महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 8 लाख कर्करुग्णांवर उपचार- आरोग्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 18:19 IST2020-02-03T18:18:53+5:302020-02-03T18:19:15+5:30

'कॅन्सर वॉरिअर' 23 जिल्ह्यांत करताहेत मोफत उपचार

will treat 8 lakh cancer patients through Mahatma Phule Health Scheme says rajesh tope | महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 8 लाख कर्करुग्णांवर उपचार- आरोग्यमंत्री

महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 8 लाख कर्करुग्णांवर उपचार- आरोग्यमंत्री

मुंबई: राज्यात कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 8 लाख कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. 14 जिल्ह्यामध्ये केमोथेरेपी युनिट सुरु करण्यात आले असून आतापर्यंत 2800 रुग्णांना त्याद्वारे उपचार मिळाले आहेत. कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करतानाच उपचारासाठी महाराष्ट्र कॅन्सर वॉरिअर मार्फत 23 जिल्ह्यांमध्ये सेवा दिली जात आहे. आतापर्यंत 40 हजार रुग्णांची तपासणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सध्या अमरावती, गडचिरोली, भंडारा, सिंधुदुर्ग, सातारा, नाशिक, पुणे, जळगाव, अकोला, वर्धा, रत्नागिरी, बीड, जालना, नंदूरबार या जिल्ह्यांमध्ये केमोथेरेपी युनिट सुरु झाले आहे. कोल्हापूर आणि उस्मानाबाद‍ जिल्ह्यातील फिशिजीएन व नर्स यांना केमोथेरेपीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तर ठाणे, रायगड, अहमदनगर, परभणी, हिंगोली, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांचे प्रशिक्षण सुरु आहे.

सर्व सामान्यांना आवाक्याबाहेरील वैद्यकीय उपचारासाठी सुरु असलेल्या महात्मा जोतीबा फुले जन आरोग्याच्या माध्यमातून आतापर्यंत कर्करोगाशी संबंधीत विविध उपचार सुमारे 8 लाख रुग्णांवर करण्यात आले आहेत. या योजनेमुळे सामान्यांना दिलासा मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

कर्करोगाला आळा घालण्यासाठी सध्या लोकसंख्या आधारित तपासणी कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आशा कार्यकर्त्या व एएनएमच्या माध्यमातून प्रत्येक घराचे आणि त्यातील व्यक्तींचे सर्वेक्षण केले जात आहे.

कर्करोगाबद्दल ग्रामीण भागात जागरुकता निर्माण होण्याकरीता टाटा हॉस्पिटलमधून कर्करोगाचे प्रशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांसोबत राज्यात वैद्यकीय व्यवसाय करीत असलेल्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात जागृकता मोहिम हाती घेण्यात आली आहे. या तज्ज्ञांनी एकत्र येऊन महाराष्ट्र कँन्सर वॉरिअर संघटनेची स्थापना केली आहे. त्यामध्ये टाटा हॉस्पिटलमधून कर्करोगाची पदवी घेतलेल्या 59 तज्ज्ञांचा समावेश आहे. गावपातळीवर काम करतानाच कर्करुग्णांची मोफत तपासणी त्यांच्या माध्यमातून केली जात आहे. सध्या अमरावती, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, नंदूरबार, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, कोल्हापूर, जळगाव, सांगली, लातूर, अकोला, नाशिक, औरंगाबाद, पुणे व बीड या 23 जिल्ह्यांमध्ये कॅन्सर वॉरिअरमार्फत सेवा दिली जात आहे. आतापर्यंत गेल्या तीन वर्षात सुमारे 40 हजार रुग्णांची तपासणी आणि 3200 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली.

राज्यात 31 मे ते 30 जून या कालावधीत जागतीक तंबाखू नकार दिनाचे औचित्य साधून मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये 8 लाख 27 हजार 972 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. नाशिक आणि अमरावती येथील संदर्भ सेवा रुग्णालयात कर्करोगावरील उपचार सुविधा दिल्या जातात, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 

Web Title: will treat 8 lakh cancer patients through Mahatma Phule Health Scheme says rajesh tope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.