कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 06:10 IST2025-09-25T06:10:25+5:302025-09-25T06:10:52+5:30
पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असली, तरी त्याला प्रत्यक्षात मूर्त रूप मिळणार का? ते स्वप्न वास्तवात उतरणार का? हा प्रश्न आहे.

कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
‘शेंदूर’ फासले कुणी कुणाला?
पाकिस्तानविरोधात भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरची चर्चा अवघ्या जगभरात झाली. मात्र ठाण्यात शिंदेसेना विरुध्द उद्धवसेना यांच्यात सध्या ‘सिंदूर’ नव्हे तर ‘शेंदूर’ कोणी कोणाला लावले याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खा. राजन विचारे यांना ‘शेंदूर’ लावले आणि त्यामुळेच ते खासदार झाल्याचा दावा शिंदेसेनेने केला. दुसरीकडे तुम्ही तर काँग्रेसमध्ये जाणार होतात. पण, तिथे जाण्यापासून मी रोखले, असे सांगत खा. विचारे यांनी खा. नरेश म्हस्के यांच्यावर तोंडसुख घेतले. तसेच तुम्हाला कुणी ‘शेंदूर’ लावला हे विसरला का? असा दावाही केला. त्यामुळे ठाण्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ नव्हे तर ‘शेंदूर’ची चर्चा जोशात आहे.
हे तर पालथ्या घड्यावर पाणी...
अजित पवार गटाचे चिंतन शिबिर नुकतेच नागपुरात पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांचे कान टोचले. जिल्ह्यांचे दौरे करा, दौऱ्यावर गेले की, जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्षांना सोबत घ्या, अन्यथा खुर्ची रिकामी करा, अशा शब्दांत त्यांनी खडसावले. यानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नागपूरचा दौरा केला. पण, त्यांनी जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना भेटीची वेळही दिली नाही. जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी पदाचा राजीनामा देताना ही खदखद बोलून दाखविली. तर, सूचनेनंतरही मंत्री दखल घ्यायला तयार नसतील तर शिबिरांतून काय होणार, असा प्रश्न पदाधिकारी उपस्थित करू लागले तर आश्चर्य कसले?
आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?
राजकारणात कायमस्वरूपी वैर नसतं, कायमस्वरूपी मित्रही नसतात. बीडमध्ये दीर्घकाळाचं वैर विसरून माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांची हातमिळवणी झाली. उद्धव व राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा जवळ आले. अशातच अजित पवार गटाच्या चिंतन शिबिराबाहेर लागलेल्या बॅनरने आमदार, नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले होते. मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या या बॅनरवर ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी… साहेब-दादा-ताई तुम्ही एक व्हा!’ असा मजकूर होता. पवार कुटुंब पुन्हा एकत्र यावे ही कार्यकर्त्यांची इच्छा असली, तरी त्याला प्रत्यक्षात मूर्त रूप मिळणार का? ते स्वप्न वास्तवात उतरणार का? हा प्रश्न आहे.
शाहरुख, राणीचे खास ‘बाँडिंग’
अनेक चित्रपट कलाकारांचे वैयक्तिक जीवनातही खूप चांगले ‘बाँडिंग’ असते, याची प्रचिती वारंवार कार्यक्रमांमध्ये येते. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यातही ते दिसले. शाहरुखला ‘जवान’साठी, तर राणी मुखर्जीला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॅार्वे’साठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. सोहळ्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात शाहरुख हा राणीच्या उडणाऱ्या केसांवरून हात फिरवत ते ठीक करताना दिसतो. तर राणी शाहरुखला मेडल गळ्यात घालताना मदत करताना दिसते. बॉलिवूडची काळी बाजू वारंवार दाखवणाऱ्यांना ही चपराकच म्हणावी लागेल.
बेलापूरपट्टीचा ‘हिरा’ काळवंडला
एकेकाळी शिक्षकांचे गाव आणि बेलापूर पट्टीचे आकर्षण असलेल्या शिरवणे गावाला वेगळ्याच समस्येने ग्रासले आहे. याच गावच्या जयवंत सुतार यांनी महापौरपद भूषवले. आता भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील हेदेखील याच गावातील रहिवासी आहेत. नवी मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या अनेक व्यक्ती या गावातील आहेत. त्यानंतरही येथील समस्या जैसे थे कशा, असा प्रश्न आहे. त्यातच गावातील अनधिकृत लॉजिंग-बोर्डिंग विरोधात आंदोलने उभी राहतात, यश मात्र येत नाही. त्यामुळे एकेकाळच्या देखण्या गावाला लागलेले हे ग्रहण सुटेल का? हा प्रश्न आहे.
‘या’ मागणीचा अर्थ तरी काय?
कल्याण-डोंबिवली पालिकेत २७ गावे असावीत की नसावीत, यावरून दोन्ही संघर्ष समित्यांत मतमतांतरे आहेत. दुसरीकडे १८ गावे बाहेर आणि नऊ गावे महापालिकेत याबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. त्यानंतर एका समितीचे पदाधिकारी या गावांमधील स्वच्छता कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याबाबत आग्रही आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात आयुक्त अभिनव गोयल यांच्यावर राजकीय दबाव आणल्याने संघर्ष झाल्याची चर्चा आहे. पण, एकीकडे महापालिकेत गावे नकोत, स्वतंत्र नगरपालिका हवी, अशी मागणी करायची व दुसरीकडे २७ गावांमधील कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घ्या, असा आग्रह धरायचा या परस्परविरोधी मागण्या नाहीत का? असा पडला प्रश्न आहे.