वर्क फ्राॅम हाेमच्या नावाखाली महिलेला १० लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 08:08 IST2025-06-08T08:08:19+5:302025-06-08T08:08:37+5:30
Ratnagiri News: सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना मे महिन्यात कुवारबाव परिसरात घडली. पाेलिसांनी एका महिलेसह दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे.

वर्क फ्राॅम हाेमच्या नावाखाली महिलेला १० लाखांचा गंडा
रत्नागिरी : सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली महिलेची तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना मे महिन्यात कुवारबाव परिसरात घडली. पाेलिसांनी एका महिलेसह दाेघांवर गुन्हा दाखल केला आहे.
प्रवीण आणि एका महिलेचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्याविरोधात रोहिणी मंदार गीते (४५, रा. साईगण वृंदावन सोसायटी कुवारबाव, रत्नागिरी) यांनी शुक्रवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संशयितांनी सोशल मीडियावर वर्क फ्रॉम होमची जाहिरात ठेवली होती. या जाहिरातीच्या नावाखाली स्केचर्स कंपनीमध्ये कामासाठी महिलेला माहिती देऊन सुरुवातीला कस्टम ऑर्डरसाठी भरलेल्या रकमेवर त्यांना योग्य परतावा देऊन विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेने आपल्या बँक खात्यातून १० लाख रुपये भरले होते; परंतु या रकमेचा कोणताही परतावा न देता त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कमही परत केलेली नाही.