"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:27 IST2025-05-03T15:25:58+5:302025-05-03T15:27:23+5:30
Sushma Andhare Anjali Damania News: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांच्याच नव्याच मुद्द्यावरून वाक् युद्ध सुरू झाले. अंजली दमानियांनी एका ग्रुपवर टाकलेल्या मेसेजवरून हा वाद सुरू झाला.

"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
Maharashtra Politics News: 'सुषमा अंधारेअजित पवार गटात प्रवेश करणार?', असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया एका ग्रुपवर म्हणाल्या. त्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे भडकल्या. 'ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे का', असे म्हणत सुषमा अंधारेंनी गंभीर आरोप केला. अंधारेंनी तो स्क्रीनशॉटही पोस्ट केला. त्यावर अंजली दमानियानी उत्तर देत अंधारेंना चिमटा काढत उलट सवाल केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अंजली दमानिया यांच्या सुषमा अंधारे अजित पवार गटात जाणार? या प्रश्नार्थक विधानावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले. त्यामुळे सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांना सुनावले.
सुषमा अंधारे अंजली दमानियांना काय म्हणाल्या?
"अहो दमानिया, जरा दमानं घ्या की... किती तो प्रसिद्धीझोतात राहण्याचा सोस.. कधीतरी पूर्ण, महत्त्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला", अशा शब्दात सुषमा अंधारेंनी अंजली दमानियांवर निशाणा साधला.
वाचा >>लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
"ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा? तुम्ही माझ्या PR म्हणून काम करत आहात की, ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे", असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी दमानियांवर केला.
अहो दमानिया, जरा दमानं घ्या की..
— SushmaTai Andhare (@andharesushama) May 2, 2025
किती तो प्रसिद्धीझोतात राहण्याचा सोस.. कधीतरी पूर्ण, महत्त्वाचं म्हणजे अधिकृत माहिती घेत चला..
ब्रॉडकास्टिंगवर टाकलेल्या मेसेजचा अर्थ काय घ्यायचा?
तुम्ही माझ्या PR म्हणून काम करत आहात
की,
ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतली आहे. pic.twitter.com/gx8Jqf3EpU
सुषमा अंधारेंना अंजली दमानियांचे उत्तर?
सुषमा अंधारेंनी ओबीसी नेते आणि चळवळींना टार्गेट करण्याचा गंभीर आरोप केल्यानंतर अंजली दमानियांनीही उत्तर दिले.
दमानिया म्हणाल्या, "केवळ आडनावाने तुम्ही मला संबोधता? छान… असो... मला तर ते पण करता येणार नाही. कारण केवळ अंधार आहे", असा टोला त्यांनी सुषमा अंधारेंना लगावला.
"खरंतर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही, पण तुम्ही जे शब्द वापरले, त्यावर वाईट वाटले. मला खात्रीशीर माहिती अगदी, फेब्रुवारी महिन्यात मिळाली होती की, तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटल्या होतात आणि त्यांच्या पक्षात जाणार होतात. हे खरे आहे की नाही ह्यावर खरं उत्तर द्याल का?", असा उलट सवाल दमानियांनी सुषमा अंधारेंना केला.
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, "बातमी करायची असती, तर तेव्हाच केली असती. पण तुम्ही कुठेही गेलात तरी मला काय फरक पडतो, म्हणून बोलले नाही. तुम्ही कुठल्याही पक्षात जाणार असाल तर नक्कीच जा, तो तुमचा वैयक्तिक निर्णय आहे, तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा."
प्रसिद्धी झोतात राहण्यावरून दमानियांनीही सुनावले
अंजली दमानिया म्हणाल्या, "आणि हो प्रकाश झोतात यायची मला गरज नाही. प्रकाशझोतात ज्यांना यायचं असत ते वाट्टेल ते करतात… त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाट्टेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात, हे मला ह्या जन्मी जमणार नाही", असा चिमटा दमानियांनी अंधारेंना काढला.
"तुमच्या माहितीसाठी, काल एका चॅनलने बातमी ट्वीट केली की ठाकरे गटातील कोणीतरी अजित पवार गटात जाणार, ह्यावर मी फक्त माझ्या वैयक्तिक media broadcast च्या व्हॉट्सअप ग्रुप वर लिहिलेला हा एक प्रश्न होता. तो तुम्हाला कोणीतरी पाठवला", असे उत्तर दमानियांनी सुषमा अंधारेंना दिले.