अभिजात

By Admin | Updated: February 21, 2015 14:27 IST2015-02-21T14:27:30+5:302015-02-21T14:27:30+5:30

जागतिक मराठी दिनाच्या आगेमागे मराठीच्या दुरवस्थेचे तपशील सांगण्या-ऐकण्या, लिहिण्या-वाचण्याच्या वार्षिक आन्हिकाला यावर्षी एका आनंदवार्तेचा योग आहे.

Aristocrat | अभिजात

अभिजात

>जागतिक मराठी दिनाच्या आगेमागे मराठीच्या दुरवस्थेचे तपशील सांगण्या-ऐकण्या, लिहिण्या-वाचण्याच्या वार्षिक आन्हिकाला यावर्षी एका आनंदवार्तेचा योग आहे. 
- मराठीला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळण्याची बहुप्रतिक्षित बातमी! हे शिक्कामोर्तब व्हावे म्हणून झालेले प्रयत्न, त्यामुळे (निदान) शासकीय पातळीवर मराठीसाठी खुल्या होणार्‍या शक्यता यांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न! - आणि सोबतच आनंदातल्या आत्मपरीक्षणाची एक परखड दिशाही!!
 
प्रयत्नांची पार्श्‍वभूमी
पराग पोतदार 
अमृतातेही पैजा जिंकणारी अशी मराठी भाषा आता अभिजात दर्जा मिळण्याच्या उंबरठय़ावर आहे. तामीळ, संस्कृत, तेलगु, कन्नड आणि मल्याळम या भाषांनी हा दर्जा मिळवला. नुकतीच उडीया भाषेनेही ही मान्यता मिळवली. त्या पार्श्‍वभूमीवर मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळणार असल्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. 
जवळपास ११ कोटी लोक जी भाषा बोलतात त्या भाषेची वैशिष्ट्ये आणि तिची प्राचीनता सिद्ध करण्याचे मोठे आव्हान होते; मात्र अभ्यासक, संशोधकांनी नेटाने हे काम करून त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर केला आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे किती आणि कसे आवश्यक आहे हे पटवून दिले.  
कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही तशी सोपी प्रक्रिया नसते. संशोधनाबरोबरच सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रयत्न यांचीही जोड द्यावी लागते. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने अभिजात मराठी भाषा समिती नेमली होती. त्यामध्ये प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. मधुकर वाकोडे, प्रा. आनंद उबाळे, प्रा. मैत्रेयी देशपांडे, प्रा. कल्याण काळे, सतीश काळसेकर आदि मान्यवरांचा सहभाग होता. या समितीने जुलै २0१३ मध्ये १२७ पानांचा अहवाल तयार केला. त्या अहवालाच्या आधारे केलेला प्रस्ताव  राज्य  सरकारतर्फे भारत सरकारकडे रीतसर सादर करण्यात आला व आता अभिजात दर्जा मिळण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.  
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या भारतीय भाषा अध्ययन विभागातर्फे अभिजात मराठी भाषा अभ्यास केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या अभिजात मराठी भाषा समितीच्या वतीने करण्यात आलेल्या मराठीच्या अभिजातताविषयक संशोधनात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा प्रमुख सहभाग होता. आता भांडारकर संस्थेमध्ये मराठी भाषाविषयक संशोधन प्रकल्प हाती घेण्याचे ठरले आहे. 
 
(लेखक ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीत वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
 
