सार्थ गीतार्थ : गीता हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही. ते एक महान धार्मिक काव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 07:00 AM2019-12-08T07:00:00+5:302019-12-08T07:00:05+5:30

मन-शरीर-आत्म्याने परमेश्वराला शरण जाणं हा मार्ग गीतेने सांगितला आहे...

Bhagwadgeeta Significant | सार्थ गीतार्थ : गीता हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही. ते एक महान धार्मिक काव्य

सार्थ गीतार्थ : गीता हा तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही. ते एक महान धार्मिक काव्य

Next

‘भगवद्गीता गांधीजींच्या चिंतनातून’ हे भगवान दातार यांनी अनुवादित केलेले पुस्तक रोहन प्रकाशनतर्फे नुकतेच प्रकाशित झाले आहे. महात्मा गांधींनी जनसामान्यांसाठी भगवद्गीतेचं केलेले नेमकं विवेचन त्यामध्ये आहे. या पुस्तकातील गांधीजींनीच लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश..

.........................

स्वत:ला ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून गीतेने कर्माच्या फळाचा त्याग करण्याचा बिनतोड आणि अद्वितीय मार्ग सुचवला आहे. याच एका सिद्धांताच्या भोवती गीतेचं संपूर्ण तत्त्वज्ञान गुंफण्यात आलं आहे. कर्मफलत्याग हा केंद्रस्थानी असलेला सूर्य आहे आणि श्रद्धा, भक्ती, ज्ञान या गोष्टी त्याच्याभोवती ग्रहांप्रमाणे फिरत असतात. शरीराला अनेकांनी तुरुंगाची उपमा दिली आहे. जिथे शरीर आहे तिथे कृती ही असलीच पाहिजे. जिवंत असलेली कोणतीही व्यक्ती कृतीपासून किंवा श्रमापासून दूर राहू शकत नाही. तरी शरीर हे परमेश्वराचं देऊळ मानून माणूस मुक्त होऊ शकतो, असं धार्मिक लोक सांगत असतात. माणसाची प्रत्येक कृती जर दोषयुक्त असेल तर मग ती कृती करणाºया शरीराला देवाचं मंदिर कसं मानायचं? वेगळ्या शब्दांत सांगायचं म्हणजे माणसाला कृतीपासून मुक्ती कशी मिळणार? गीतेने या प्रश्नाचं अतिशय स्वच्छ शब्दांत उत्तर दिलं आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानानुसार फळाची आशा न धरता केलेल्या कोणत्याही कर्मामुळे माणसाला मुक्ती मिळू शकते. फळाचा त्याग करणं किंवा आपलं सगळं कर्म देवाला समर्पित करणं, मन-शरीर-आत्म्याने परमेश्वराला शरण जाणं हा मार्ग गीतेने सांगितला आहे.
 फळाबद्दलची ही अनिच्छा किंवा फलत्यागाची भावना काही नुसतं बोलून येत नाही, किंवा अभ्यास करूनही ती साधता येत नाही. हृदयात सतत चालू असलेल्या चिंतन-मननातूनच ती साधता येते. फलत्यागाची स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी योग्य ज्ञानाची गरज आहे. शिकलेल्या माणसाकडे विशिष्ट प्रकारचं ज्ञान असतं. ते वेद तोंडपाठ म्हणून दाखवू शकतात, पण तरीही त्याच वेळी त्यांच्या मनात खूप अहंकार असतो. गीतेने या ज्ञानाबरोबर येणाºया भक्तीला अधिक महत्त्व दिलं आहे. भक्ती किंवा श्रद्धेशिवाय असलेलं ज्ञान चुकीचं किंवा विध्वंसक होऊ शकतं. त्यामुळे 'तुम्ही श्रद्धा बाळगा, ज्ञान आपोआप चालत येईल.' असं गीतेने म्हटलं आहे. ही भक्ती म्हणजे केवळ ओठांनी केलेली पूजा नव्हे; एक प्रकारे ती मृत्यूशी झुंजच होय. मंत्र म्हणत भक्ती ही विवेकपूर्ण असावी, इतकी ती कठोर हवी, असं गीतेनं म्हटलं आहे.
