Giri Raja's literary memories are stored | गिरीराजाच्या साहित्यिक आठवणींची साठवण

गिरीराजाच्या साहित्यिक आठवणींची साठवण

ठळक मुद्देयुरोमेरिका अवलंबित्व फार आहे हेही मान्य केले. माझा प्रश्न लक्षवेधी ठरला. मी पुन्हा एकदा या गिरीराजाला सलाम केला.

- प्रा.डॉ. आनंद पाटील -

गिरीश कर्नाड यांना पणजीतील त्यांच्या भाषणानंतर मी प्रश्न विचारला, ‘गॅरेथ ग्रीफिथ्ससारखा उत्तरवसाहिकतेच्या प्रकल्पाची रूपरेषा कुणी भारतीयाने देशासाठी तयार केली आहे का? भारतीय लेखक आजही युरामेरिका केंद्रीतच का आहेत?’ कर्नाड छान हसले. भारतात संघटित उत्तरवसाहितक चळवळ नाही. जो-तो आपल्या राज्यात कुवतीप्रमाणे धडपडत असतो. युरोमेरिका अवलंबित्व फार आहे हेही मान्य केले. माझा प्रश्न लक्षवेधी ठरला. मी पुन्हा एकदा या गिरीराजाला सलाम केला.


साहित्यिक आठवणींची साठवण समृद्ध करण्यात मला गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाची पुण्याई फार उपयोगी आली. भाषा, साहित्य व संस्कृतीशी संबंधित कार्यक्रमाला गोव्याबाहेरचे नामवंत पाहुणे बोलावले जायचे तेव्हा त्यांचे स्वागत व अतिथीगृहातील व्यवस्था पाहत शिष्टाचाराचे खातेच कुलगुरूंनी माझ्याकडे कायमचे सोपविले होते. अध्यापनाचा इंग्रजी विषय व लेखनाच्या आवडीमुळे लोकप्रिय झालेला ‘सर्जनात्मक लेखन’ हा पेपर ही दोन कारणे त्यामागे असावीत.
मराठीशी कोंकणीचे विळ्या-भोपळ्याचे सख्य आणि कन्नडशी घरोब्याचे नाते प्रसिद्ध आहे.

त्यामुळे तीन नामवंत कन्नड लेखकांच्या भेटीचा योग आला. कोंकणी विश्वकोशाचे संपादक डॉ. तानाजी हळर्णकर या ज्ञानकोश खंडांच्या प्रकाशनाला प्रमुख पाहुणा बोलावायला चोखंदळ होते. प्रथम त्यांनी शिवराम कारंथ यांना बोलावले. कारंथांशी त्यांच्या चर्चा हा माझ्यासाठी उद्बोधन वर्गच होता. पुढे लोकसाहित्य शास्त्राचे जगप्रसिद्ध विद्वान डॉ. जवाहरलाल हाण्डू यांनी म्हैसूरच्या भाषाकेंद्रातून येऊन आमच्या विद्यापीठात दहा दिवसांची कार्यशाळा घेतली होती. महाराष्ट्रात असे उपक्रम राबविण्यात त्यांना यश आले नसावे. गोव्यातील कार्यशाळेत कोंकणीवादी जास्त होते. त्यामुळे त्यांनी आढावा घेताना लोकसाहित्य शास्रात फार मागे आहे; तेथे संकलक आहेत; पण प्रयोगशाळा व लोकसाहित्यात स्वतंत्र पदवी देणारी संस्था नाही, अशी परखड मते मांडली. ती मी ‘मसाप’मधील लेखात स्पष्टपणे मांडली; तेव्हा अनेक पत्रांत पुण्याहून आलेले पत्र बोलके होते. ‘पाटील इंग्रजीची चार बुकं वाचली म्हणून फार शहाणे झाले असे समजू नका. ढेरे, पांडे, मांडे नि दुर्गाबार्इंना संकलक म्हणता?’

