प्रयोग-शाळा

By Admin | Updated: December 24, 2016 18:47 IST2016-12-24T18:47:14+5:302016-12-24T18:47:14+5:30

एकाच अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील एकदम ४० शाळा गुणवत्तेत सारख्या दर्जाने बदलणे हा काहीसा अविश्वसनीय वाटणारा प्रयोग महाराष्ट्रात सज्जनगडच्या पायथ्याशी घडला आहे.

Experimental school | प्रयोग-शाळा

प्रयोग-शाळा

- हेरंब कुलकर्णी

एकाच अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील एकदम ४० शाळा गुणवत्तेत सारख्या दर्जाने बदलणे  हा काहीसा अविश्वसनीय वाटणारा प्रयोग महाराष्ट्रात सज्जनगडच्या पायथ्याशी घडला आहे. सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटच्या विस्ताराधिकाऱ्यांनी बारा वर्षांच्या अथक प्रयत्नांनी त्यांच्या नियंत्रणातील जिल्हा परिषदेच्या शाळांत हा प्रयोग यशस्वी केला आहे. गेल्या वर्षभरात या शाळा बघण्यासाठी एकूण ८० हजार शिक्षक व शिक्षणप्रेमींनी भेट दिली आहे. -

एखाद्या शाळेचा एखादा वर्ग प्रयोगशील होऊन बदलणे आपण समजू शकतो, एखादी पूर्ण शाळा बदलणे आपण समजू शकतो, परंतु एकाच अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील एकदम ४० शाळा गुणवत्तेत सारख्या दर्जाने बदलण्याचा चमत्कार करून दाखवला आहे प्रतिभा भराडे या समर्पित विस्ताराधिकारी यांनी. २००३ पासून कुमठे बिटमध्ये त्यांनी काम सुरू केले. सज्जनगडाच्या पायथ्याचा हा परिसर जिरायती शेतीचा आणि गरीब कष्टकरी शेतकरी वर्गाचा आहे. सुरुवातीला १०० टक्के मुले शाळेत आणण्यासाठी अनेक उपक्र म त्यांनी राबवले. त्यातून प्रत्येक शाळेत लेजीम पथक, बालसभा असे उपक्र म सुरू झाले. अपंग मुलांवर शस्त्रक्रिया आणि तपासणी झाली. सर्व मुलांची हिमोग्लोबिन तपासणी झाली. त्यांच्या आजारांचे मूळ कुपोषणात सापडले. या कुपोषित मुलांना सकस आहार मिळण्यासाठी प्रत्येक शाळेसमोर परसबाग हा उपक्रम आणि पालक प्रबोधन चळवळ डॉक्टर शैला दाभोळकर यांच्या मदतीने सुरू केली. त्यातून कुपोषण कमी झाले. 


हळूहळू शाळेत विविध उपक्र म सुरू झाले. सर्व शाळांसाठी समान ६६ उपक्र म एकाचवेळी सुरू झाले. प्रतिभा भराडे सर्व शाळांना भेट देत मार्गदर्शन करीत होत्या. आज मुलांना नापास करायचे नाही हा निर्णय वादाचा बनलेला असताना, २००४ साली एकही मूल नापास करायचे नाही हा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. मुलगी जर नापास झाली तर तिचे लहान वयात लग्न लावून दिले जाते अन् मुलगा नापास झाला तर त्याला शाळा सोडायला लावून शेतावर कामास लावले जाते; हे चित्र बदलण्यासाठी त्यांचा हा निर्णय होता. 


२०१० साली ज्ञानरचनावादाच्या आधारे अभ्यासक्र म बदल सुरू झाले. प्रतिभा भराडे यांना त्या समितीवर काम करता आले. ज्ञानरचनावाद आपल्या शाळांमध्ये राबवायचा असे त्यांनी ठरविले. वाई येथील अरुण किर्लोस्कर यांचे भारत विद्यालय येथे रचनावाद अवलंबिला जातो. किर्लोस्करांनी त्यांना रचनावाद समजायचा असेल तर दहा दिवस येऊन राहा असे सांगितले. त्यानुसार पहिलीच्या वर्गात बसून काय चालते याचे त्यांनी निरीक्षण केले. त्यानुसार २०११ साली त्यांच्या ४० शाळांमधील पहिलीच्या वर्गावर त्यांनी रचनावाद सुरू केला. शिक्षकांच्या अगदी बारीक-सारीक शंकांसाठी सतत बैठका घेतल्या. 


पहिलीच्या वर्गासाठी त्यांच्या सूचना बघितल्या तरी आपल्याला त्यांच्या दृष्टिकोनाचा अंदाज येतो. आरसा, पावडर, कंगवा वर्गात ठेवा.. मुलांना आरशात बघायला आवडते.. वर्गात मुलांना बडबड करायला जास्तीत जास्त संधी द्या.. वर्गात रंगीत चित्रांची पुस्तके असली पाहिजेत.. गाणी आणि गोष्टी ऐकविण्यासाठी वर्गात सीडी ठेवा.. असे करत करत मुले वेगाने शिकू लागली. शिक्षकांनीही शैक्षणिक साहित्य बनविले. शाळेत तांदूळ असतो. त्याला वेगवेगळे रंग देऊन ते वेगळे करणे, मोजणे, लेखनासाठी बोटांना वळण लागावे म्हणून एकमेकीच्या वेण्या घालणे असले असे सोपे साहित्य. गणित, मराठी आणि इंग्रजी विषयात पहिलीच्या मुलांच्या क्षमता अविश्वसनीय वाटाव्यात इतक्या विकसित झाल्या आहेत. 


