Changing techniques of bird studies.. | पक्ष्यांच्या अभ्यासाचे बदलते तंत्र 

पक्ष्यांच्या अभ्यासाचे बदलते तंत्र 

ठळक मुद्देस्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यासाचे नवे तंत्र आता उपलब्ध झाल्यामुळे पक्ष्यांच्या आयुष्याबद्दल आणखी बरीच माहिती उजेडात येऊ शकेल.

- संजय करकरे

राजस्थानातील सांबर सरोवरात अलीकडेच हजारो स्थलांतरित पक्षी मृत्युमुखी पडले. सातासमुद्रापार स्थलांतर करून आलेल्या या पाणपक्ष्यांच्या मृत्यूने पक्षी अभ्यासकांना मोठा धक्का बसला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित पक्ष्यांचा अभ्यास पुन्हा चर्चेला आला आहे.
पक्ष्यांच्या जीवनक्रमात स्थलांतर ही एक अनोखी प्रक्रिया आहे. काही पक्षी जवळच्या परिसरात (स्थानिक) स्थलांतर करतात. काही विणीसाठी, तर काही ऋतुमानानुसार स्थलांतर करतात. खाद्याची उपलब्धता, उपजत ज्ञान या पक्ष्यांच्या स्थलांतराच्या कामात येते. प्रामुख्याने उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धाकडे हे स्थलांतर होत असल्याचे (हिवाळी स्थलांतर) स्पष्ट झाले. मात्र, ही गोष्ट 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत माहीत नव्हती. हिवाळ्यात युरोपातील अनेक पक्षी स्थलांतर करीत; पण ते दिसेनासे झाल्यावर ते शीतनिद्रा घेत असावेत, असा समज होता. अँरिस्टॉटलला वाटायचे की हे पक्षी झाडाच्या ढोलीत शीतनिद्रा घेत असावेत. पुढे विसाव्या शतकात प्रवासी साधनांमुळे जग जवळ येऊ लागले. युरोपातील पक्षी हिवाळ्यात उष्णकटिबंधात स्थलांतर करतात हे सत्य अभ्यासकांना समजले. पक्षीजीवनातील हा एक मोठा उलगडा ठरला.
भारतातील पर्यावरण क्षेत्रात अग्रणी असणार्‍या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीला (बीएनएचएस) पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाचा प्रदीर्घ अनुभव आहे. 1926 साली मध्य प्रदेशातील धार संस्थानात पक्ष्यांचे स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांच्या पायात वळी (कडी) अडकवण्याचे काम सर्वप्रथम बीएनएचएसने केले.
1959च्या सुमारास डॉ. सलीम अली यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्यांच्या पायात कडी अडकवण्यास सुरुवात झाली. पक्ष्यांना पकडण्यासाठी विविध पद्धतींचा वापर केला जातो. खासकरून स्थलांतरित पाणपक्ष्यांना पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जाळ्यांचा वापर होतो. यासाठी प्रशिक्षित ‘ट्रॅपर्स’ या कामी येतात. हे ‘ट्रॅपर्स’ पारंपरिक पारधी अथवा विशिष्ट समुदायातील माणसे असून, शिकार हे त्यांचे पारंपरिक उपजीविकेचे साधन होते. या व्यक्तींना डॉ. सलीम अलींनी त्यावेळी प्रशिक्षण दिले होते. आज त्यांच्या कुटुंबीयांतील पिढय़ा बीएनएचएसकडे कार्यरत आहेत.
पक्ष्यांच्या पायात अडकविण्यात येणार्‍या कड्या (वळी) अँल्युमिनिअमच्या असतात. त्या वेगवेगळ्या व्यासाच्या असतात. सर्व वळ्यांवर क्रमांक, सांकेतिक नाव व संस्थेचे नाव असते. पक्ष्याला पकडल्यावर हा क्रमांक, डेटा शीटमध्ये भरून त्याचे संपूर्ण वर्णन नोंदले जाते. त्याच्या शरीराची मापे घेतली जातात. सर्व माहिती भरून मग या पक्ष्याला त्याच्या अधिवासात सोडले जाते. हे सर्व काम अत्यंत जोखमीचे असते. काळजीपूर्वक ते पार पाडले जाते.
1959च्या सुमारास पक्षी स्थलांतराचा अभ्यास प्रामुख्याने त्याद्वारे पसरणार्‍या रोगांसाठी केला गेला. (बर्ड फ्लू) मायभूमीत येताना या पक्ष्यांसोबत कोणते आजार येतात, याचा हा मागोवा होता. नंतरच्या काळात मात्र हा फोकस बदलला. पक्षी कोठून आला, त्याचा मार्ग कुठला होता, त्याला किती दिवस येथे येण्यास लागले, तो किती काळ जगतो, तसेच ज्या परिसरात तो मुक्काम करतो त्या जागेची सुरक्षितता ध्यानात घेण्यात येते. अलीकडच्या काळात हवामान बदलांचा या पक्ष्यांवर काय परिणाम होत आहे, याचाही पक्षी स्थलांतराचा अभ्यास करताना प्रामुख्याने विचार होत आहे.
बीएनएचएसने आजअखेर सुमारे सात लाखांहून अधिक पक्ष्यांच्या पायात कडी घातली आहे. संपूर्ण देशात आजही विविध केंद्रांवर यांचा अभ्यास, नोंदणी घेणे सुरू आहे. दक्षिण भारतातील पॉइंट कॅलिमर (तामिळनाडू) व ओडिशातील चिल्का सरोवरातील केंद्रातून आजअखेर दीड लाख पक्ष्यांच्या पायात कडी घातली गेली आहे. पायात कडी अडकवलेले पक्षी सोडल्यानंतर ते परत मिळण्याचे (रिकव्हरी) प्रमाण अत्यंत नगण्य असते, त्यामुळे या अभ्यासात अनेक बदल झाले असून, नवीन तंत्रज्ञानही आले आहे.
वर म्हटल्याप्रमाणे पक्ष्यांच्या पायातील कडी लावलेला पक्षी परत सापडण्याचे प्रमाण नगण्य असल्यामुळे आता पक्ष्यांना कलर टॅग (प्लॅस्टिकचा टॅग) लावण्याचे काम जोरात सुरू आहे. यासाठी ऑस्ट्रेलियन हवाई मार्गाच्या रंगीत टॅगचा वापर केला जात आहे. भारतात उत्तर व दक्षिण अशा विभागात पकडलेल्या पक्ष्यांच्या पायात विशिष्ट रंगांचे टॅग लावण्यात येत आहेत. या टॅगचा फायदा असा आहे की, उत्तम कॅमेर्‍याने काढलेल्या फोटोत या पक्ष्यांच्या पायातील टॅग क्रमांक स्पष्ट दिसून येतो, ज्याद्वारे या पक्ष्यांच्या स्थलांतराचा उलगडा होऊ शकतो. आता त्याहून पुढे जाऊन मोबाइल बेस जीएसएम ट्रान्समीटर लावण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. बीएनएचएसने 2007 ते 2011 या दरम्यान सुमारे 16 प्रजातींच्या 120 पक्ष्यांना ट्रान्समीटर बसवले, ज्याआधारे पक्ष्यांचे अत्यंत अचूक असे हवाई मार्ग, मुक्कामाचे ठिकाण, विणीचा, मुक्कामाचा काळ, परत येण्याचे मार्ग, सुरक्षित पाणस्थळींबाबत माहिती उपलब्ध होत गेली. सध्या विविध केंद्रीय खात्यांच्या किचकट प्रक्रियांमुळे संस्था हे ट्रान्समीटर लावू शकत नाही.
दिनांक 18 ते 22 नोव्हेंबरअखेर बीएनएचएसने लोणावळा येथे पाणथळ जागा व स्थलांतरित पाणपक्ष्यांसंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत आर्टिक परिसरापासून जगभरात काम करणार्‍या पक्षी शास्रज्ञांची मांदियाळी भरली होती. या परिषदेत जगभरात पक्षी संवर्धनासोबतच स्थलांतराबाबत सुरू असलेल्या कामाबद्दल विचारमंथन झाले. विचारांची देवाण-घेवाण झाली. एकत्रपणे कसे काम करता येईल, याबाबत चर्चा झाली. ही परिषद या विषयात काम करणार्‍यांसाठी मोठी प्रेरणादायी होती.
स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यासाचे नवे तंत्र आता उपलब्ध झाल्यामुळे आणि त्याचा वापरही सुरू झाल्यामुळे पक्ष्यांच्या आयुष्याबद्दल आणखी बरीच माहिती उजेडात येऊ शकेल. पक्ष्यांच्या संदर्भात एक नव्या पर्वाची ही नांदी आहे..