हाण्डूंचा हंडा विनाकारण माझ्या डोक्यावर असा फुटला. योगायोगाने रवी हविनाळे नावाचा तरुण माझ्याकडे एम.फिल. करायला आला. तुलनात्मक साहित्याशिवाय मी संशोधनाला उमेदवार स्वीकारत नाही, ही माहिती त्याने मिळविली होती व गिरीश कर्नाडांच्या नाटकांशी संबंधित तुलनात्मक विषय घ्यायला तो तयार होता. मीही मराठीतील परदेशी नाट्यतंत्र व आशय सूत्रांची उचलेगिरी, वाङ्मयचौर्य, आदींशी संबंधित विषय माझ्या पीएच.डी.साठी निवडला होता. हविनाळेमुळे मराठी नाटककारांची तुलना कर्नाड यांच्याशी करण्याची संधी चालून आली. त्याला मराठी येत नव्हते आणि मला कन्नडचा गंध नव्हता. शेवटी त्याने ‘कर्नाड, पंजाबी व हिंदी नाटककारांच्या इतिहासाचा उपयोग-दुरूपयोग’ असा तुलनात्मक विषय इंग्रजी प्रबंधासाठी निवडला. त्याच काळात कर्नाडना कोंकणी विश्वकोशाच्या दुसऱ्या खंडाच्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले.   लेखक, नट व विद्वत्तेचा अनोखा संबंध बघायची सुवर्णसंधी मला मिळाली.

महाराष्ट्रातील लेखक पाहुण्यांचे गोव्यातील नखरे’ यावर ग्रंथ लिहायला महाराष्ट्र परिचय केंद्राच्या पत्रव्यवहाराचे उत्खनन करावे लागेल. पणजीत कर्नाड यांच्या बरोबरीचे अतिथीगृहातील काही तास हा स्मृती सुगंधाचा अनमोल साठा होता. त्यांच्यावर धारवाडचा मुलगा एम.फिल. करत असल्याचे पाहून त्यांची उत्सुकता जागी झाली. तुलनांचे नवेपण जाणून घेण्याचा उत्साह
विशेष वाटला. मात्र, स्वत:च्या नाटकांविषयीचे मत त्यांनी दिले नाही. संशोधकाच्या मुलाखतीवेळी सर्व काही सांगेल, अशी परवानगीही दिली. मी पाश्चात्त्य नाटककारांचा भारतीय नाटककारांवरील प्रभावाच्या माझ्या संशोधनाबद्दल बोलू लागलो तेव्हा ते श्रोत्यांच्या भूमिकेशीच एकरूप राहिले.
पणजीमध्ये गिरीश कर्नाड यांचे ‘उत्तरवसाहतवाद आणि भारतीय साहित्य’ या विषयावर जाहीर भाषण कलाअकादमीमध्ये ठेवले होते. मी नुकताच सेवानिवृत्त झालो होतो. उत्तराधुनिकता, नववसाहतवाद, युरोमेरिका केंद्रितता अशा संकल्पना भारतात अजून रूजलेल्या नाहीत. शिवाय कर्नाड इंग्रजीत जे बोलले ते पुण्यनगरीत किती कळेल, याची शंका आहे. बहुसंख्य कन्नड लेखकांना मी अस्खलित इंग्रजीत बोलताना ऐकले आहे. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कर्नाडांचे भाषण नगरला गाजले.

बहुभाषिकता व सांस्कृतिक भांडवल यांची त्याची समृद्धी देशपातळीवर वरचढ होण्याचे कारण हेच आहे. ज्ञानपीठच नव्हे, तर दिल्लीच्या साहित्य अकादमीच्या गतवर्षीच्या अध्यक्षपदाचे उदाहरण घ्या. आमचे संधिसाधू देशीवादी ऊर्फ पुरोहितवर्गाचे छुपे एजंट भालचंद्र बुवा नेमाडे त्या पदासाठी उभे होते. त्यांचे स्पर्धक कन्नड कवी डॉ. कंबार (कुंभार) यांनी त्यांना अस्मान दाखविले. नेमाड्यांना दोन मते पडली, असे कळते? असो, कर्नाडांच्या त्या भाषणाची व्याप्ती मोठी होती. पांडित्यापेक्षा पुरोगामी निष्ठा आणि स्वानुभवांचे बळ मोठे होते. ते सुलभिकरणाच्या कीर्तनी शापात अडकले नव्हते. चित्रपट, नाटक या जनमाध्यमांत प्रगत जगातील प्रयोग आणताना तडजोडींची मार्मिक उदाहरणे त्यांनी दिली.

