ग्राफिक नॉव्हेल

By Admin | Updated: April 18, 2015 16:07 IST2015-04-18T16:07:38+5:302015-04-18T16:07:38+5:30

नवा साहित्यप्रकार रुजेल मराठीत, पण सगळ्यांनाच लयी काम करावं लागेल. लेखकाच्या कॉम्प्युटरवरून डीटीपीवाल्याकडे आणि तिथून व्हाया चित्रकार-प्रेसमधून डायरेक्ट अप्पा बळवंत चौकातच, विकायला.! - आत्ता चाललंय तसं चालणार नाही.

Graphic Novell | ग्राफिक नॉव्हेल

ग्राफिक नॉव्हेल

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
ज्यांच्या कथांमध्ये ग्राफिक नॉव्हेल करायला प्रचंड स्कोप आहे असे एक लेखक म्हणाले: 
‘तुम्ही करायला पाहिजे माङया कथांवर ग्राफिक नॉव्हेल. तुम्हाला आहे तसली हौस!’
(खरं तर त्यांना ‘किडा’  असं म्हणायचं होतं!) 
मी म्हटलं,  
‘ते खरंय. पण हे करण्यासाठी मला तर फार काम करावं लागेलच, पण तुम्हालाही फार काम करावं लागेल तुमच्या कथांवर.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे असं, की.’
त्यावेळी, जी कथा आधीच लिहिली गेली आहे, तिचं ग्राफिक नॉव्हेलमध्ये रूपांतर करताना काय काय करावं लागेल, त्याबद्दल आम्ही बराच विचार केला. 
तो थोडक्यात असा - 
शब्दमाध्यमातली कथा वेगळ्या माध्यमातनं सांगण्यासाठी लेखकाला त्याची कथा चित्रकाराच्या नजरेतून बघावी लागेल. 
चित्र या माध्यमामधून काय काय व्यक्त होऊ शकेल याचा विचार करून कथेतले शब्द कमी करावे लागतील, बदलावे लागतील. 
माध्यमाचा विचार करून कथेचं कदाचित पुनर्लेखन करावं लागेल. 
शब्दमाध्यमाची ताकद आणि चित्रमाध्यमाची ताकद ह्याचा विचार करत करत आणि अंदाज घेत घेत पुढे जावं लागेल. 
कदाचित सगळी कथाच स्क्रिप्ट म्हणूनच बघावी लागेल. 
तसं करताना, कथा म्हणून तिची ताकद कमी होणार नाही ह्याच्याकडे लक्ष ठेवून प्रवास करावा लागेल.
चित्रकाराला  ‘हे कॉमिक नाही’ ह्याचं भान ठेवावं लागेल.
 
नियतकालिकांमधली इलस्ट्रेशन हा थोडासा तत्कालिक प्रकार असतो. 
हे नुसतं स्टोरी इलस्ट्रेशन नाही, हा मुद्दा सतत लक्षात ठेवायला लागेल.
नुसती चित्रं काढून भागणार नाही. 
टायपोग्राफी, लेआऊट, चित्र-मजकूर यांचं नातं यासंबंधीचा सगळा विचार चहूअंगानं करावा लागेल. 
आपल्याला ग्राफिक नॉव्हेल करायची आहे, एखाद्या दैनिकाच्या रविवारच्या पुरवणीतलं कॉमिकस्ट्रिप असलेलं पान करायचं नाहिये, हे लक्षात ठेवावं लागेल. 
पूर्वी कॉमिक स्ट्रिप्स एकाखाली एक छापून त्यांची पुस्तकं प्रकाशित होत असत. (अजूनही होतात. पूर्वी प्रमाण जास्त होतं.) 
 
कॉमिकस्ट्रिप वेगळी, ग्राफिक नॉव्हेल वेगळं.
म्हणजे अॅप्लाइड आर्टमध्ये काम करताना  काय करायचं यापेक्षा खरं तर  ‘काय नाही करायचं’ ह्याचाच विचार जास्त करावा लागतो. 
(सगळ्याच आर्टमध्ये तसं असावं, बहुतेक!)
तांत्रिक मुद्दे तर खूपच आहेत. 
मुख्य मुद्दा रॉयल्टीचा. 
लेखकाला आणि चित्रकाराला दोघांना (महत्त्व आणि) रॉयल्टी सारखीच मिळायला पाहिजे.
ग्राफिक नॉव्हेलसाठी म्हणून मुद्दाम कथा / कादंबरी लिहायची असली तर आणखीनच वेगळा विचार करावा लागेल.
 
एकमेकांना विश्वासात घेऊन, परस्परांशी संवाद साधत ग्राफिक नॉव्हेल केल्या, तर एक नवा छानसा साहित्यप्रकार रुजेल मराठीत.
पण सगळ्यांनाच काम लयी करावं लागेल.
 
आत्ता चाललंय तसं चालणार नाही. 
लेखकाच्या कॉम्प्युटरवरून डीटीपीवाल्याकडे आणि तिथून-व्हाया चित्रकार-प्रेसमधून डायरेक्ट अप्पा बळवंत चौकातच, विकायला! .!

Web Title: Graphic Novell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.