जुन्याला उजाळा, नव्याचे संवर्धन!
रंगनाथ पठारे 
मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर काय होईल या प्रश्नाचे सर्वात महत्त्वाचे उत्तर म्हणजे मराठी भाषकांचा आत्मविश्‍वास दुणावेल. 
कारण सद्यस्थितीत भाषा टाळण्यात आपला पहिला क्रमांक आहे. समोरच्याने वेगळ्या भाषेत 
सुरुवात केली की आपण मराठी 
क्षणात विसरतो आणि त्याच्या भाषेत बोलायला सुरुवात करतो. 
परंतु आपल्या भाषेविषयी कुठेतरी खरेखुरे प्रेम, अभिमान आवश्यक आहे. भौतिक स्वरूपाचा असा दर्जा मिळाला तर तो अभिमान निर्माण होऊ शकेल. 
 आपल्याकडे अनेक बोलीभाषा आहेत. त्यात मराठीतही अनेक आहेत. त्यांचा दीर्घ इतिहास असून, त्यांचे संवर्धन व जतन करण्याच्या दिशेने प्रयत्न करता येऊ शकतील. 
 केतकरांच्या ज्ञानकोशासारखे मराठी साहित्यातले अनेक समृद्ध प्रकल्प आज उपलब्ध नाहीत. अशासारखे ग्रंथ पुन्हा छापून सर्व शासनमान्य ग्रंथालयांना उपलब्ध करून देता येऊ शकतील. 
 धर्मानंद कोसंबी यांच्यासारख्या प्राच्यविद्याविशारदांनी मोठे संशोधन, लेखन केले आहे. त्यांचे लेखन प्रामुख्याने इंग्रजीत आहे. अशा स्वरूपाच्या साहित्याच्या अनुवादाला चालना देता येऊ शकेल. 
 इंग्रजी शिकण्याला विरोध कुणाचाच नाही; परंतु इंग्रजी भाषा शिकणे आणि इंग्रजीतून सारे काही शिकणे यात मोठा फरक आहे आणि ती मोठी चूकही आहे. त्यामुळे त्यासाठी चांगले काम करून चांगली  पाठय़पुस्तके मराठीतून आणता येतील. 
 यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ स्थापन करण्यात आले होते. त्याचे उद्देश व कल्पना चांगली होती; परंतु आता ते कागदावरच राहिलेले आहे. त्याचे पुनरुज्जीवन करता येऊ शकेल. 
 अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठीच्या प्राचीन सौंदर्याला उजाळा आणि आधुनिक स्वरूपात संवर्धन अशा दुहेरी स्वरूपामध्ये काम करता येईल.
 
(लेखक अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)
 
अभिजात भाषा कोणती?
(भारतीय भाषांना ‘अभिजात’तेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने निश्‍चित केलेले चार निकष)
 भाषा दीड ते दोन हजार वर्षे जुनी असावी. 
 ती भाषा बोलणार्‍या लोकांनी मौल्यवान वारसा म्हणून जपलेले प्राचीन साहित्य असावे. 
 भाषेची परंपरा तिची स्वत:ची असावी. 
 भाषेचे आधुनिक रूप हे तिच्या प्राचीन रूपांहून भिन्न असले तरी चालेल; पण त्यांच्यात आंतरिक नाते असावे. 
 
मराठीच्या ‘अभिजात’तेचे पुरावे 
 जुन्नरजवळील नाणेघाटातील शिलालेख, ज्यावर ब्राrी लिपीत महारथी असा उल्लेख आढळतो.
 २५00 वर्षांपूर्वीच्या विनयपिटक या बौद्ध धर्मग्रंथात असलेला महाराष्ट्राचा उल्लेख.
श्रीलंकेतील सिंहली लिपीतील दीपवंश आणि महावंश या १५00 वर्षांपूर्वीच्या ग्रंथात महाराष्ट्री भाषेचा असलेला उल्लेख.
 
वररुची या पाणिनीच्या समकालीन विद्वानाने प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्याने शोरशनी, पैशाची, अर्धमागधी, महाराष्ट्री या प्राकृत भाषांचे व्याकरण लिहिले आहे. त्यात महत्त्वाचे म्हणजे, त्याने शेषमहाराष्ट्रीवत हा ठळक नियम केला आहे. त्यानुसार सर्व प्राकृत भाषांचे उरलेले नियम मराठीप्रमाणे होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत असलेली ८0 हस्तलिखिते ही प्राचीन आहेत आणि या पुराव्यांना बळकटी देणारी आहेत. संपूर्ण भारतात सुमारे हजारावर लेणी आहेत. त्यातील ८00 एकट्या महाराष्ट्रात आहेत. या लेण्यांतील सर्व शिलालेख जुन्या मराठीत आहेत. गाथासप्तशती हा मराठातील आद्यग्रंथ आहे. तो हाल सातवाहनाच्या काळातील आहे. 
 
जगभरातील 
भाषिक स्थिती 
 जगात आज छोट्यामोठय़ा सुमारे २0 हजार भाषा आहेत.
 बोलीभाषांची संख्या सुमारे दोन हजार आहे
 त्यातील ३0 टक्के भाषा एकट्या भारतात आहेत.
 मराठी ही जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा आहे.
 

Web Title: Aristocrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.