हिंदी गाण्यांनी दूर ढकललेला आम आदमी

By Admin | Updated: February 21, 2015 13:59 IST2015-02-21T13:59:19+5:302015-02-21T13:59:19+5:30

‘आमचा चित्रपट सामान्यांसाठीच’ असा दावा प्रत्येकाचा असला, तरी ‘सामान्यत्वाचा आविष्कार’ हा विषय हिंदी गाण्यांच्या केंद्रस्थानी कधीच नव्हता. जागतिकीकरणानंतरच्या चकचकीत बॉलिवूड काळात तर तो परिघावर तरी आहे का याची शंका यावी, अशी स्थिती आहे.

Aam Aadmi who was pushed away by the Hindi songs | हिंदी गाण्यांनी दूर ढकललेला आम आदमी

हिंदी गाण्यांनी दूर ढकललेला आम आदमी

विश्राम ढोले

 
‘आमचा चित्रपट सामान्यांसाठीच’ असा दावा प्रत्येकाचा असला, तरी ‘सामान्यत्वाचा आविष्कार’ हा विषय हिंदी गाण्यांच्या केंद्रस्थानी कधीच नव्हता. पन्नाशीच्या दशकानंतर तर तो अजून दूर ढकलला गेला. जागतिकीकरणानंतरच्या चकचकीत बॉलिवूड काळात तर तो परिघावर तरी आहे का याची शंका यावी, अशी स्थिती आहे.
-------
 
