जीवघेणा पॉॅज.
By Admin | Updated: April 18, 2015 16:36 IST2015-04-18T16:36:54+5:302015-04-18T16:36:54+5:30
एकेकाळी लोक टीव्हीवर क्रिकेटची मॅच पाहताना टीव्हीचा आवाज बंद करायचे आणि बॉबी तल्यारखानची रेडिओवरची कॉमेण्ट्री ऐकायचे! - हे बदलण्याचं श्रेय रिची बेनॉचं! क्रीम कलरचा कोट परिधान केलेला, पिकल्या केसांचा, पोपटासारख्या टोकदार नाकाचा हा माणूस छोटय़ा पडद्यावर दिसला, की अस्सल क्रिकेटशौकिन चॅनल बदलत नसत. काय होती ही जादू?

जीवघेणा पॉॅज.
>
चंद्रशेखर कुलकर्णी
है और भी दुनिया में सुखनौर बहोत अच्छे
कहते है की गालिब का है अंदाज-ए-बयाँ और
- यातला दर्पोक्तीचा भाग वगळला तर क्रिकेट कॉमेण्ट्रीच्या बाबतीत यातला भाव रिची बेनॉला तंतोतंत लागू पडतो.
10 एप्रिलला बेनॉची इहलोकीची यात्र संपली. तो दिवस त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी जणू ब्लॅक फ्रायडे ठरला. त्याच्या निर्वाणाचं वर्णन बीबीसीनं चपखल शब्दांत केलं..
क्रिकेटचा आवाज हरपला!
केवळ ऑस्ट्रेलियनच नव्हे, तर जगभरातल्या क्रिकेटपटूंनी त्याला आदरांजली वाहिली. तसं पाहिलं तर बेनॉ काही अकाली गेला नाही. त्याचं जाणं अनपेक्षित वा आकस्मिकही नव्हतं. तरीही त्याचं जाणं चटका लावून गेलं. त्वचेच्या कॅन्सरनं टाकलेल्या गुगलीवर हा एकेकाळचा मोठा लेग स्पिनर आऊट झाला.
असं काय होतं या आवाजात अन् माणसात?
- या प्रश्नांची उत्तरं शोधताना बेनॉचं मोठेपण गवसतं. क्रिकेट कॉमेण्ट्रीला कलेचा दर्जा मिळवून देणा:यांमध्ये या माणसाचं नाव अग्रणी राहील. रेडिओ ते टीव्ही या संक्रमणावस्थेत टीव्ही कॉमेण्ट्रीला ग्लॅमर मिळवून देण्यात बेनॉचा सिंहाचा वाटा होता.
एक काळ असा होता, की क्रिकेट मॅचसाठी कान आतूर असायचे. रेडिओवर कॉमेण्ट्री करणा:यांच्या डोळ्य़ांनी क्रिकेटशौकिन मॅच बघायचे. तेव्हा क्रिकेट आजच्या इतकं वेगवान नव्हतं. त्यात एन्टरटेनमेंटचा मसाला नव्हता. वन डे वा टी-2क्चा थरार नव्हता. किंबहुना हजारे-र्मचट यांच्या काळात धावफलकही संथ हलायचा. स्टेडियमच्या स्टॅण्डमध्ये उन्माद नव्हे, जांभई असायची. सर डॉन ब्रॅडमन, गारफिल्ड सोबर्स यांचा घणाघात हे सन्माननीय अपवाद होते. तो काळ क्रिकेट-शौकिनांच्या संयमाची कसोटी पाहणारा होता.
दुसरं महायुद्ध संपून साम्राज्यवादाच्या विळख्यातून मुक्त होऊ पाहणारं जग स्थिरस्थावर होऊ पाहात असताना क्रिकेटच्या क्षितिजावर रिची बेनॉ नावाचा तारा उदयाला येत होता.
बेनॉचा जन्म पर्थमधला पण करिअर सिडनीतली. ब्रिटिश जोखडातून मुक्त झालेला भारत प्रजासत्ताकाची लोकशाही चौकट रचत होता, तेव्हा व्हिक्टोरियन परंपरा अभिमानानं मिरवणा:या ऑस्ट्रेलियात बेनॉ कसोटी संघांच्या उंबरठय़ावर उभा होता. त्यानंतरची एक तपाहून मोठी कारकीर्द त्यानं लेग स्पिनर, फलंदाज तसंच प्रभावी कॅप्टन म्हणून गाजवली. त्याच्या कामगिरीचे आकडे बोलके आहेत. पण त्याचा ठसा निव्वळ त्या आकडेवारीतून प्रतीत होत नाही.
