बैलं पळाली हुर्र्रSS
By Admin | Updated: January 16, 2016 13:28 IST2016-01-16T13:28:37+5:302016-01-16T13:28:37+5:30
शर्यतीसाठी सांभाळलेली बैलं पोटच्या पोरांपेक्षाही प्यारी असलेले दिलदार शेतकरी पश्चिम महाराष्ट्राच्या संपन्न शिवारात मायंदाळ! या बैलांचा खुराक, त्यांचे छकडे, या बैलांना शिकवून पळवणारे जॉकी आणि मालकाचा फेटा उडवीत गावात त्याची इज्जत वाढवणा:या बैलगाडा शर्यतीचा थरार. ही दुनिया वादाने रंगलेली खरी, पण भलती भारी!

बैलं पळाली हुर्र्रSS
- सचिन जवळकोटे
सातारा जिल्ह्यातील वण्रे शिवारात योगेश पवारांची शेती. त्यांच्या वस्तीवरची एक खोली निव्वळ बक्षिसांनी भरून गेलेली. जवळपास शंभरपेक्षाही जास्त ‘मेमेण्टो’ पवार घराण्याच्या कर्तृत्वाची साक्ष देत झळकू लागलेले; परंतु गंमत म्हणजे एका शेतक:याच्या कुटुंबात हा सारा चमत्कार ‘ब्लेड’ नामक त्यांच्या बैलानं केलेला. गेल्या पाच-सात वर्षात सव्वाशेपेक्षाही जास्त बैलगाडा शर्यतीत या पठ्ठय़ानं मैदान मारलंय. जीव तोडून धावण्याच्या जिद्दीमुळं ‘ब्लेड’नं प्रत्येक शर्यत जिंकलीय. या स्पर्धेतल्या रसिकांच्या भाषेतच बोलायचं झालं तर ‘गाडी लई भारी बसलेली’.
गेल्या आठवडय़ातली गोष्ट. एकोणीस महिन्यांपासून बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी नुकतीच उठली होती. ही बातमी येते न येते तोच लगोलग देशातली पहिली स्पर्धा पुसेगावच्या मैदानावर घोषित झालीही. मी पवारांकडं गेलो तेव्हा स्पर्धेच्या तयारीसाठी पवार घराण्याची धावपळ सुरू होती.
‘नुसतं खाऊ-पिऊ घालून स्पर्धेतली जनावरं तगडी होत नसतात, त्यांना ‘फ्रेश’ही ठेवावं लागतं,’ असं मोठय़ा कौतुकानं सांगणारे योगेश लाडक्या बैलाला पोहण्यासाठी नदीवर घेऊन चालले होते. व्यायाम करून परत आल्यानंतर त्यांचा हा गबरू बैल मालकिणीच्या हातनं दूध पिणार होता. होय.. लहान बाळाला जसं बाटलीनं पाजतात, त्याप्रमाणं मिनरल वॉटरच्या बाटलीनं या बैलाला दिवसातून चार-चार लिटर दूध पाजण्याचा अचाट प्रयोग पवार फॅमिली करत होती. हे कमी म्हणून की काय, ब्लेड नावाच्या या बैलाला रोज दहा-बारा अंडी खाऊ घालण्याची कसरतही सुरू होती. शर्यतीच्या आदल्या दिवशी ‘बक:याचं सूप’ पाजल्यामुळं बैल तुफान वा:यागत पळतो, यावरही त्यांचा ठाम विश्वास. पोटच्या लेकरापेक्षाही बैलावर जास्त जीव लावणारी अशी शेकडो मंडळी आजही पश्चिम महाराष्ट्रात आहेत. वर्षाकाठी दोन लाख रुपये केवळ बैलांवर खर्च करणारे दिलदार शेतकरी इकडल्या अनेक शिवारांमध्ये भेटतात.
- पण या पुसेगावची पहिली शर्यत होता होताच पुन्हा दिल्लीहून बातमी आली, की तामिळनाडूमधल्या जलीकट्टू बरोबरच महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीवरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. म्हणजे या गावरान मनोरंजनाचे कासरे पुन्हा आवळले गेले असले, तरी ही दुनिया आहे मोठी रंगीली.
डिसेंबर महिन्यापासून गावोगावच्या यात्रंना सुरुवात झाली की या भागातली रीतच होती, बैलगाडय़ांच्या शर्यतीचं वादळ पश्चिम महाराष्ट्रात घोंगावणार. पुसेगाव, कडेगाव, नागठाणो, हातकणंगले, कुरुंदवाड, पाचगाव, माळशिरस अन् कोरेगावसारखी मोठी मैदानं बैलगाडय़ांना खुणावू लागणार. कमीतकमी शंभरपासून ते आठशे बैलगाडय़ांर्पयतची संख्या या शर्यतीमध्ये असे. पाचशे ते सातशे रुपये प्रवेश फी भरल्यानंतर प्रत्येक बैलमालकाला खुणावू लागतात दहा हजारांपासून ते एक लाखार्पयतची बक्षिसं. कोटय़वधी रुपयांची उलाढाल होणा:या या शर्यती पश्चिम महाराष्ट्रातील संस्कृतीचा एक अविभाज्य भागच बनून गेल्या होत्या.
