लेखी आश्वासनावर मोर्चेकरी ठाम, आज विधानभवनावर धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 05:44 IST2018-03-12T05:41:10+5:302018-03-12T05:44:49+5:30
किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकºयांचा ‘लाँग मार्च’ मुंबईत दाखल झाला असून, ‘लाल बावटा’ हाती घेतलेले हे वादळ सोमवारी विधानभवनावर धडकणार आहे.

लेखी आश्वासनावर मोर्चेकरी ठाम, आज विधानभवनावर धडकणार
मुंबई - किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिकहून निघालेला शेतकºयांचा ‘लाँग मार्च’ मुंबईत दाखल झाला असून, ‘लाल बावटा’ हाती घेतलेले हे वादळ सोमवारी विधानभवनावर धडकणार आहे.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मोर्चेकºयांना सामोरे जात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. मात्र, सरकारच्या लेखी आश्वासनावर मोर्चेकरी ठाम असून, मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. या मोर्चात ३० हजारांहून अधिक शेतकरी सहभागी झाले असून, हे लाल वादळ रविवारी मुंबईत दाखल झाले आहे. सायन-चेंबूर मार्गावरील सोमय्या मैदानावर रात्री मुक्काम करून मोर्चेकरी सकाळी विधानभवनाकडे कूच करणार आहेत. मोर्चेकरी विधानभवनावर धडकू नयेत, यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला.
भाजपा वगळता सर्वांचा पाठिंबा
मोर्चाला भाजपा वगळता सर्वच पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. शनिवारी रात्री हा मोर्चा ठाण्यात आल्यावर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे मोर्चाला सामोरे गेले, तर सेनेचे युवानेते आदित्य ठाकरे विक्रोळी येथे मोर्चात सहभागी झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोर्चाला जाहीर पाठिंबा दिला आहे. शेकापचे जयंत पाटील मोर्चात सहभागी आहेत.
मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडावा - चव्हाण
मुख्यमंत्र्यांनी हट्टीपणा सोडून शेतकºयांशी चर्चा करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. या मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून, आम्ही शेतकºयांच्या सोबत आहोत, असे चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री अधिकाºयांची बैठक घेतली. आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, असे स्पष्ट करण्यात आले. आंदोलकांशी चर्चा करण्यास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची समिती गठीत केली आहे.