असणं, दिसणं, पाहणं, वाचणं, ऐकणं वगैरे..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 11:02 AM2021-11-28T11:02:57+5:302021-11-28T11:03:23+5:30

आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर सुरुवातीच्या नवखेपणानंतर काही काळातच चित्रकलेचं विश्व किती अफाट आहे याची जाणीव होऊ लागली. तासनतास लायब्ररीमधली पुस्तकं बघत, वाचत रहायचो. देश विदेशातले अनेक चित्रकार, त्यांची चित्रं यांची ती खऱ्या अर्थाने ओळख !  

Being, seeing, seeing, reading, listening etc .. | असणं, दिसणं, पाहणं, वाचणं, ऐकणं वगैरे..

असणं, दिसणं, पाहणं, वाचणं, ऐकणं वगैरे..

Next

 - अन्वर हुसेन
(ख्यातनाम चित्रकार, anwarhusain02@gmail.com)
  आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर सुरुवातीच्या नवखेपणानंतर काही काळातच चित्रकलेचं विश्व किती अफाट आहे याची जाणीव होऊ लागली. तासनतास लायब्ररीमधली पुस्तकं बघत, वाचत रहायचो. देश विदेशातले अनेक चित्रकार, त्यांची चित्रं यांची ती खऱ्या अर्थाने ओळख !  शिवाय घरी धर्मयुग, हंस अशी हिंदी मॅगझिन्स यायची त्यातूनही समकालीन चित्रकला, चित्रकार या संबंधी काही गोष्टी समजत होत्या.  सुरुवातीच्या काळात मुख्यतः पुस्तकांच्या माध्यमातूनच चित्रं, चित्रकार त्यांचे कलेसंबंधी विचार, प्रदर्शनांबद्दलची माहिती कळत गेली. छोट्या शहरात रहात असल्यानं अडचणी होत्या. ज्यांची चित्रं प्रत्यक्ष बघण्याची खूप इच्छा असायची अशा चित्रकारांची चित्रं अप्राप्य होती. पुस्तकं,मॅगझिन्स यामधूनच ती तहान भागवायला लागायची. 
त्या काळात वाचायचोही बऱ्यापैकी; त्यात कादंबऱ्या, कथासंग्रह मराठी आणि हिंदीमधले  जास्त ! सांगलीमध्ये पुस्तकांच्या प्रदर्शनात  भरपूर पुस्तकं एकत्रितपणे बघायला मिळायची.  तासनतास तिथं रेंगाळायचो. पुस्तकं चाळता- हाताळताना  दुसरी एक गोष्ट वेधून घ्यायची ती म्हणजे त्या हजारो पुस्तकांची मुखपृष्ठं..वेगवेगळ्या शैलीतल्या,वेगवेगळ्या स्वभावाच्या चित्रकारांनी त्या त्या पुस्तकाच्या आशयानुरूप केलेली ती चित्रं म्हणजे माझ्यासाठी एक चित्रप्रदर्शनच असायचं. 
वेगवेगळ्या साहित्य प्रकारासाठी चित्रकारांनी वापरलेल्या वेगवेगळ्या शैली, तंत्र, रेषेचा स्वभाव, रंगांमधून व्यक्त केला गेलेला भाव, कादंबरीसाठी केलेलं चित्र, कथासंग्रहासाठी केलेलं चित्र, कवितासंग्रहासाठी केलेलं चित्र, ललित लिखाणासाठी केलेलं चित्र, असे अनेक पदर ती पुस्तकं पुन्हापुन्हा चाळताना, वाचून बघताना लक्षात येत गेले. 
वेगवेगळ्या चित्रकारांच्या कामाची ओळख त्यांच्या रेषांची, रंगांची, विशिष्ट शैलीची ओळख होत गेली. बाळ ठाकूर यांच्या रेषांमधली सहज लय, सुभाष अवचटांच्या फिगर्स, त्यांच्या ड्रॉईंग मधली, रंगांमधली बेफिकीर नजाकत, चंद्रमोहन कुलकर्णींचे आशयाला भिडणारे आकारांचे डिस्टॉर्शन,त्यांच्या कामाची अफाट रेंज , परसवाळेंच्या रेखाचित्रांमधले नेमके बांधीव सुंदर आकृतिबंध, अशा अनेक गोष्टींनी चित्रांबद्दलची समज बदलत गेली. या आणि अशा अनेक चित्रकारांनी मराठी साहित्याला दृश्यात्मकता दिलीय.  मुखपृष्ठ ही एक खूपच महत्त्वाची गोष्ट आहे हे, अशा लोकांच्या कामामधून कळत गेलं. 
पुस्तक निर्माण होताना त्याचं दृष्यरुपही खूपच काळजीपूर्वक डिझाईन करायची गोष्ट आहे याची जाणीव या पुस्तकांनीच दिली.  त्या प्रक्रियेत चित्रकार किती महत्त्वाचा घटक आहे लक्षात आलं. या विषयात  रस वाटू लागला.  कविता, कथेचा, कादंबरीचा आशय चित्रात व्यक्त करणं इंटरेस्टिंग वाटू लागलं. एखादं पुस्तक वाचताना मग, जागोजागी चित्रं दिसू लागली. त्यातून पुढे मला माझ्या स्वतंत्र चित्रांसाठीही काही गोष्टी सापडत गेल्या. 
