ग्रेटा थनबर्गच्या ६६ मैत्रिणींचा सांगावा 'चंद्रपूर वाचवा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:41 PM2020-02-29T23:41:21+5:302020-02-29T23:44:32+5:30

‘अन्यायकारक विकास धोरणांची मोठी किंमत आम्हा मुलांनाच उद्या चुकवावी लागणार आणि भविष्याची धुळधाण होणार’ हा धोका लक्षात येताच स्वीडनच्या अवघ्या सोळा वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग या विद्यार्थिनीने शाळेला सुट्टी मारून दर शुक्रवारी तिथल्या संसदेसमोर बसून आंदोलन सुरू केले आणि जगभरातील विद्यार्थी उद्विग्न होऊन रस्त्यावर उतरले. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांनीही एकदिवसीय प्रतीकात्मक आंदोलनातून ग्रेटाला समर्थन दिले आणि शाळेत जाऊ लागले. मात्र, चंद्रपुरातील एफ. ई. गर्ल्स विद्यालयाच्या ६६ विद्यार्थिनींनी स्वत:ला प्रतीकात्मक आंदोलनापुरतेच मर्यादित न ठेवता गे्रटापासून ऊर्जा घेऊन २२ नोव्हेंबर २०१९ पासून दर शुक्रवारी ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ आंदोलन सुरू केले आहे. चंद्रपुरातील जीवघेण्या प्रदूषणापासून ‘आम्हाला भीती वाटते, तुम्हालाही वाटली पाहिजे, आम्हाला वाचवा’ असे फ लक लक्ष वेधत आहेत.

Greta Thunberg's 66 friends say 'Save Chandrapur' | ग्रेटा थनबर्गच्या ६६ मैत्रिणींचा सांगावा 'चंद्रपूर वाचवा'

ग्रेटा थनबर्गच्या ६६ मैत्रिणींचा सांगावा 'चंद्रपूर वाचवा'

Next
  • राजेश मडावी

चंद्रपूर शहरातील अत्यंत वर्दळीच्या महात्मा गांधी मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरून पुढे जाताना दर शुक्रवारी उजव्या बाजूला एक मंडप दिसतो. या मंडपात सातवी व आठवीच्या २० ते २५ विद्यार्थिनी तोंडाला काळी पट्टी बांधून, हातात फ लक घेऊन प्रदूषणामुळे भविष्यात होणाऱ्या सर्वनाशाची जाणीव करून देत आहेत. चंद्रपूर शहरातील प्रदूषणाचा निर्देशांक (८९.७६) भारतातून कसा उंचावत आहे, हे जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातून जाहीर झाले आहे.
पिण्याचे पाणी, हवा प्रदूषण, कचऱ्याची विल्हेवाट, ध्वनी व प्रकाश यांसारख्या सर्वच घटकांनी शहरातील नागरिकांचा जीव गुदमरू लागला. महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र, या आंदोलनाची कल्पना कशी सुचली, हा प्रश्न विचारताच ओमश्री यादवराव गुरले ही विद्यार्थिनी म्हणाली, प्रदूषण आमच्या जिवावर उठले आहे. वर्गाबाहेरील साऱ्या समुदायाचे भविष्यातील नष्ठर्य डोळ्यांसमोर दिसत असताना शाळेचा एक दिवस त्यांच्यासाठी देऊ शकले नाही तर शिक्षणाला अर्थ काय? एफ. ई. गर्ल्स कॉलेज व हायस्कूलचे संस्थाध्यक्ष अ‍ॅड. विजय मोगरे यांनी प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वतीने ग्रेटा थनबर्गच्या कार्याची माहिती दिली. दर शुक्रवारी शाळा बुडणार, हे माहीत असूनही आई-बाबांनी होकार दिला अन् आंदोलन सुरू झाले. विकासाची मोठी किंमत आम्हा मुली-मुलींना उद्या चुकवावी लागणार असल्याने हे आंदोलन आता थांबणार नाही यावर ओमश्री ठाम आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थिनींची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया बरेच काही सांगून जाते. मुली व शिक्षकांना आंदोलनासाठी प्रोत्साहन देऊन पालकांचे कसे समुपदेशन केले, असे विचारताच अ‍ॅड. मोगरे म्हणाले, लोकमतच्या ‘दीपोत्सव’ (२०१९) विशेषांकात गे्रटा थनबर्ग या स्वीडिश मुलीने सुरू केलेल्या ‘फ्रायडे फॉर फ्युचर’ आंदोलनाची स्टोरी मी व माझ्या पत्नीने वाचली.
चंद्रपुरातील प्रदूषण भयंकर असल्याचे साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण, विद्यार्थिनींना घेऊन काही तरी कृतिशील करता येईल का, याबाबत चर्चा करून हा विषय प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर आम्ही मांडला. पालकांची बैठक घेऊन याबाबत समजावून सांगितले. त्यानंतर दर शुक्रवारी आंदोलन करण्यासाठी २० ते २५ विद्यार्थिनींची निवड करण्याचे ठरले. पण, तब्बल ६६ पालकांनी आम्हाला परवानगी दिली. पालक म्हणून आम्हाला सामाजिक दायित्व पूर्ण करणे शक्य होत नसेल तर मुलींना का अडवायचे, अशा प्रतिक्रियाही पालकांनी व्हिजिट बुकमध्ये नोंदविल्या आहेत. आंदोलनस्थळी दोन शिक्षकांची नियुक्ती केल्याचीही माहिती अ‍ॅड. मोगरे यांनी दिली. मुलींनी सुरू केलेल्या ‘चंद्रपूर वाचवा’ आंदोलनाची व्याप्ती आता वाढत आहे. काही विघ्नसंतोषी मंडळी आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन हिरमोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वीडन येथील ग्रेटा थनबर्गच्या चंद्रपुरातील या ६६ मैत्रिणी कदापि बधल्या नाहीत. खलिल जिब्रान यांच्या शब्दात सांगायचे तर ‘मुली-मुलांना तुमच्यासारखे बनविण्याची घोडचूक करू नका. तुम्ही त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करा...’ हाच या आंदोलनाचा सर्वांना सांगावा आहे.

Web Title: Greta Thunberg's 66 friends say 'Save Chandrapur'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.