डिझाइनचा जन्म

By Admin | Updated: March 1, 2015 15:10 IST2015-03-01T15:10:22+5:302015-03-01T15:10:22+5:30

आदिमानवाने दगडाच्या धारेपासून हातकुर्‍हाड बनवली, आपणही अचानक गॅस संपला की चहा-कॉफीसाठी तापलेली इस्त्नी उलटी ठेऊन इलेक्ट्रोप्लेट बनवतो.- या दोन्हीतला धागा समानच आहे.

Design's Birth | डिझाइनचा जन्म

डिझाइनचा जन्म

>नितीन कुलकर्णी
 
आदिमानवाने दगडाच्या धारेपासून हातकुर्‍हाड बनवली, आपणही अचानक गॅस संपला की चहा-कॉफीसाठी तापलेली इस्त्नी उलटी ठेऊन  इलेक्ट्रोप्लेट बनवतो.- या दोन्हीतला धागा समानच आहे.
--------------------
 
मानवी अस्तित्वाचे आद्य लक्षण म्हणजे हालचाल आणि गती. आदिमानव चालू लागला तो क्षण त्याला वाटला नसेल एवढा नंतर महत्वाचा ठरला. दोन पायांवर चालणे ही कृती करण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबरच मेंदूतली चेतनाही तेवढीच महत्त्वाची होती. कारण चालल्यानंतर स्थलांतर झाले व त्यातून जगणे अजून कठीण होऊ लागले. यातूनच जगण्याशी संबंधीत असलेली प्रगतीची प्रेरणा नवनिर्मितीशी आणि पर्यायाने डिझाइनशी जोडलेली आहे. माणसाने वस्तू, साधने, कार्यपद्धती, प्रतीके आणि प्रणाली यांचे नवनवीन शोध लावले व नंतर या सगळ्या गोष्टी प्रगत केल्या तेव्हा त्याने डिझाइनची प्रक्रिया वापरली.
एक अतिशय मूलभूत प्रश्न: या जगातली पहिली डिझाइन केलेली वस्तू कुठली? 
या प्रश्नाचे  उत्तर म्हणजे  आदिमानवाने बनवलेली हातकूर्‍हाड ! हे दगडांचे अवशेष कुर्‍हाडींच्या पात्यांसारखे दिसतात. लांबट पानाच्या आकारासारख्या बोथट आणि गोल भागावर हाताची पकड पक्की करून सुरी किंवा खंजीरासारखे हे पाते प्राण्यांच्या शरीरावर वापरता येते किंवा फेकता येते. सरळ धारींच्या कुर्‍हाडीदेखील सापडल्या आहेत. 
ज्या काळी कुठल्याही प्रकारच्या जीवनप्रणाली; इतकेच काय भाषादेखील अस्तित्वात नव्हती अशा काळात बनलेल्या या दगडांना डिझाइन का म्हणायचे? 
आपल्या डिझाइनच्या व्याख्येच्या अेका पैलूचा विचार करु . डिझाइन करण्याची सुरुवात जगण्यातल्या एखाद्या अडचणीने अथवा उपयोगाच्या शक्यतेने होते. कुठलीही दैनंदीन कृती अथवा कार्य सुकर करणे हेच उद्दीष्ट नवीन वस्तू बनवण्याच्या मागे असते आणि ते करण्यासाठी डिझाइन योजले जाते. मराठीत डिझाइनला  ‘सुयोजन’ असा शब्द सूचक ठरू शकतो.
अशूलीअन  हातकुर्‍हाडी या  डिझाइन प्रोसेसच्या पहील्या उत्पादीत वस्तू होत. परंतु ही पहिली आयुधं  नव्हेत. सुरुवातीला नैसर्गिकरित्या धार मिळालेले दगड वापरले गेले  व त्यांच्या प्रेरणेतूनच पोट भरण्यासाठी शिकार करण्याची मूलभूत गरज प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी मानवाने हे डिझाइन कल्पिले.
गरज ही शोधाची तर त्यातली उणीव वा शक्यता ही डिझाइनची जननी आहे
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात. परंतु शोधाकडे डिझाइन म्हणून पाहता येणार नाही. गरजेची झालेली परिपूर्ती ही कालाच्या ओघात उपयोगितेच्या दृष्टीने कमी वाटत असते. वस्तू वापरत असताना त्यातल्या कमतरतेची झालेली जाणिव ही डिझाइनची जननी आहे असे म्हणता येइल. 
या संदर्भात आधी आपण ‘शोध’  आणि  ‘डिझाइन’  मधला फरक उदाहरणाच्या आधारे बघू. १९४0 मधे ए के 47च्या डिझाइनचा जन्म झाला, हे डिझाइन मिखाइल कलाश्नीकॉव्ह या सोव्हीएत सैनिकाने तयार केले होते. जेव्हा ही प्रगत रायफल बनवली त्या अगोदरच रायफलचा शोध लागलेला होता. डिझाइन हे आधी लागलेल्या शोधाचे सुधारीत रूप असते.
आदिमानवाच्या संदर्भात बोलायचे झाल्यास याची कल्पना करता येईल की अपघाताने म्हणा किंवा अनुभवाच्या आधारे म्हणा, तुटलेल्या दगडाच्या धारदार कडेचा वापर प्राण्यांना मारणे व नंतर मांस कापणे यासाठी करता येणे याला शोध म्हणता येईल. सुरूवातीच्या काळात अश्याप्रकारचे दगड शोधणे व वापर करणे असाच शिरस्ता दिसतो. पुढे दगडावर दगडाचा आघात करून धारधार पाते बनवता येते, ह्या शक्यतेचे सुयोजन  केलेले दिसते. या हातकुर्हाडीच्या वापरात आलेली अडचण दूर करण्यासाठी धार असलेल्या दगडाला लाकडाच्या लांबट मुठीला दोराने जोडून पुढचे सुयोजन केलेला दिसतो. या नवीन रुपात मूळ शोधातील तंत्न तसेच वापरले जाते. यातूनच डिझाइनच्या क्षेत्नात प्रगती होते आणि होतच राहते.
आदिमानवाच्या संदर्भात आताची आपली परिस्थिती अगदी वेगळी असली तरी एकंदरीत जगण्याची पद्धत सुधारणे हे आपण सातत्याने करत असतोच. या अशा छोट्या छोट्या उपक्र मांच्या बाबतीत वेगवेगळ्या वस्तूंमधे वापरण्यायोग्य बदल करत असतोच. हे तुम्हीदेखील अनेकदा केलेले असेल.
 काही उदाहरणे- शॉवरची जाळी तुटल्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटलीचा  होममेड शॉवर बनतो. गॅस संपला असताना चहा-कॉफीसाठी तापलेली इस्त्नी उलटी ठेउन इलेक्ट्रोप्लेट बनते, हे तर आपण करतच असतो की!
- तेच सुयोजन. डिझाइन!
 
