मुंबई - मागील ३ वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहे. त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे यासारख्या प्रमुख महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार यश मिळवल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे. परंतु या निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकीय समीकरण बदलणार का अशी चर्चा सुरू आहे. मराठीच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील दुरावा कमी झाल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यात राज-उद्धव यांच्या एकीमुळे मनपा निवडणुकीत फटका बसण्याची धास्ती महायुतीला लागली आहे. त्यामुळे मुंबईत एकत्रित लढण्याची तयारी महायुतीने केली आहे.
येत्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपास महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यातील राज्यातील प्रमुख महापालिकांचा समावेश आहे. यात जगात सर्वात जास्त बजेट असणाऱ्या मुंबई महापालिकेचा समावेश आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकद कमी करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रयत्न करण्यात आला. परंतु उद्धव ठाकरे यांना मुंबईत ९ आमदार निवडून आणण्यात यश आले. त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबईत मराठी मते मोठ्या प्रमाणात त्यांना मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही बंधूंनी एकत्रित आले पाहिजे अशी भावना सर्वसामान्य मराठी माणसांची आहे. त्यात राज-उद्धव यांच्यात युतीबाबत सकारात्मक पाऊल आगामी काळात महायुतीसाठी डोकेदुखी वाढवणारी ठरू शकतात.
ठाकरे बंधूंच्या या एकीला शह देण्यासाठी महायुतीने मुंबईत एकत्रित निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. मात्र मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीत महायुती होण्याची शक्यता फार कमी आहे. ठाणे, पुणे, नाशिक सारख्या महापालिकांमध्ये भाजपाचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इरादा आहे. याठिकाणी होणारी बंडखोरी लक्षात घेऊन भाजपा आणि मित्रपक्ष वेगवेगळे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. परंतु मुंबईत महायुतीला कुठलाही धोका पत्करायचा नाही. मुंबईत ठाकरे बंधू एकत्रित आले तर त्याचा मतांवर परिणाम होईल त्यामुळे महायुती सावध भूमिका घेत आहे. अद्याप महापालिका निवडणुका घोषित झाल्या नसल्या तरी प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या परीने मतदारसंघाची बांधणी करत आहे. इच्छुकांची भाऊगर्दी, बंडखोरी टाळण्यासाठी महायुती मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्यातील दुरावा कमी
राज्यात शासनाने हिंदी सक्तीचा जीआर काढल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ना कुठला झेंडा, केवळ मराठी अजेंडा अशी घोषणा करत सर्वांना एकत्रित येण्याचं आवाहन केले होते. कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असं विधान करत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना साद घातली होती. त्याला तात्काळ प्रतिसाद देत उद्धव ठाकरे यांनीही झाले गेले गंगेला मिळालं, मराठीसाठी एकत्र येऊ अशी भूमिका घेतली. त्यानंतर हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी एकत्रित येत ५ जुलैला मोर्चाची हाक दिली. या मोर्चापूर्वीच महायुती सरकारने हिंदीबाबत घेतलेला निर्णय रद्द केला. मात्र ठाकरे बंधू यांनी विजयी मेळावा आयोजित केला. या विजयी मेळाव्यात २० वर्षांनी राज उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. त्यानंतर या दोन्ही पक्षात युती होणार अशी चर्चा सुरू झाली. मनसेकडून युतीवर कुणीही भाष्य करू नये असा आदेश राज ठाकरे यांनी दिला. परंतु २७ जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून मनसे प्रमुख राज ठाकरे थेट मातोश्रीवर गेल्याने या दोन्ही भावांमधील दुरावा कमी झाल्याचे संकेतच यातून मिळाले. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.