बैलांचे शौकीन सुभाष जाधव माहिती देत होते,
‘शर्यतीत धावणा:या बैलांची अन् त्याला पळविणा:या मालकाची कहाणी तशी विस्मयकारकच असते. जनावरांच्या बाजारातून दीड ते दोन वर्षे वयाचा जातिवंत तगडा खोंड हुडकून त्याला घरी विकत आणलं की भावी स्पर्धकाला तयार करण्याची तयारी सुरू होते. खोंडाला धीटपणा यावा, यासाठी त्याला लहानपणापासूनच मुद्दामहून गावातल्या गर्दीतून फिरवून आणायचं, जेणोकरून शर्यतीतल्या बघ्यांच्या गर्दीला ऐनवेळी बैल बुजू नये. धीटपणा आल्यानंतर खोंडाला दुस:या शांत बैलाबरोबर शिवारात चालण्याची सवयही लावतात. हळूहळू मैदानातल्या ट्रॅकवर म्हाता:या बैलाबरोबरही पळवायचं. वर्षभर ‘व्यायाम अन् खुराक’ मिळाला, की टग्या झालेला हा बैल शर्यतीत उतरण्यासाठी तयार!’
शक्यतो एका शेतक:याकडे एकच बैल असतो. शर्यतीत मात्र छकडय़ाला दोन बैलं जुंपावी लागतात. त्यामुळे दुसरा ‘पार्टनर’ हुडकण्यासाठी मग महिनाभर शोधमोहिमा चालत. आपल्या बैलाला तोडीस तोड दुसरा सवंगडी मिळाला की, ‘पैरा’ केला जाई. बक्षीस मिळालं तर दोन्ही मालकांनी किती वाटून घ्यायचं, याचाही करार असे.
- यानंतर खरी कसोटी असे छकडा चालकाची. शर्यतीत बैलं पळविणा:या या चालकाला कुठं ड्रायव्हर म्हटलं जातं, तर कुठं जॉकी. प्रत्येक बैलाचा जॉकी वर्षभर अगोदरच ठरलेला. बैलांना समजणारी सांकेतिक भाषा केवळ जॉकीलाच ठाऊक असते. त्यांनं फुर्र्रùù केलं की पळायचं अन् हुर्र्रùù केलं की वळायचं, एवढंच बैलांना माहीत असतं. मैदानातल्या ट्रॅकवर केवळ जॉकीचाच आदेश पाळणारी जातिवंत खिलारी बैलं शक्यतो पहिल्या तीन बक्षिसांच्या पलीकडं कधी जात नसतात म्हणो.
घोडय़ांच्या रेसकोर्सवर पैशाची लालूच दाखवून जॉकीला फोडल्याची स्टोरी चित्रपटात दाखवली जात असली, तरी इथं मात्र बैलांचा जॉकी मालकाशी आयुष्यभर प्रामाणिक राहतो. मात्र, कधी-कधी मालकाच्या बोलण्यानं ‘इगो’ दुखावला गेलेल्या एखाद्या जॉकीने ऐन शर्यतीत मुद्दामहून ‘गाडी पाडल्या’च्या घटनाही चर्चेत असतात.
अनेक बैलमालकांना श्रीमंत करणारा हा जॉकी स्वत: मात्र गरीबच राहिल्याचा इतिहास अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. तासगावचा शिवा असो की माळशिरसचा चिवळा, मुंबईचा विठ्ठल असो की सोमेश्वरचा अमोल, क:हाड-वाघेरीचा अमोल असो की कडेगावचा विजू. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शर्यतीत लोकांच्या तोंडी कौतुकानं चर्चिली जाणारी ही फेमस नावं जॉकींचीच. जिवावर उदार होऊन छकडा पळविणा:या या जॉकीला एका राउंडमागं पाचशे रुपये मिळत. बक्षिसातली दहा टक्के रक्कमही अघोषितपणो त्याचीच. शर्यतीत धावणारा छकडा दुर्दैवानं उलटून जॉकी जखमी झाला तर त्याच्या उपचाराचा सर्व खर्चही बैलाचा मालकच करत असे. शर्यतीत पळण्यासाठी बैलाचं वय जसं तीन ते दहा, तसंच जॉकीचं वयही अठरा ते तीस !