 याचा अर्थ गीतेला अभिप्रेत असलेली भक्ती म्हणजे हळव्या मनाचा भावनातिरेक नव्हे. ही भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नक्कीच नाही. गीतेला अभिप्रेत असलेल्या भक्तीचा बाह्य गोष्टींशी थोडाही संबंध नाही. भक्त त्याला आवडेल ती गोष्ट करू शकतो. कोणी जपमाळ घेऊन जप करील, कोणी कपाळावर गंध लावील, कोणी नवस बोलेल; पण या गोष्टी म्हणजे भक्ती नव्हे. तोच खरा भक्त जो कुणाचाही द्वेष करत नाही, जो दयेचा झरा असतो, ज्याच्याकडे अहंकाराचा लवलेश नसतो, जो नि:स्वार्थी असतो, सुख आणि दु:ख यांना जो समान भावनेने सामोरा जातो, जो क्षमाशील आणि संतुष्ट आहे, ज्याचे विचार ठाम असतात, ज्याच्यात समर्पणवृत्ती आहे, ज्याने आपलं मन आणि हृदय देवाच्या चरणी अर्पण केलं आहे, ज्याची कुणाला भीती वाटत नाही किंवा ज्याला कुणाची भीती वाटत नाही, आनंद, दु:ख आणि भय यांपासून जो मुक्त असतो, जो पवित्र आहे, जो नेहमीच कृतिशील असतो, पण कोणत्याही कृतीचा परिणाम त्याच्यावर होत नाही, जो कुठल्याही कर्माच्या चांगल्या आणि वाईट फलांचा त्याग करतो, जो मित्र आणि शत्रूला समभावनेने वागवतो, आदर किंवा अनादराचा ज्याच्यावर परिणाम होत नाही, स्तुतीने जो हुरळून जात नाही, किंवा निंदेने विचलित होत नाही, ज्याला शांतता प्रिय असते आणि एकांत आवडतो आणि जो नेहमीच विवेकाने वागतो अशा व्यक्तीची भक्ती एकाच वेळी काळाबरोबर आणि कालातीत असते.
खरी भक्ती म्हणजे स्वत:ला ओळखणं. स्वत:ला ओळखणं म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही. आपल्याजवळ एक रुपया असेल तर आपण त्यातून दूध किंवा विष काहीही घेऊ शकतो. पण ज्ञान किंवा भक्तीने आपल्याला मुक्ती किंवा प्रेम मिळत नाही. कारण या काही देवाण-घेवाणीच्या वस्तूच नाहीत. पण या गोष्टी आपल्याला हव्या तर असतात. दुसºया शब्दांत सांगायचं म्हणजे यांबाबत साध्य आणि साधन हे दोन्ही वेगवेगळं नाही, एकच आहे. साधनेची पराकाष्ठा म्हणजे मुक्ती. गीतेला अभिप्रेत असलेली मुक्ती म्हणजे शांतता.
 आता भक्तीचं उदाहरण घ्या. सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, भक्ती म्हणजे कोमल भावना, आवडती गोष्ट करणं, किंवा जप करणं. हा भक्त स्वत: जेवण्यासाठी किंवा स्वत:ची अन्य काही कामं करण्यासाठी हातातली जपमाळ बाजूला ठेवतो; पण जात्यावर दळण दळण्यासाठी किंवा आजारी माणसाची सेवा करण्यासाठी तो जपमाळ सोडू शकत नाही.
 गीता सांगते की, कर्म केल्याशिवाय कुणालाही आपलं ध्येय साध्य करता येत नाही. जनकासारख्या माणसालाही कर्मातूनच मुक्ती मिळाली. मी आळशीपणाने काम करणं सोडलं तर काही लगेच जग बुडणार नाही. मग लोकांनी कर्म करण्याची काय गरज आहे?  
