मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, देशाचे माजी गृहमंत्री आणि तत्त्वनिष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनातील अनुभवी, अभ्यासू आणि सुसंस्कृत नेतृत्व हरपल्याची भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शोकसंवेदना व्यक्त करताना व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विज्ञान शाखेत पदवी आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष म्हणून सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. त्यानंतर लातूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १९८० साली लातूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या पाटील चाकूरकर यांनी सलग सात निवडणुकांत मतदारांचा विश्वास संपादन केला. इंदिराजी गांधी, राजीव जी गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्रालयासह विविध खात्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत दक्षता, शिस्त आणि प्रामाणिकपणाने सांभाळल्या. पुढे लोकसभा अध्यक्ष आणि पंजाबचे राज्यपाल म्हणून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात मोलाचे योगदान दिले.
पाच दशकांहून अधिक काळाच्या आपल्या सार्वजनिक जीवनात लातूरसह महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदीय कामकाजाचे थेट प्रक्षेपण, नव्या संसद ग्रंथालय इमारतीला गती देणे, अशा अनेक उपक्रमांत त्यांच्या दूरदृष्टीचा आणि प्रशासनकौशल्याचा प्रत्यय आला. दांडगा जनसंपर्क, साधेपणा, शिस्त, तत्त्वनिष्ठा ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होती. त्यांच्या निधनाने लातूरची व काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबीयांच्या दुःखात सामील असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
Web Summary : Harshvardhan Sapkal mourns Shivraj Patil, highlighting his contributions as a leader, parliamentarian, and minister. Patil's dedication, discipline, and integrity significantly impacted Maharashtra and national politics. His work modernizing parliament is remembered.
Web Summary : हर्षवर्धन सपकाल ने शिवराज पाटिल के निधन पर शोक व्यक्त किया, उनके नेतृत्व, सांसद और मंत्री के रूप में योगदान को उजागर किया। पाटिल की निष्ठा, अनुशासन और ईमानदारी ने महाराष्ट्र और राष्ट्रीय राजनीति पर महत्वपूर्ण प्रभाव डाला। संसद के आधुनिकीकरण का उनका कार्य याद किया जाता है।