जॉकीइतकाच छकडाही महत्त्वाचा. सर्वसामान्य बळीराजा शेतीच्या कामासाठी लाकडाची जी बैलगाडी वापरतो, तिचं सरासरी वजन असतं तब्बल तीन ते साडेतीन क्विंटल; मात्र पळणा:या बैलांची दमछाक होऊ नये, यासाठी शर्यतीतला छकडा वजनानं एकदम हलका करण्याची पद्धत होती. लोखंडाच्या पोकळ पाईप्सपासून बनविलेला हा छकडा असतो अवघा पंचवीस ते तीस किलोंचा.
शर्यतीचे संयोजक रमेश कणसे सांगत होते, ‘छकडय़ानंतर मैदानातल्या ट्रॅकवर विशेष लक्ष द्यावं लागतं. एकाचवेळी पाच ते नऊ छकडे धावू शकतील असा सुमारे बाराशे फुटांची लांबी असलेला ट्रॅक ही रीतच. पण काही ठिकाणी तब्बल दोन किलोमीटर अंतर असणारे ट्रॅकही बनविले जात. दोन छकडय़ांमध्ये ट्रॅक्टरने चर पाडली जाई. धावताना जर एखादा छकडा या चरीला स्पर्शून गेला तर तो तत्काळ स्पर्धेतून बाहेर. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ङोंडा पडायच्या आत बैलं सुटली तरीही ती बाद. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोरात पळविण्याच्या नादात जॉकीनं बैलांना चुकून मारहाण केली तरीही ती जोडी आउट, असे नियम असतात.’
शर्यतीमध्ये आणला जाणारा बैल कधीच मैदानार्पयत चालवत आणला जात नाही. बैलं घेऊन येणारा टेम्पो मैदानातल्या ट्रॅकच्या शेवटीच थांबत असतो. तिथंच बैलं उतरविली जातात. शर्यतीचा ङोंडा पडला की हे सारी बैलं सुसाट धावत निघतात याच ठिकाणाकडे. जिथून आलो आहोत, तिथंच पुन्हा जायचं असतं, हा साधा निसर्गाचा नियम माणसाला माहीत नसला, तरी मुक्या प्राण्यांना मात्र झटकन समजलेला असतो..
गट, सेमी अन् फायनल राउंडमध्ये जीव तोडून धावणारी बैलं जेव्हा थकून-भागून तोंडातून फेस गाळू लागली, की त्यांना लिंबाचे तुकडे खायला दिले जात. त्यानंतर तोंडात हात घालून सारा फेस पाण्यानं पुसला जाई. घरी गेल्यावर दुस:या दिवशी गरम पाण्यात कडुनिंबाचा पाला बुडवून बैलांना मस्तपैकी मालीश!
अशातच बक्षीस-बिक्षीस घेऊन एखादा बैल गावात आला तर मोठय़ा थाटामाटात त्याची मिरवणूक निघणार. कारण हा गौरव केवळ बैलाच्या मालकाचाच नव्हे, तर संपूर्ण गावच्या इज्जतीचा! फटाके उडवत, गुलाल उधळत अन् हलगी कडाडत हा बैल गावभर फिरवला जाई.
- असं हे जग.
बैलांवरच्या मायेच्या कहाण्यांनी रंगलेलं..
आणि प्रत्यक्ष शर्यतींच्या वेळी या मुक्या जनावरांच्या होणा:या हालांचीही कहाणी सांगणारं!
पळणा:या बैलांचे ‘मुंबईकर’ शेठ
ग्रामीण भागात शर्यतीतला बैल स्वत: सांभाळण्याची, त्याला खाऊ-पिऊ घालून मोठा करण्याची रीत; मात्र हे शर्यत प्रकरण सुरू असताना मुंबईतील काही हौशी उद्योगपती मंडळी वर्षाला ठरावीक रकमेच्या मोबदल्यात आपले बैल गावाकडच्या लोकांनाच सांभाळायला देत. शर्यतीत उद्योगपतींच्या नावानंच हे बैल पळविले जात. समालोचकही स्पीकरवरून अशा उद्योगपतींचा उल्लेख नावापुढं ‘शेठ’ लावूनच करत असे. बक्षीस मिळालं नाही तरी हरकत नाही; परंतु आपण आपल्या मूळ गावाकडच्या यात्रेत ‘शेठ’ बनलो, हा ‘इगो’ मोठा!
डोंबिवली अन् पनवेलसारख्या ठिकाणी ट्रॅकच्या शेवटाला रिबीन लावून बैलांच्या शर्यती खेळविल्या जात. मात्र यात दोनच उद्योगपतींचा छकडा पळवण्याची रीत असे. आपापल्या छकडय़ावर संबंधित उद्योगपतींनी लाखोंची रक्कम लावलेली. ज्याचा छकडा जिंकेल, त्याचा खिसा गरम. बैलांच्या जिवावर जुगार खेळल्या जाणा:या या शर्यतीला ‘बिनजोड’ असंही सांकेतिक नाव होतं.
(लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे
प्रमुख आहेत.)sachin.javalkote@lokmat.com