 एक गोष्ट खरी आहे की, कुठलीही कृती माणसाला बांधून ठेवते. त्याच वेळी हेही खरं आहे की, प्रत्येक जिवंत माणसाला काही ना काही कर्म करावंच लागतं. इथे बौद्धिक किंवा शारीरिक अशी कुठलीही कृती 'कर्म' या अर्थानेच घेतली पाहिजे. मग कोणताही माणूस कर्मापासून मुक्त कसा होऊ शकेल? तो जरी नाटक करत असला तरी तो कर्मापासून मुक्त होऊ शकत नाही. पण गीतेने ज्या पद्धतीने हा प्रश्न सोडवला आहे ती माझ्या दृष्टीने तर अद्वितीयच म्हटली पाहिजे. गीता सांगते की, प्राप्त असलेलं कर्म तुम्ही जरूर करा; पण फक्त त्याच्या फळाची आशा धरू नका. तुम्ही कामापासून स्वत:ला वेगळं करा आणि मग कर्म करा. कसलीही आशा न ठेवता कर्म करा.
गीतेची ही सर्वांत अमूल्य अशी शिकवण आहे. जो कर्म सोडून देतो तो पराभूत होतो; पण जो कर्म करतो, पण फळाची आशा सोडून देतो तो नक्कीच विजयी होतो. पण फळाची आशा सोडणं म्हणजे कर्माच्या परिणामाविषयी तुम्ही निर्विकार राहणं असा अर्थ होत नाही. प्रत्येक कर्माच्या वा कृतीच्या परिणामाची पूर्ण जाणीव ते कर्म करणाराला असली पाहिजे. त्या कर्माच्या साधनांची आणि त्यांच्या क्षमतेचीही माहिती त्याला असली पाहिजे. अशी साधनांची, क्षमतेची व परिणामांची सर्वांगीण जाणीव असणारी व्यक्ती जेव्हा पूर्ण क्षमतेने कर्म करते आणि तरीही फळाची आशा धरत नाही तेव्हा त्याला कर्मफलत्याग म्हणतात. याचा अर्थ कर्म करणाºयाला फळ नकोच आहे असा कोणी करू नये. गीतेला हा अर्थ मुळीच अभिप्रेत नाही. कर्मफलत्याग म्हणजे फळाच्यामागे जिवाच्या आकांताने धावणं सोडून देणे होय. जो फळाची आशा धरत नाही त्याला ते हजारपटीने मिळत असतं, ही गोष्ट खरी आहे. गीतेला अभिप्रेत असलेला कर्मफलत्याग ही एका अर्थाने श्रद्धेचीच कसोटी आहे. जो फळाच्या विचारात गुंततो तो नेहमीच कर्तव्य करण्यात कमी पडतो. तो फळाच्या आशेने विचलित होतो; त्याच्या कर्तव्यात कसूर राहते आणि मग तो स्वत:वरच चिडतो. क्रोधामुळे त्याच्या हातून नको ती कृती घडते. तो एका कृतीतून दुसरी कृती करायला लागतो; पण एकही कृती किंवा कर्म तो निष्ठेने करत नाही. जो फळाच्या मागे लागतो त्याची दमछाक होते; त्याची क्षमता संपते. आपण करतो ती प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे असं त्याला वाटायला लागतं आणि साधनांच्या योग्यायोग्यतेचंही त्याला भान राहत नाही.  फळाची आशा धरल्यामुळे होणाºया परिणामांचे कटू अनुभव आल्यामुळे गीतेच्या निर्मात्याने फलत्यागाचा उपाय सुचवला आणि सर्वांना समजेल अशा पद्धतीने तो जगापुढे मांडला. सर्वसाधारण समज असा आहे की, धर्माचा भौतिक गोष्टींना नेहमीच विरोध असतो. व्यापार किंवा अन्य व्यावसायिक बाबीत कुणीच धर्माचं पालन करू शकत नाही, असंच सर्वांना वाटत असतं. व्यवहारात धर्माला काहीच स्थान नाही, धर्म हा फक्त मुक्तीसाठी आहे अशीच अनेकांची समजूत असते. अनेक विद्वानांचंही असंच मत आहे. माझ्या मते गीतेच्या निर्मात्यांनी