Women's Day Special : नववी पास उद्योजिकेच्या कारखान्याने दिला शेतकऱ्यांना आधार
By बापू सोळुंके | Updated: March 8, 2023 11:35 IST2023-03-08T11:33:57+5:302023-03-08T11:35:13+5:30
सुरुवातीला १५ बँकांनी नाकारले होते कर्ज:, कारखान्याची सुमारे दीड कोटीची उलाढाल; बाराजणांना प्रत्यक्ष दिला रोजगार

Women's Day Special : नववी पास उद्योजिकेच्या कारखान्याने दिला शेतकऱ्यांना आधार
छत्रपती संभाजीनगर : नववीपर्यंत शिक्षण झाले असल्याने तुम्ही पापड, लोणच्याचा उद्योग करा, असे म्हणत १५ बँकांनी कर्ज नाकारलेल्या उद्योजिका पार्वती महादेव फुंदे यांनी न डगमगता खासगी बँकेकडून कर्ज घेऊन पीव्हीसी पाइपचा कारखाना सुरू केला. आज हा कारखाना यशस्वीपणे चालवून वर्षाकाठी त्या सुमारे दीड कोटीची उलाढाल करीत आहेत. कारखान्यात प्रत्यक्षपणे बाराजणांना रोजगारही दिला आहे. आता त्यांनी ५१ महिलांना उद्योजक करण्याचा संकल्प केल्याने सामान्य महिलांसाठी त्या ‘रोल मॉडेल’ ठरत आहेत. बाजारातील अन्य कंपन्यांच्या तुलनेत त्यांच्या कंपनीचे पाइप कमी दरात मिळत असल्याने हा कारखाना शेतकऱ्यांसाठी आधार बनला आहे.
पार्वतीबाई लग्नानंतर कामगार पतीसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये राहण्यास आल्या. केवळ नववीपर्यंत त्यांचे शिक्षण झालेले असल्याने सुरुवातीला त्यांनी कॉलनीतील निरक्षर महिलांना साक्षर करण्याचे काम केले. यानंतर त्यांनी काही दिवस साडी आणि स्टील भांडी विक्रीचे दुकान टाकले. यादरम्यान त्यांची ओळख मुंबईहून राहण्यास आलेल्या महिलेसोबत झाली. त्यांनी त्यांना एमआयडीसीकडून भूखंड घेऊन एखादी कंपनी सुरू करा, असा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी २००० साली शेंद्रा एमआयडीसीमध्ये भूखंड मिळावा, यासाठी एमआयडीसीकडे अर्ज केला. एमआयडीसीने त्यांना २००५ साली एक भूखंड दिला. याकरिता त्यांनी ४० हजार भरले.
शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांनी शेतकऱ्यांशी संबंधित पीव्हीसी पाइप बनविण्याचा कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी विविध १५ राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्ज मिळावे म्हणून अर्ज केला. मात्र तुमचे शिक्षण कमी आहे, तुम्हाला पीव्हीसी पाइपचा कारखाना चालविता येणार नाही, असे सांगून त्यांना या उद्योगासाठी कर्ज नाकारले. शेवटी त्यांनी खासगी बँकेकडून कर्ज घेऊन २००६ साली कारखाना सुरू केला.
चूल आणि मूलपलीकडेही महिला सर्व क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करू शकतात. यामुळेच आम्ही आता समर्थ औद्योगिक सहकारी संस्था स्थापन केली आहे. या संस्थेच्या ५१ सभासद महिलांना स्वत:चा कारखाना सुरू करून स्वत:च्या पायावर उभे केले जाणार आहे. यात एका मोलकरीण महिलेचाही समावेश आहे.
पार्वती महादेव फुंदे,
महिला उद्योजिका
स्वत: केलं मार्केटिंग
पार्वतीबाई यांनी उत्पादनाआधीच सुमारे वर्षभर त्यांच्या मालाची स्वत: मार्केटिंग करीत पॅम्प्लेट्स, पत्रके तयार करून शेतकऱ्यांना वाटली. बाजारातील अन्य कंपन्यांच्या मालांपेक्षा गुणवत्ता असलेले पाइप कमी दरात त्यांनी उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या पाइपला पसंती दिली. आज संपूर्ण राज्यातील शेतकरी त्यांच्या पाइपचे ग्राहक आहेत. परिणामी उत्पादनापेक्षा मागणी अधिक आहे.