दिल्लीत ‘आप’च्या अभूतपूर्व विजयानंतर ‘आम आदमी’ आता प्रतीकात्मक रूपात का होईना पण सत्तेच्या केंद्रस्थानी आलाय. सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा खरेतर सगळेच पक्ष करीत असतात; पण हे पक्ष आधी त्या ‘सामान्या’वर भारतीय, इंडियन, राष्ट्रवादी, बहुजन, सैनिक, नवनिर्माता, द्रविड, तेलुगू वगैरे असण्याची जबाबदारी टाकत असतात. व्यक्तीला फक्त सामान्य माणूस म्हणून केंद्रस्थानी ठेवणे वा त्यानुसार व्यक्तीला अभिव्यक्त होऊ देणे कदाचित या पक्षांना फार पटत नसावे. हिंदी चित्नपटगीतांच्या बाबतीतही असेच काहीसे म्हणता येऊ शकते. खरेतर सामान्य प्रेक्षकांसाठीच आम्ही चित्नपट बनवित असतो असा दावा मुख्य प्रवाहातील बहुतेक जण करीत असतात, पण त्या चित्नपटातील नायक-नायिका अगदी सामान्य व्यक्ती असते का, सामान्य असणे हीच आपली खरी ओळख ती चित्नपटभर मिरविते काय, गाण्यातून सांगते काय, हे प्रश्न म्हणूनच महत्त्वाचे ठरतात. 
हे नक्की खरे आहे की, हिंदीतल्या अनेक चित्नपटांमध्ये नायक-नायिका सामान्य घरातील, गरीब परिस्थितीतील दाखवले जातात. त्यांच्या संघर्षांचे कारणही अनेकदा त्यांचे हे सामान्यत्वच असते. पण गाण्यांमधून ते बहुतेकवेळा व्यक्त होतात ते प्रियकर-प्रेयसी, बहीण-भाऊ, नवरा-बायको, मुलगा-मुलगी, मित्न, देशभक्त, कलाकार वगैरे भूमिकांमधून. एखादा छोटा-मोठा कामधंदा करून जगणारी, सामाजिक व्यवस्था, प्रतिष्ठा आणि लाभाच्या परिघावर असणारी सामान्य व्यक्ती हीच आपली ओळख आहे असे स्पष्टपणे सांगणारी गाणी खूप कमी. खरेतर जनसंस्कृती किंवा पॉप्युलर कल्चरचा भाग असलेल्या संगीतामधून सामान्य व्यक्तीचे म्हणणे ऐकू यावे, तिच्या व्यथा-वेदना त्यातून उमटाव्या ही सर्वसाधारण अपेक्षा असते. समाज आणि संस्कृतीच्या परिघावर असलेली, उपेक्षा किंवा सामान्यत्व वाट्याला आलेली व्यक्ती पॉप्युलर म्युझिकच्या माध्यमातून स्वत:ची अस्मिता जोपासते किंवा उपेक्षिणार्‍या समाजाची झाडाझडती घेते असे मानले जाते. जगभरातल्या जनप्रिय संगीतामध्ये त्याची बरीच उदाहरणे सापडतात. पण जागतिक पातळीवर जनप्रिय संगीताची इतकी मोठी खाण असूनही हिंदी गाण्यांमध्ये आपल्या सामाजिक सामान्यपणाबद्दल स्पष्ट तक्रार करणारी किंवा अभिमान बाळगणारी गाणी खूप कमी. 
‘आवारा हुँ, या गर्दीशमें हुँ आसमान का तारा हुँ’ (आवारा- १९५१) हा या मोजक्या गाण्यांमधला मेरुमणी. तेव्हाही हे गाणे जगभरात लोकप्रिय होते आणि आजही ते स्थान कायम आहे. खरेतर, हे गाणे सामान्य असण्यापेक्षा ‘आवारा’ असण्याचे जास्त आहे. पण हे आवारापण, हे भरकटलेपण, हे स्वैर आणि उपेक्षित एकाकीपण समाजाच्या व्यवस्थेने मिसफिट ठरविल्यामुळे आलेले आहे. ‘दुनिया मैं तेरे तीर का या तकदीर का मारा हूँ’ या परिस्थितीमुळे आलेले आहे.  
कधीकधी सामान्यत्वासोबत येणार्‍या उपेक्षेमुळे किंवा मिसफिट असल्याच्या आरोपामुळे व्यक्तीवर आवारापणही थोपवले जाते. म्हणून वरकरणी सामान्यपणाचा उल्लेख नसला तरी ‘आवारा हुँ.’, सामान्यपणाची व्यथा बाळगणार्‍या कोणाच्याही मनाला स्पर्श करते. ते त्यांचेही गाणे होऊन जाते.  - पण इथेही ‘तकदीर का मारा’ असल्यामुळे, नशिबामुळे आपल्यावर हे सामान्यत्व ओढवले असेल अशी एक खास पारंपरिक भारतीय समजूत काढलेलीच आहे.  
स्वत:चे सामान्यत्व अधिक थेटपणे सांगणारी, आपली उपेक्षा आणि असहायता अधिक स्पष्टपणे मांडणारी इतरही काही गाणी आहेत. त्यात अगदी भिकार्‍याच्या तोंडी असलेली गाणी (तुम गरिबोंकी सुनो : चित्नपट- दस लाख) जशी आहेत तशीच शहराने ओवाळून टाकलेल्या उपेक्षित तरु ण मुलांचीही (सो गई है सारी मंजिले : चित्नपट- तेजाब) गाणी आहेत. 
