Sunetra Pawar News: अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यामुळे सरकारमध्येही काही बदल होणार आहेत. विशेषतः त्यांच्याकडे असलेले उपमुख्यमंत्री पद, अर्थमंत्री खाते आणि इतर खाती कोणाकडे जाणार? याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीने सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. पटेल यांनीही माध्यमांशी बोलताना तसेच संकेत दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "अजित पवारांकडे जी जागा होती, त्या जागेबद्दल निर्णय करावा लागणार आहे. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एवढेच सांगितले की, येत्या काही दिवसात, लवकरात लवकर आम्हाला निर्णय करायचा आहे. त्याच्यासाठी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनाही बोलावून त्यांच्याशी चर्चा करून, योग्य निर्णय, जनभावनेचा आदर करून अजित पवारांच्या योगदानाचा विचार करून आम्हाला निर्णय करायचा आहे."
सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणार का? तशी चर्चा झाली का?
या मुद्द्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, "सुनेत्रा पवार यांच्या नावाची आम्ही कुठलीही चर्चा केली नाही. पण, तो आमचा अंतर्गत विषय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणाला त्या जागेवर बसवायचे, हा पक्षाचा निर्णय आहे. जनभावना, आमदारांची भावना आणि आमच्या स्वतःचीही भावना आहे. मी प्रफुल्ल पटेल म्हणून बोलतोय, कार्याध्यक्ष म्हणून बोलतोय असे नाही. माझी स्वतःचीही भावना आहे की, योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे. त्या दिशेने आम्ही विचार करू. पण, अजूनही असा विषय आलेला नाही."
आज रात्री किंवा उद्या सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवारांशी चर्चा करणार
पुढे बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, "अजूनही राजकीय शोक आहे. आज तिसरा दिवस आहे. तिथे घरचे कार्यक्रम सुरु आहे. आम्हाला सुनेत्रा वहिनींशी बोलावं लागेल. पार्थ पवार आहेत. जय पवार आहेत. त्यांच्याशी बोलावं लागेल."
"आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत, पण आजचा दिवस किमान त्यांच्या घरचे कार्यक्रम आटोपून, शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे. मी परत परत सांगतोय की आमची जी भावना आहे. जनतेची जी भावना आहे. त्याच्या अनुरुपच निर्णय होणार आहे", असे सांगत पटेल यांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याचेच संकेत दिल्याची चर्चा होत आहे.
Web Summary : Following Ajit Pawar's death, discussions arise about filling his deputy CM post. Praful Patel's meeting with Fadnavis fuels speculation that Sunetra Pawar may be appointed. Patel indicated a decision respecting public sentiment and Ajit Pawar's contributions, with family consultations planned before finalizing the replacement.
Web Summary : अजित पवार के निधन के बाद, उनके उपमुख्यमंत्री पद को भरने की चर्चा है। प्रफुल्ल पटेल की फडणवीस के साथ मुलाकात से अटकलें तेज हो गई हैं कि सुनेत्रा पवार को नियुक्त किया जा सकता है। पटेल ने जनभावनाओं और अजित पवार के योगदान का सम्मान करते हुए निर्णय लेने का संकेत दिया, और प्रतिस्थापन को अंतिम रूप देने से पहले पारिवारिक परामर्श की योजना बनाई गई है।