'लोणार'मध्ये मासे, आता काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:55 IST2025-11-09T14:55:39+5:302025-11-09T14:55:52+5:30
Lonar Lake: लोणार सरोवर हा जगाचा नैसर्गिक ठेवा आहे. त्याच्या जैवविविधतेचे रक्षण हे केवळ शासनाचे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. शास्त्रीय उपाययोजनांबरोबरच लोकसहभाग आणि पर्यावरणाबद्दलची जबाबदारी या दोन्हींच्या संगमातूनच लोणार सरोवर पुढील पिढ्यांसाठी अबाधित ठेवता येईल.

'लोणार'मध्ये मासे, आता काय होणार?
- डॉ. संतोष व्यंकटराव आगरकर
(पर्यावरण अभ्यासक)
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे उल्कापाताने निर्माण झालेले सरोवर आहे. विज्ञान, भूगर्भशास्त्र, पर्यावरण, खगोलशास्त्र तसेच पौराणिक दृष्टीने याचे अपूर्व महत्त्व आहे. या अद्वितीय परिसंस्थेत दुर्मीळ सजीव आणि अजैव घटकांचा समावेश असून, देश-विदेशातील शास्त्रज्ञ सरोवराच्या जैवविविधतेचा सखोल अभ्यास करत आहेत. मात्र, या सरोवरास अनेक पर्यावरणीय समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाढती जलपातळी, बाहेरून आलेल्या मासे प्रजातींचा शिरकाव आणि नैसर्गिक कड्यांचे ढासळणे या बाबी चिंतेचा विषय बनल्या आहेत.
अतिवृष्टीमुळे सरोवराच्या पूर्वेकडील कडा कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी सरोवरात मिसळत असून पाण्याच्या प्रवाहात बदल झाला आहे. यावर्षी सरोवरातील जलपातळी वाढल्याचे दिसून आले. कमळजा देवी मंदिर परिसरापर्यंत पाणी पोहोचले असून यामागे मुसळधार पाऊस, झऱ्यांची सक्रियता आणि जमिनीच्या पाझर क्षमतेतील बदल ही प्रमुख कारणे आहेत. अलीकडे सरोवरातील काही भागांत मासे प्रजाती आढळल्या आहेत. बाहेरील पाण्यातून या प्रजातींचा शिरकाव झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या नवीन प्रजाती मूळ परिसंस्थेतील अन्नसाखळी आणि सूक्ष्मजीव संतुलन बिघडवू शकतात.
जलगुणवत्तेवरील परिणाम
पाण्याच्या वाढलेल्या प्रमाणामुळे सरोवरातील नैसर्गिक रासायनिक व भौतिक गुणधर्मामध्ये बदल होत आहेत. पीएच मूल्य, क्षारता, विरघळलेला ऑक्सिजन, रंग आणि वास यामध्ये झालेला फरक सरोवरातील सूक्ष्मजीव, वनस्पती आणि प्राणी यांच्या अस्तित्वावर परिणाम करू शकतो. जर हे बदल दीर्घकाळ टिकले, तर सरोवरातील मूळ जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
संवर्धनासाठी काय करावे?
लोणार सरोवराचे संवर्धन शाश्वत आणि शास्त्रीय पद्धतीने होण्यासाठी स्थानिक लोकसहभाग, शैक्षणिक संस्था आणि शासन यांचा समन्वय आवश्यक आहे.
सरोवराच्या सर्व दिशेच्या कड्यांचे संरक्षण व दुरुस्ती नियमित करावी. जलपातळी वाढण्याची कारणे शोधून जलप्रवाहावर नियंत्रण आणावे.
पाण्याच्या गुणवत्तेची सातत्याने तपासणी 3 करण्यासाठी लोणार येथे स्थायी किंवा फिरती प्रयोगशाळा असावी. बाहेरून येणाऱ्या प्रजातींवर शासनस्तरावर नियमावली तयार करून नियंत्रण ठेवावे.
स्थानिक तज्ज्ञ, पर्यावरण अभ्यासक, शैक्षणिक संस्था, वन व आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच सेवाभावी संस्थांचा समावेश असलेली 'लोणार सरोवर संवर्धन समिती' स्थापन करावी.