हमे भी देना सहारा के बेसहारे है (सीमा) अशी दैवाकडे किंवा समाजाकडे काकुळतीला येऊन केलेली याचना असणारी गाणीही येतात ती या असहाय्य सामान्यत्वापोटीच. 
पण अशी कोणतीही याचना न करता, स्वत:बद्दल लीनत्व न बाळगता आपल्या सामान्यत्वाचा सहज स्वीकार करणारी, प्रसंगी त्याविषयी अभिमान बाळगणारीही काही चांगली गाणी आहेत. ही बहुतेक गाणी सामान्य मानले गेलेल्या व्यावसायिकांची आहेत. प्यासामधील ‘सर जो तेरा चकराए ’ हे चंपी करणार्‍याचे गाणे त्यातील ऑल टाइम हिट. गुरुदत्तच्या लाडक्या जॉनी वॉकरने पडद्यावर हे गाणे तितकेच झकास साकारले आहे. आपल्या चंपीचे गुण सांगतानाच, आपल्यासमोर सैनिकच कशाला राजाही मान तुकवितो असा खास व्यवसायनिष्ठ अभिमानही हा सामान्य मालिशवाला व्यक्त करतो. 
‘बुटपॉलिश’मधल्या (१९५४) लहानग्यांचीही कथा तीच. गरिबी, बालपण आणि उपेक्षा वाट्याला आली असली, तरी बुटपॉलिशच्या सामान्य व्यवसायातून आपले ‘मतवाले’पण ही मुले व्यक्त करीत राहतात. आम्हाला आमच्या मेहनतीची रोटी खायची आहे, पण भीक म्हणून मिळणार असेल तर मिठाईही नको आहे, असे मोठय़ा अभिमानाने सांगतानाच ही पॉलिशवाली मुले ‘पंडितजीको पाच चवन्नी हमको तो एक इकन्नी. भेदभाव ये समझ न आए ’ असा थेट प्रश्न विचारायलाही कचरत नाहीत.  
‘मै रिक्षावाला है चार के बराबर ये दो टांगोवाला (छोटी बहेन- १९५९), आइस्क्रीमवाल्याच्या तोंडी येणारे ‘जिंदगी है क्या सुन मेरी जान’ (माया- १९६१) ही सामान्य असली तरी आपल्या व्यवसायाचा छानसा अभिमान बाळगणारी आणखी काही गाणी. 
पण साठीच्या मध्यापासून अशा गाण्यांची संख्या आणि लोकप्रियता कमी होत गेली. नाही म्हणायला ‘डाकिया डाक लाया’ (पलकों की छाँवमे- १९७७), ‘सारी दुनिया का बोझ हम उठाते है’ (कुली- १९८३) आणि ‘हम मेहनतकश इस दुनियामें’ (मझदुर- १९८३) अशांसारखी काही गाणी येत राहिली, पण अजूनच अल्प प्रमाणात. सांगीतिक आणि भाषिक सौंदर्याच्या पातळीवर किंवा लोकप्रियतेच्या निकषांवरही ही गाणी आधीच्या गाण्यांइतकी सरस ठरली नाहीत. असे असले तरी सामान्यांचे, त्यांच्या व्यवसायसिद्ध अभिमानाचे, त्यांच्या स्वत्वाचे, समाजाविषयीच्या त्यांच्या गार्‍हाण्यांचे थोडेफार का होईना चित्नण करीत राहिली. 
- एरवीही सामान्य व्यक्ती असल्याचा आविष्कार करणे हा विषय हिंदी गाण्यांच्या केंद्रस्थानी कधीच नव्हता. पन्नाशीच्या दशकानंतर तो अजून दूर ढकलला गेला. आणि जागतिकीकरणानंतरच्या चकचकीत बॉलिवूडच्या काळातील गाण्यांमध्ये तर तो परिघावर तरी आहे का याची शंका यावी, अशी स्थिती आहे. 
- ‘आम आदमी’ असल्याचा अभिमान अगदी नावापासून बाळगणारा पक्ष सत्तेत येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हिंदी चित्नपटगीतांच्या राज्यात आम आदमी परिघाबाहेर फेकला जात असल्याचे वास्तव अधिक बोचणारे आहे.
 
‘आवारा हुँ.’
‘तकदीर का मारा’ असल्यामुळे, नशिबामुळे आपल्यावर  सामान्यत्व ओढवले असेल अशी एक खास पारंपरिक भारतीय समजूत काढणारे लोकप्रिय गाणे.
 
‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है.’
व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या सामान्यपणाबद्दल, सामान्यांच्या वतीने व्यवस्थेवर अधिक थेट, 
आक्र मक आणि बोचरी टीका.
 
सारी दुनिया का बोझ हम उठाते है 
सामान्यांचे, त्यांच्या व्यवसायसिद्ध अभिमानाचे, त्यांच्या स्वत्वाचे, समाजाविषयीच्या त्यांच्या गार्‍हाण्यांचे 
थोडे फार का होईना चित्रण!
 
सो गई है सारी मंजिले
शहराने ओवाळून टाकलेल्या उपेक्षित तरुण मुलांची गाण्यातली दुर्मीळ दास्तान!
 
(लेखक माध्यम, तंत्नज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)
 

Web Title: Aam Aadmi who was pushed away by the Hindi songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.