हा समज पूर्णपणे खोटा ठरवला आहे. मुक्ती आणि भौतिक गरजा यांमध्ये त्याने कुठलीही रेघ मारलेली नाही. उलट भौतिक गरजांवरही धर्माचीच सत्ता चालली पाहिजे किंवा त्यांचं नियमनही धर्माच्याच आधाराने झालं पाहिजे असं गीतेने म्हटलं आहे. माझ्या मते गीता आपल्याला हेच शिकवते की, दैनंदिन जीवनात आपल्याला जे आचरणात आणता येणार नाही त्याला धर्म म्हणताच येणार नाही. त्यामुळे गीतेच्या म्हणण्यानुसार सहजपणे आचरणात आणता येणार नाहीत अशा गोष्टी निषिद्धच मानायला हव्यात. या तत्त्वाने मानवजातीला अनेक धोक्यांपासून वाचवलं आहे. या अर्थाने खून, खोटं बोलणं, घटस्फोट किंवा तत्सम बाबी हे पापकृत्य आहे असं ठरवून ते निषिद्ध मानायला हवं. त्यातून माणसाचं आयुष्य साधं, सर्वसाधारण बनतं आणि त्यातूनच माणसाला शांतता मिळते.  या संदर्भात विचार करताना मला असं जाणवलं की, एखाद्याच्या जीवनात जर गीतेचा संदेश ठसवायचा असेल तर सत्य आणि अहिंसा यांचा अवलंब करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 
 गीता हा काही तत्त्वज्ञानाचा ग्रंथ नाही. ते एक महान धार्मिक काव्य आहे. यात तुम्ही जेवढी खोलवर उडी माराल तेवढा अधिक अर्थ तुम्हाला उमगेल. हे काव्य सर्व समाजासाठी असल्याने त्यात काहीवेळा पुनरुक्ती झाली आहे. प्रत्येक युगात गीतेच्या शब्दांना एक नवा अर्थ प्राप्त होतो. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हा अर्थ वेगळा भासतो, पण गीतेचा मध्यवर्ती संदेश कधीही बदललेला नाही. गीता शिकवणारा त्याला हवा तो अर्थ गीतेतून काढू शकतो आणि प्रत्येकाला त्याच्या जीवनात आचरणात आणता येईल असा अर्थ गीतेत सापडू शकतो. 
गीता हा काही 'हे करा' किंवा 'हे करू नका' असं सांगणारा ग्रंथ नाही. एका व्यक्तीसाठी जी गोष्ट कायदेशीर असते ती दुसऱ्या व्यक्तीसाठी बेकायदेशीर ठरू शकते. एखादी गोष्ट जर एखाद्या वेळी आणि एखाद्या ठिकाणी योग्य असेल तर ती दुसऱ्यावेळी, दुसऱ्या ठिकाणी अयोग्य ठरू शकते. फळाच्या आशेवर सगळीकडे निबंध आहेत, मात्र अनासक्ती ऐच्छिक आहे. 
 गीतेने ज्ञानाची महती गायली आहे; पण गीता ही केवळ बुद्धिचातुर्याच्या पलीकडे आहे. गीता ही हृदयाला म्हणजे मनाला किंवा भावनेला आवाहन करते आणि प्रत्येकाला समजेल अशीच ती आहे. त्यामुळे ज्यांची श्रद्धा नाही त्यांच्यासाठी गीता नाही. गीताकारांनी कृष्णाच्या मुखातून असं म्हटलंच आहे की, ‘हा अमूल्य ठेवा अशा व्यक्तींच्या हाती सोपवू नका ज्यांच्याकडे समर्पण भाव किंवा भक्ती नाही. ज्यांना हे शिकण्याची इच्छा नाही आणि ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही. उलट जो हे तत्त्वज्ञान माझ्या भक्तांपर्यंत पोहोचवेल तो त्याच्या या सेवेप्रीत्यर्थ माझा होईल आणि जे शुद्ध अंत:करणाने आणि श्रद्धेने हा संदेश ग्रहण करतील ते खºया अर्थाने मुक्त होतील.'

Web Title: Bhagwadgeeta Significant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.