आपसात समन्वय ठेवा, नामुष्की नकाे; शिंदे-फडणवीस-पवार यांचा मंत्र्यांना सल्ला
By यदू जोशी | Updated: December 7, 2023 09:50 IST2023-12-07T08:35:59+5:302023-12-07T09:50:08+5:30
राज्य सरकार फ्रंटफूटवर...! प्रश्नोत्तरे, लक्षवेधी आणि सभागृहातील इतर चर्चा याची व्यवस्थित तयारी करा. अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग नीट घ्या.

आपसात समन्वय ठेवा, नामुष्की नकाे; शिंदे-फडणवीस-पवार यांचा मंत्र्यांना सल्ला
नागपूर : विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर द्या. आपसात समन्वय ठेवा. कोणत्याही पद्धतीने सरकारवर नामुष्की येणार नाही याची काळजी घ्या, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी सहकारी मंत्र्यांना दिला.
दोन्ही सभागृहात मंत्री नसल्यामुळे कामकाज तहकूब करावे लागण्याची पाळी सरकारवर गेल्या अधिवेशनात तीन-चार वेळा आली होती. विरोधकांनी त्यावेळी सरकारला धारेवर धरले होते. संबंधित खात्याचे मंत्री सभागृहात नसल्यामुळे त्यांच्या विभागाची उत्तरे अन्य मंत्र्यांनी दिली, असे यावेळी काहीही घडणार नाही याची काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार यांनी बजावले.
प्रश्नोत्तरे, लक्षवेधी आणि सभागृहातील इतर चर्चा याची व्यवस्थित तयारी करा. अधिकाऱ्यांकडून ब्रीफिंग नीट घ्या. अधिकाऱ्यांनी दिशाभूल करणारी माहिती देणे हा प्रकार खपवून घेऊ नका. मंत्री सभागृहात हजर नाहीत म्हणून उत्तर मिळाले नाही, असे होता कामा नये. सभागृहाच्या कामकाजाच्या वेळा सांभाळूनच सार्वजनिक कार्यक्रम घ्या, असेही मंत्र्यांना बजावण्यात आले.
आपल्या सरकारची कामगिरी दमदार आहे. आपण अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले हे ठासून संगत विरोधकांचे हल्ले परतवले पाहिजेत. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सरकार म्हणून काम करताना ‘ओनरशिप‘च्या भावनेने बोलले पाहिजे. आपण खात्यापुरते नसून सरकारची भूमिका मांडत आहोत याचे भान ठेवा.- देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील दाेन्ही सभागृहांमधील कामकाजाबाबत मंत्र्यांना सूचना देतील त्या काटेकोरपणे पाळायच्या आहेत. - अजित पवार उपमुख्यमंत्री
विरोधकांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी वेगळी बैठक
विरोधी पक्षांनी आजच्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकताना जे पत्र त्यांना दिले ते पत्र समोर ठेवून मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि काही वरिष्ठ मंत्री यांची वेगळी बैठक रामगिरीवर झाली. एकेका मुद्द्यावर पत्र परिषदेत काय बोलायचे याची रणनीती ठरवण्यात आली. त्यामुळेच आजच्या पत्रपरिषदेत तिघांमध्ये समन्वय दिसून आला. तिघांपैकी कोणी कोणत्या विषयावर बोलायचे हे आधीच ठरलेले होते.
त्यानुसार पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरलेल्या मुद्द्यांवर भाष्य केले.