डिझाइन संवाद
 
एकदा डिझाइन मेथडच्या शिक्षकाने वर्गात प्रश्न केला, डिझाइन म्हणजे काय? काही उदाहरणे देऊन सांगा.
विद्यार्थिनी : निसर्गातली कुठलीही गोष्ट, जसं की फूल. ते किती सुंदर असतं. प्रत्येक फुलाचा वेगळा रंग, सुगंध आणि उपयोगदेखील. फळ तयार होण्यासाठी देवानेच ते डिझाइन बनवलंय. देवदेखील डिझायनर नाही का?’
शिक्षक : (जरा संभ्रमावस्थेत) येस! पण आपण मानवाच्या प्रगतीबद्दल व भौतिक प्रगतीबद्दल बोलत होतो.
विद्यार्थिनी : पण सर, तुम्ही जी डिझाइनची व्याख्या सांगितलीत त्यात हे उदाहरण तंतोतंत बसतंय.
शिक्षक : हो, पण डिझाइनची संकल्पना ही वस्तू बनण्याच्या आधी विचारांच्या स्वरूपात असली पाहिजे म्हणजे मानवी तर्काच्या आधारे. निसर्गाचं सूत्र हे निसर्गातच अंगभूत असतं.
शिक्षक ( मनात) : आता ही चर्चा डिझाइनच्या प्रक्रियेकडे कशी वळवायची?
शिक्षक (विद्यार्थिनी २ ला उद्देशून) : बरं, क्षणभर असं गृहीत धरू की तू देव आहेस आणि आता तुला या जगात बदल घडवून आणायचा आहे. एक महत्त्वाचं म्हणजे आपण माणूसरूपात असून, आपल्याजवळ दैवी शक्ती नाही. अशावेळी तू कशाचं आणि कशाच्या आधारे डिझाइन बनवशील?
विद्यार्थिनी २ (मनात) : मी एकटी कशी जगात बदल घडवणार?
शिक्षक : जगात कुठलाही बदल होण्याची प्रक्रि या ही अनेक टप्प्यांची असते. अनेक लोक आधीच्या परिस्थितीत चांगले अथवा वाईट बदल करत असतात. तुम्हाला या प्रक्रियेचा भाग बनायचं आहे का? जर तुमचं उत्तर होकारार्थी असेल तर तुम्ही डिझाइन हा विषय शिकू शकाल.

Web Title: Design's Birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.