शासनाकडून असा दर्जा मिळेपर्यंत वाट कशाला पाहायला हवी?
समजा, केंद्र शासनाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर त्यामुळे असे काय साध्य होणार आहे जे आजघडीला केवळ अशक्य आहे? ज्या भाषांना हा किताब मिळाला त्यांच्या स्थितीत काही फरक पडल्याचे दिसत नाही. उलट केंद्राकडून निधी मिळवण्यात येणार्या अडचणींचीच चर्चा आहे. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या संस्कृत, तामीळ भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांच्या अभिजात असण्याविषयी शंकाही घेतल्या जात आहेत. मल्याळम भाषेला अभिजात भाषा म्हणून गौरवणे हा मूर्खपणा असल्याचे त्याच भाषेच्या काही अभ्यासकांना वाटते. ओडिया भाषेला हा दर्जा मिळाला तेव्हा ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी ओडिया भाषकांचे अभिनंदन केले ते इंग्रजीत. कारण ते इंग्रजी भाषेतूनच व्यवहार करतात. व्यवहारात ओडिया भाषेची अवस्था मराठीपेक्षा वाईट आहे.
सर्वच भारतीय भाषांची वर्तमान स्थिती इंग्रजीच्या तुलनेत अतिशय दारुण असताना त्यांना अभिजात भाषा म्हणून गौरवून आपण कोणता संदेश देत-घेत आहोत? ग्रीक, लॅटिन, संस्कृतप्रमाणे आधुनिक भारतीय भाषांनाही पुरातन वारसा ठरवून इतिहासजमा करायचे आहे काय? इंग्रजी ही अभिजात भाषा नाही आणि तसा तिचा दावाही नाही. ती वर्तमान आणि भविष्याची भाषा आहे, अशी आकांक्षा भारतीय भाषांनी का बाळगू नये? त्यांचा अभिजाततेचा सोस हा त्यांच्या पराभूत मानसिकतेतून तर आलेला नाही ना?
आपली भाषा पुरातन असण्यावर राजकीय शिक्कामोर्तब झाल्याने एका समृद्ध वारसा असणार्या भाषेची आधुनिक काळात वाताहत करणारा भाषिक समाज म्हणून आपली बेअब्रू होत नाही काय? भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी ज्या बाबी तातडीने करायच्या आहेत त्यांच्या यादीत त्यांना अभिजात भाषा म्हणून गौरविणे ही बाब शेवटची किंवा फार तर शेवटून दुसरी असू शकेल. भारतीय भाषांबाबत काही करण्याचे आपले अग्रक्रम काय आहेत हे ठरवण्याची वेळ आली आहे.
(लेखक मराठीचे ज्येष्ठ अभ्यासक, मुलुंड येथील वझे महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख आहेत.)
‘अभिजात’ शिक्कामोर्तबानंतर..
(केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळाल्याने काय फायदे होतील?)
> मराठी श्रेष्ठ राष्ट्रीय भाषा असल्यावर शिक्कामोर्तब.
> मराठीची जागतिक प्रतिष्ठा उंचावेल.
> मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारकडून राज्याला दरवर्षी किमान १00 ते ५00 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान मिळेल.
> मराठीचा अभ्यास आणि या भाषेतील संशोधनाकरता मराठी अध्यासन स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून भरीव निधी उपलब्ध होऊ शकेल. असा दर्जा मिळवणारी मराठी ही तामीळ, संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळमनंतरची सहावी भारतीय भाषा असेल.
मराठी संस्कृतपेक्षाही जुनी?
मराठी ही संस्कृतोद्भव भाषा नाही. ती संस्कृतपेक्षाही जुनी आहे हे १८८५ मध्ये राजारामशास्त्री भागवत यांनी दाखवून दिले आहे. श्रीधर व्यंकटेश केतकर, ल. रा. पांगारकर, शं. गो. तुळपुळे, अन फेल्डहाऊस, वि. भि. कोलते आदिंनी मराठीचे वय दीड हजार वर्षांपेक्षा जास्त असल्याचे असंख्य पुरावे दिलेले आहेत. ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र, विवेकसिंधू हे मराठीतले आद्य ग्रंथ आहेत असं आम्ही अडाणीपणाने सांगतो. एवढे श्रेष्ठ ग्रंथ बालवयात कोणतीही भाषा कशी प्रसवू शकतील? गाथा सप्तसती हा दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ हा मराठीतला आद्यग्रंथ आहे.
(प्रा. डॉ. हरी नरके यांच्या ब्लॉगवरून घेतलेली संपादित माहिती.)