मी स्वत: या बिटमधील पोगरवाडी व दरे तर्फे परळी शाळेला भेट दिली. तेव्हा पहिलीच्या मुलांना शाळेत येऊन पाचच महिने झाले होते. तरी ‘आॅस्ट्रेलिया’ हा शब्द त्यांनी लिहून दाखवला. कोटीपर्यन्त संख्या वाचून दाखवली. गणितात समीकरणाची गणिते सोडवून दाखवली. मला इंग्रजीत प्रश्न विचारून मुलाखत घेतली. आणि हे एकाचवेळी सर्व मुलांमध्ये विकसित झाले आहे. मराठीत मुले कविता करतात आणि गोष्टी रचतात. मराठी भाषेत शब्दसंपत्ती विशेष विकसित झाली आहे. वर्तनवाद झुगारून रचनावाद स्वीकारण्याची प्रक्रि या शाळाशाळांमध्ये सुरू केली. आत्मविश्वास, आनंद, निर्णयक्षमता या गुणांचे विकसन कसे होईल यावर लक्ष केंद्रित केले. शिक्षकांशी बोललो तेव्हा ते म्हणाले की, आम्ही काही शिकवत नाही पण मुलांना शिकण्याची संधी निर्माण करतो. त्यातून मुले स्वत: शिकतात.


मला इंग्रजी विषयातील मुलांची प्रगती विशेष उल्लेखनीय वाटली. घरी कोणतेही वातावरण नसताना ही मुले सफाईदार इंग्रजी कशी बोलतात, यावर भराडे यांनी सांगितले की, ‘सीएलआर’ या संस्थेची यासाठी त्यांनी मदत घेतली. त्या संस्थेच्या सीडी खूप छान आहेत. मूल मातृभाषा ज्या पद्धतीने शिकते अगदी त्याच पद्धतीने मुलांना सतत ऐकवून श्रवण - भाषण पद्धतीने इंग्रजी भाषा शिकवली जाते. याचा फायदा म्हणजे या परिसरातील मुलांची इंग्रजी माध्यमांच्या शाळांऐवजी मराठी शाळांनाच पसंती आहे. 


कुमठे बीटचे हे यश हा आज जिल्हा परिषद शाळांसाठी दीपस्तंभ झाला आहे. शिक्षण सचिव नंदकुमार यांनी या शाळा बघितल्यावर राज्यातल्या शिक्षकांना या बिटचा अभ्यासदौरा आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले. त्यातून एका वर्षात ८०,००० शिक्षक, शिक्षणप्रेमी या ठिकाणी अभ्यासाला आले आणि राज्याच्या रायगड, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, नाशिक, यवतमाळ, बीड, रत्नागिरी यासारख्या अनेक जिल्ह्यांतील शाळांनी प्रेरणा घेऊन रचनावादाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. प्रगत महाराष्ट्र कार्यक्र म वेगाने पुढे जाऊ लागला. प्रतिभा भराडे यांनी आजपर्यंत २५ जिल्ह्यांत जाऊन शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यामुळे या बिटमधील प्रयोगांचे राज्यभर सार्वत्रिकीकरण होते आहे. 
ग्रामीण शिक्षणाचे हे बदलते चित्र खूप सुखद आणि आशादायक आहे.

 

प्रयोगाचे यश

प्रतिभा भराडे यांच्या या यशाचे मूल्यमापन करताना लक्षात येते की, सलग १२ वर्षे १२५ पेक्षा जास्त शिक्षकांना एकाच प्रेरणेने काम करायला लावणे हे या प्रयोगाचे सर्वात मोठे यश आहे. याबाबत भराडे म्हणाल्या की, माझ्यात आणि शिक्षकांच्या नात्यातून हे घडले आहे. कोणत्याही सक्तीने हे घडले नाही. मी अधिकारी म्हणून प्रत्येकाच्या आत असलेल्या एका चांगल्या माणसाचा शोध घेते. या रचनावादात शिक्षकांना आनंद मिळाला. त्यातून ते अधिक उपक्र म शोधत गेले. केवळ प्रबोधनपर भाषणांनी शिक्षक बदलत नाहीत. त्यासाठी त्यांचे प्रशिक्षण, शिक्षकांसोबत काम करणे आणि अडचण येईल तिथे शिक्षकाला मदत करणे यातून शिक्षक बदलत जातात. आणि ही संख्या वाढत गेली की इतर शिक्षकही बदलू लागतात.

शाळांतील वाचनसंस्कृती

ग्रामीण भागात असलेल्या या प्रत्येक शाळेत आज किमान सातशेपेक्षा जास्त पुस्तके आहेत. बहुतेक मुलांनी ५०० पेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत. अंकिता जाधव या पाचवीतल्या मुलीने तर आजपर्यंत १००० पुस्तके वाचल्याच्या नोंदी ठेवल्या आहेत. वाचनसंस्कृती इथे इतक्या खोलवर रुजली आहे . (समाप्त)

 (लेखक प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

herambkulkarni1971@gmail.com

Web Title: Experimental school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.