संयोजकांनी व्याख्यानानंतर प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. मी प्रश्न विचारला, ‘गॅरेथ ग्रीफिथ्ससारखा उत्तरवसाहिकतेच्या प्रकल्पाची रूपरेषा कुणी भारतीयाने आपल्या देशासाठी तयार केली आहे का? भारतीय लेखक आजही युरामेरिका केंद्रितच का आहेत?’ कर्नाड छान हसले. भारतात संघटित उत्तरवसाहतिक चळवळ नाही. जो-तो आपल्या राज्यांत कुवतीप्रमाणे धडपडत असतो. युरोमेरिका अवलंबित्व फार आहे हेही मान्य केले. माझा प्रश्न लक्षवेधी ठरला. मी पुन्हा एकदा या गिरीराजाला सलाम केला.

मात्र, त्यांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर कन्नड साहित्य संस्कृतीत जी परंपरावाद्यांची गटारगंगा वाहिली तिचाही उल्लेख बर्नार्ड शॉच्या ‘सेंट जोन’ नाटकाच्या शेवटच्या दोन ओळींनी करावा असे वाटले. शॉ त्या शेतकºयाच्या पराक्रमी कन्येला चेटकीण ठरवून कटकारस्थानाने फ्रान्समध्ये जिवंत जाळल्यानंतर शॉ म्हणतो, ‘ओ गॉड, हू मेडेट धिस ब्युटिफूल अर्थ, व्हेन वुईल इट बी रेडी टू रिसिव्ह दाय सेंटस ओ गॉड.’
(सुंदर पृथ्वी निर्माण करणाºया हे परमेश्वरा, हे जग सत्पुरुष स्त्रियांना स्वीकारायला कधी तयार होईल?)

बंगलोरच्या राष्ट्रीय चर्चासत्राला देशातील डझनभर ज्ञानपीठ विजेते हजर होते. त्यातील एक मल्ल्याळम् कादंबरीकार एम. टी. वासुदेवन नायर एका सत्राचे अध्यक्ष होते. त्यांनी प्रास्ताविकातच भारतीय वाङ्मयीन संस्कृतीवर थेट बॉम्ब टाकला, ‘मी वाणिज्यचा पदवीधर व मल्ल्याळम् मासिकाचा संपादक आहे. मी या नासलेल्या साहित्य संस्कृतीत का लिहितो, हेच कळत नाही. ही विद्वानांची सभा आहे. मला मोठा पुरस्कार मिळाला म्हणून आज हा मान मिळाला असावा; परंतु भारतात एखाद्या खालच्या जातीतील लेखकाला हा पुरस्कार मिळाला तर परंपरावादी विश्वास ठेवत नाहीत. ते त्याच्या आईचा संबंध... या सर्वश्रेष्ठ वर्णातील पुरुषाशी जोडतील.’’

मी गाळलेला शब्द त्यांनी थेट वापरला होता. हा अप्रत्यक्ष संदर्भ कर्नाटकातील सुतार समाजातील पुटप्पांना ज्ञानपीठ मिळाल्यानंतर हीन पातळीवरून झालेल्या टीकेशी होता. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती कर्नाड यांच्याबाबतीत थोड्या फरकाने झाली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुरोगामित्व व प्रामाणिक सत्यनिष्ठा टिकवणे फार कठीण असते. म्हणून हा गिरीराज भेटल्याच्या स्मृती आज मी जागवल्या.


(लेखक गोवा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी प्रमुख आहेत.)

Web Title:  Giri Raja's literary memories are stored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.