Maharashtra Cabinet Meeting: आता किरणा दुकानात वाईन मिळणार?, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 13:24 IST2022-01-27T13:22:40+5:302022-01-27T13:24:07+5:30
राज्यात आता सुपर मार्केट, जनरल स्टोअर किंवा वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Cabinet Meeting: आता किरणा दुकानात वाईन मिळणार?, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय होणार!
मुंबई
राज्यात आता सुपर मार्केट, जनरल स्टोअर किंवा वॉक इन स्टोअरमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. राज्यातील वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्यासाठी राज्य सरकार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकार महसूलात वाढ करण्यासाठी नवा वाईन विक्रीचा प्रस्ताव आणणार आहे. या प्रस्तावामुळे राज्याच्या महसुलात हजारो कोटी रुपयांची भर पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्याचा नवा वाईन प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर झाल्यास राज्यातील सुपर मार्केट, वॉक इन स्टोअर आणि जनरल स्टोअरमध्ये वाईनची विक्री करणं शक्य होणार आहे. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत चर्चा केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये वाईन विक्रीच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे.
दरम्यान, भाजपाकडून राज्य सरकारच्या या नव्या वाईन विक्री धोरणाला याआधीपासूनच विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारनं वाईन विक्रीबाबत नवा प्रस्ताव मान्य केल्यास भाजपाकडून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा केले जाणारे मुद्दे-
१. केंद्राकडून मिळणारी जीएसटीची नुकसान भरपाई आता बंद होणार आहे. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा होणार
२. राज्यातील १९ वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी सेवेत घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा
३. राज्यातील वाईन विक्रीच्या नव्या धोरणावर सविस्तर चर्चा