यंदा होणार ‘दमदार’ पाऊस
By Admin | Updated: March 22, 2015 23:47 IST2015-03-22T23:47:37+5:302015-03-22T23:47:37+5:30
रबी पिकाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने दिलेल्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या वर्षीचा मान्सून दिलासादायक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदा होणार ‘दमदार’ पाऊस
नवी दिल्ली : मान्सून २०१४ चे विलंबाने झालेले आगमन, त्यातच दुबार पेरणीचा आणि अखेरच्या टप्प्यात रबी पिकाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने दिलेल्या तडाख्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला या वर्षीचा मान्सून दिलासादायक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सून २०१५ सामान्य म्हणजे १०२ टक्के तसेच देशभरात तो समप्रमाणात राहण्याची शक्यता असली तरी काही भागात पावसाचे प्रमाण किंचित कमी राहू शकते, असे असोचेम उद्योग मंडळ आणि हवामानाचा अंदाज वर्तवणारी संस्था ‘स्कायवेट वेदर’ने संयुक्तरीत्या जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.
अलीकडेच अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बहुतांश राज्यांना फटका दिला. उभे पीक नष्ट झाले. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही असेच वातावरण राहण्याची आणि पुन्हा एकदा पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात कृषीचा वाटा १५ टक्के असून ५० टक्के लोकांना शेतीतून रोजगार मिळतो. कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त असल्याने ६० टक्के क्षेत्र पावसावर निर्भर असते. ‘मान्सून २०१५ : कृषी व्यवसाय जोखीम की संधी’ अशा आशयाच्या शीर्षकाखाली अभ्यास सादर करण्यात आला.
अल-निनोचा प्रभाव नाही
दरवर्षी पावसावर अल-निनो घटकाचा नकारात्मक प्रभाव दिसून येतो. पावसाचे प्रमाण कमी होऊन दुष्काळाचा फटका बसतो. या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात वातावरणावर अल-निनोचा प्रभाव दिसणार नसल्याने देशभरात सामान्य पाऊस राहण्याची शक्यता आहे, असे रावत यांनी अहवाल जारी करताना म्हटले. २०१४ मध्ये हवामानदृष्ट्या सौम्य दुष्काळाची स्थिती होती. पुन्हा तशीच स्थिती निर्माण होण्याची शक्यता अवघी ३ टक्के आहे. भारतीय उपसागरात द्विध्रुवाची (आयओडी) उत्पत्ती होण्याचे संकेत नसल्यानेही पाऊस चांगला होईल, असे स्कायमेटचे सीईओ जतीन सिंग यांनी म्हटले. अहवालानुसार प्रमाण उणे किंवा अधिक चारने चुकू शकते.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
देशभरात पावसाचे प्रमाण जवळपास सारखेच राहणार असले तरी महाराष्ट्रातील मराठवाड्यासह तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड तसेच रायलसीमा, दक्षिण कर्नाटक, ईशान्येकडील काही भागांतही पावसाचे प्रमाण तुलनेत कमी असेल, असे असोचेमचे सरचिटणीस डी.एस. रावत यांनी नमूद केले.
असा बरसेल मान्सून...
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात पावसाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता ६ टक्के आहे. तसे झाल्यास पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) तुलनेत जास्त म्हणजे ११० टक्क्यांच्या वर राहू शकतो.
हंगामी पावसाचे प्रमाण एलपीएच्या १०५ ते ११० टक्के म्हणजे सामान्यापेक्षा जास्त राहण्याची शक्यता ३६ टक्के आहे. एलपीएच्या ९६ ते १०४ टक्के म्हणजे सर्वसाधारण राहण्याची शक्यता ५२ टक्के आहे. एलपीएच्या ९० ते ९५ टक्के म्हणजे सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता ४ टक्के, तर एलपीएच्या तुलनेत ९० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे दुष्काळाची स्थिती राहण्याची शक्यता अवघे २ टक्के असेल.