स्वत: रणांगणावर लढताना नीतिनियमांचे सारे संकेत पायदळी तुडवायचे आणि नंतर कॉमेण्ट्री बॉक्समध्ये बसून नीतिनियमांचा उपदेश करायचा, असा परस्परविरोधी व्यवहार बेनॉनं कधी केला नाही. कर्णधारपदाची सूत्रं बॉबी सिम्प्सनकडं सुपूर्द करण्याच्या आधी शेवटच्या सामन्यातही बेनॉनं त्याची प्रचिती दिली. इयान मॅकिफ हा त्याच्या संघातला आघाडीचा तेज तर्रार बॉलर. त्याची अॅक्शन वादग्रस्त होती. अंपायर्सच्या मते तो फेकी होता. ‘फेकतो’ म्हणून अंपायर्सनी त्या सामन्यात अनेकदा त्याचे बॉल नो बॉल ठरवले. गोलंदाजांच्या ताफ्याचा तो कणा असूनही बेनॉनं त्याच्याकडून बॉल काढून घेतला आणि पुन्हा त्या सामन्यात त्याच्या हातात बॉल दिलाच नाही.
कालांतरानं कॉमेण्ट्री बॉक्समध्ये नव्या भूमिकेत शिरल्यानंतर त्यानं कांगारूंच्याच संघातून खेळणा:या ट्रॅव्हर चॅपेलनं अंडरआर्म बॉल टाकला तेव्हा सडकून टीका केली होती. ऑसी असण्याचा अभिमान त्याला जरूर होता, पण म्हणून त्यानं कधी सापत्नभाव दाखवला नाही. विशेष म्हणजे मैदानातील पारंपरिक शत्रुत्वाच्या अॅशेस उभय बाजूंनी जपल्या जात असतानाही लंडननं बेनॉला आपलं मानलं.
बीबीसीवर लाइव्ह क्रिकेट होतं तेव्हा बेनॉ या चॅनलच्या गळ्यातला ताइत होता. किंबहुना इंग्लंड अन् ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधल्या क्रिकेटशौकिनांसाठी तो क्रिकेटचं महाभारत सांगणारा दिव्यदृष्टीचा संजयच होता जणू! 1964-65च्या सुमारास बेनॉनं कॉमेण्ट्रेटरची दुसरी इनिंग सुरू केली. बीबीसीला क्रिकेटचा आवाज मिळाला. पण सत्तरच्या दशकात समांतर क्रिकेटचा श्रीमंत तंबू ठोकणा:या केरी पॅकरचा तो सल्लागार बनला तेव्हा सनातनी गोटातून कलकलाट सुरू झाला. टीकेचं मोहोळ उठलं. बीबीसीनं कॉमेण्ट्रेटर्सच्या पॅनलमधून बेनॉचं नाव काढून टाकलं.
- अल्पावधीतच केरी पॅकरनं आपला तंबू गुंडाळला, त्यानंतर बेनॉ पुन्हा बीबीसीवर दिसू लागला, ते थेट 1999 मध्ये बीबीसीनं लाइव्ह क्रिकेट बंद करेर्पयत.
त्यानंतर बेनॉला लंडनच्या चॅनल फोरनं करारबद्ध केलं. पण बेनॉची समालोचनाची कारकीर्द ख:या अर्थानं बहरली, ती ऑस्ट्रेलियाच्या चॅनल नाइनवर.
क्रिकेट समीक्षक या नात्यानं त्यानं वृत्तपत्रीय पत्रकारिताही दीर्घकाळ केली. हा माणूस तसा वादापासून चार हात दूर राहणारा. पण म्हणून त्यानं कधी परखडपणाचा वसा टाकला नाही. पॅकर सर्कशीचा काळ असे काही अपवाद वगळता बेनॉ कधी वादाच्या भोव:यात सापडला नाही. पण चर्चेत मात्र जरूर राहिला.
बेनॉ आणि ब्रॅडमन या दोघांमध्ये स्नेहाचं खास नातं होतं. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापनावर ब्रॅडमनचा सर्वाधिक प्रभाव असतानाच्या काळात बेनॉ कॅप्टन झाला होता. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या जगात ब्रॅडमनखालोखाल प्रभाव असलेला माणूस म्हणून बेनॉचं नाव घेतलं जातं.
एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात इंग्लंडमध्ये स्पोर्ट्स प्रक्षेपणाच्या प्रांतात पे चॅनल दाखल झाली. त्यानंतर बेनॉनं इंग्लंडमधल्या चॅनल्सवरची कॉमेण्ट्री बंद केली. पण लंडनमधलं न्यूज ऑफ द वर्ल्ड हे रविवारीय वृत्तपत्र बंद पडेर्पयत बेनॉ त्यात लिहीत राहिला. दरम्यानच्या काळात ऑस्ट्रेलियन चॅनल्सवरून त्याची कॉमेण्ट्री सुरूच होती. दोन वर्षापूर्वी त्वचेच्या कॅन्सरचं निदान झालं, त्यानंतरही बेनॉ खचला नव्हता. पण या निदानानंतर अल्पावधीतच झालेल्या कार अपघातानं त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीभोवती मर्यादा अन् बंधनांचं कुंपण पडलं.
- तरीही फिल ह्यूजचा बाउन्सरनं जीव घेतल्यानंतर त्याला श्रद्धांजली म्हणून जी डॉक्युमेण्टरी तयार केली गेली, त्याला भावगर्भ आवाज लाभला, तो बेनॉचाच!
एक मोठा लेग स्पिनर, चांगला बॅट्समन अन् प्रभावी कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटच्या इतिहासानं बेनॉची दखल घेतली आहेच. त्यात त्याच्या समालोचन समीक्षेच्या आयामाची भर पडली. तसं बघायला गेलं तर क्रिकेट टीव्हीच्या छोटय़ा पडद्यावर आल्यापासून अनेक कॉमेण्ट्रेटर झाले. अगदी भारताच्या हर्षा भोगलेर्पयत! मग बेनॉत असं काय होतं की ज्यानं तो कॉमेण्ट्रीचं विश्व व्यापून दशांगुळे उरला?
एक काळ असा होता, की लोक टीव्हीवर क्रिकेटची मॅच बघायचे, पण टीव्हीच्या आवाजाची मुस्कटदाबी करायचे. टीव्हीचा आवाज बंद करायचा अन् बॉबी तल्यारखानच्या आवाजातली रेडिओवरची कॉमेण्ट्री ऐकायची हा मार्ग भारतीयांनी शोधला होता. - पण चॅनल नाइनवर बेनॉला ऐकल्यावर टीव्हीचा दाबलेला गळा आपण सोडला. चित्रही टीव्हीवरचं आणि आवाजही टीव्हीचा हे स्थित्यंतर घडविण्यात सर्वात मोठा वाटा बेनॉचा. त्याची नर्मविनोदी शैली, भाषेवरचं प्रभुत्व, क्रिकेटविषयीची विलक्षण समज या सा:या गुणांनी क्रिकेटशौकिनांच्या मनावर गारूड केलं. बेनॉची अनेक वाक्यं क्रिकेट जगतात ‘कोट’ म्हणून गाजली.
क्रीम कलरचा कोट परिधान केलेला, पिकल्या केसांचा, पोपटासारख्या टोकदार नाकाचा, काहीशा रूंद जीवणीचा हा माणूस छोटय़ा पडद्यावर दिसला, की अस्सल क्रिकेटशौकिन चॅनल बदलत नसत.
बेनॉचा प्रभाव इतका विलक्षण होता, की त्याचं स्वत:चं एक फॅन फॉलोइंग तयार झालं. कॉमेण्ट्री बंद केल्यानंतरही बेनॉनं सिडनीतल्या कसोटी सामन्यांना हजेरी लावली. तेव्हा बेनॉसारखी वेशभूषा आणि केशभूषा केलेले शेकडो फॅन एकगठ्ठा बसलेले दिसायचे. हे भाग्य विरळा. शिवाय सिडनीच्या स्टेडियमच्या आवारात बेनॉचा उभारला गेलेला पुतळा हे जितकं त्याच्या कर्तृत्वाचं गमक, तितकंच त्याच्या लोकप्रियतेचंही !
कॉमेण्ट्री करताना बेनॉ एक जीवघेणा पॉज घ्यायचा, अगदी अटलबिहारी वाजपेयींच्या जातकुळीतला. कान आतूर असायचे, त्या पॉजमागून येणा:या शब्दांसाठी. पण या खेपेस त्यानं घेतलेला पॉज नि:श्वास न टाकताच त्याच्यासोबत निघून गेला..
(लेखक ‘लोकमत’चे सहयोगी संपादक आहेत.)