पक्ष्यांच्या स्थलांतराचे नऊ हवाई मार्ग 
पक्ष्यांच्या स्थलांतराचा जगभरात अभ्यास सुरू आहे. त्यावरून पक्ष्यांच्या स्थलांतराचे नऊ हवाई मार्ग (फ्लायवे) माहीत झाले आहेत. हजारो वर्षे पक्षी या हवाईमार्गांचा वापर करून स्थलांतर करीत आहेत. भारतात येणारे 90 टक्के पक्षी मध्य आशियाई हवाई मार्गाचा (सेंट्रल एशियन फ्लायवे) अवलंब करतात. हिवाळ्यात साधारण 160पेक्षा अधिक जातींचे पक्षी स्थलांतर करून देशात येतात. या हवाई मार्गाचा आता दीर्घ अभ्यास सुरू असून, केंद्रीय पर्यावरण खात्याने कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्रासह 16 राज्यांत स्थलांतरित पक्ष्यांचा विस्तृत अभ्यास बीएनएचएस करीत आहे. स्थलांतरित पक्ष्यांवर बीएनएचएसने केलेल्या नऊ दशकांच्या अभ्यासाचे फलित म्हणजे दोन वर्षांपूर्वी आलेले ‘मायग्रेशन अँटलास’ हे पुस्तक.  

चार हजारांवर पक्ष्यांच्या पायात कडी 
नांदूरमधमेश्वर, जायकवाडीसह ठाणे खाडीचा परिसर केंद्रबिंदू मानला आहे. दुसरीकडे मुंबईत होणार्‍या ट्रान्सहार्बर लाइनचा स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवनावर काय परिणाम होतो, याचाही दीर्घ अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत मुंबई येथे चार हजारांवर पक्ष्यांच्या पायात कडी अडकवली असून, यंदा हा आकडा सात हजारांपर्यंत जाणार आहे. बीएनएचएसतर्फे केरळमध्ये साथीच्या रोगाबाबत पक्षी स्थलांतराचा अभ्यास सुरू आहे, तसेच उत्तर प्रदेशात ग्रीन मुनियासाठी मध्य प्रदेशातील चंबळ खोर्‍यात इंडियन स्कीमर पक्ष्यासाठी, सिक्कीममध्ये फिंच पक्ष्यांसाठी, गुजरातमधील खेजडिया व इतर समुद्रकिनार्‍यांवरील स्थलांतरित पक्ष्यांसाठी पायात कडी घालण्याचे बीएनएचएसचे काम सुरू आहे.
sanjay.karkare@gmail.com
(लेखक बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे सहायक संचालक आहेत.)

Web Title: Changing techniques of bird studies..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.