अलीकडे बऱ्याच पुस्तकांसाठी मुखपृष्ठही करत असतो. कथ्य विषयाकडे अनेक बाजूंनी बघत त्याचं आकलन करून घेत त्यातला आशय चित्र भाषेत कसा आणता येईल याचा विचार करणं, त्यासाठी त्या त्या लिखाणाच्या स्वभावाला अनुसरून रेषा, रंग आणि आकारांची निवड करत मांडणी करणं ही सगळी प्रोसेस खूप शिकवणारी, समृद्ध करणारी असते. इथं  दोन वेगवेगळ्या मार्गांनी म्हणजे दृश्य माध्यम आणि शब्द माध्यमातून एका आशयाच्या दिशेनं जाता येण्याच्या शक्यतांचा शोध घडताना दिसतो. दोन माध्यमं एकमेकात विरघळून जाताना दिसतात. 
आपल्याकडे बहुतेक गोष्टी स्वतंत्रपणे तुकड्या तुकड्यात बघायची सवय असते. म्हणजे  लिखित साहित्य वेगळं, चित्रकलेचं जग पूर्ण वेगळ्या बेटावर,नृत्य- संगीताची वेगळीच दुनिया... असं एकूण वातावरण आहे. त्या त्या माध्यमात व्यक्त होणारे कलावंतही अनेकदा फटकूनच असतात दुसऱ्या कलाप्रकाराशी. खरंतर या प्रत्येक माध्यमात  दुसऱ्या माध्यमाची हाक  असतेच. चित्रात कविता महसूस करू शकतो, कवितेत चित्र, नृत्यात अनेक आकृतिबंध बघू शकतो, नृत्यातून कथा घडताना दिसते समोर. सुरांमधून निर्माण होणारे भाव ऐकताना एकामागून एक चित्रं डोळ्यांसमोर तरळून जात राहतात. अभिव्यक्त होण्याची साधनं, माध्यमं, तंत्र, ही वेगवेगळी आहेत आस्वाद घेण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत तरीही या अभिव्यक्तिंच्या माध्यमांमध्ये एक समान धागा नक्कीच आहे. तो आपण अनुभवू शकतो. 
 शब्दातून निर्माण होत जाणारे भाव, पात्रांची वर्णनं, त्यांची स्वभाव वैशिष्ट्यं लकबी, स्थळांमधली निरीक्षणं अशा गोष्टी रेखाटनांमध्ये उतरवताना रेषेचा नेमका स्वर कसा लावावा, आशयाच्या जवळ जाईल अशी नेमकी कशी शैली वापरावी..अशा अनेक प्रक्रियेतून त्या लिखाणासाठी चित्रं, रेखाटनं होत असतात. शब्द आणि चित्र या दोन गोष्टींचा मिलाफ होऊन या दोन्ही गोष्टींच्या साहचर्यानं खरंतर दोन्ही माध्यमं समृद्ध होतात.
पण, बऱ्याचदा पुस्तकांसाठी चित्रकार जे काही काम करतो त्याची साधी दखलही घेतली जात नाही.  पुस्तकांबद्दल परीक्षण, समीक्षा लिहिणारे लोकही पुस्तकाच्या  दृष्य रुपाला पूर्ण दुर्लक्षित करून जातात. आपल्याकडे चित्रकला हा दुर्लक्षित राहिलेला विषय असल्याचा हा परिणाम आहे. अगदी अलीकडे सोशल मीडियाच्या प्रभावकाळात मात्र काही साहित्यिक, पुस्तकांबद्दल नियमितपणे पोस्ट लिहिणारे वाचक पुस्तकांच्या मुखपृष्ठाबद्दल किंवा रेखाटनांबद्दल आवर्जून लिहिताना दिसतात. तरुण पिढीतल्या लेखकांच्या दृष्यकलेविषयीच्या जाणिवाही बऱ्यापैकी समृद्ध असलेल्या जाणवतात. काही प्रकाशकही पुस्तकाच्या दृष्यरूपावर जाणीवपूर्वक विचार करतात, त्यासाठी मेहनत घेताना दिसतात. एकूण सोशल मीडियाच्या प्रभावामुळे दृष्यकला मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांपर्यंत पोहोचते आहे. मग, ती पुस्तकांची मुखपृष्ठं असोत किंवा स्वतंत्र चित्रं. पूर्वी जी चित्रं गॅलरीत जाऊनच बघता यायची, ती आता सहजासहजी  समोर स्क्रीनवर येत राहतात. अर्थातच प्रत्यक्ष चित्र बघणं ही गोष्टच वेगळी अनुभूती देणारी असते. पण, एकंदरीत चित्रकला जी अजूनही समाजात मोठ्या प्रमाणात  दुर्लक्षित आहे या माध्यमातून काही अंशी लोकांपर्यंत पोहोचत आहे. यातून हळूहळू लोकांची दृष्टी सुधारेल अशी आशा करू.

Web Title: Being, seeing, seeing, reading, listening etc ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :marathiमराठी