मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल स्पष्ट भूमिका समाज माध्यमावर मांडली आहे. शिवजयंतीच्या शुभेच्छा देताना राज यांनी लिहिले आहे : माझ्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे, त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही... आणि झटपट यशासाठी मला कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. महाराष्ट्र घडविण्याच्या माझ्या ध्येयावर माझी अगाध श्रद्धा म्हणूनच टिकून राहते.
खरेतर महाराजांची जयंती ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके ते लोकोत्तर पुरुष होते. पण, शिवचरित्रातून ३६५ दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केले पाहिजे, असे राज म्हणाले.
नैराश्यात नाही, लढणार आहे...आजकाल छोट्या छोट्या पीछेहाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात, प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पारायण केले तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा महाराजांनी किती शांतपणे स्वराज्य उभे केले हे जाणवेल. आणि मग असली किरकोळ नैराश्ये कधीच येणार नाहीत.” आपण नैराश्य़ात नाही, लढणार आहोत, असेही राज यांनी स्पष्ट केले आहे.
जेव्हा वादळ असते...प्रबोधनकार म्हणायचे, जेव्हा बाहेर वादळ असते तेव्हा आत शांत बसून शक्ती साठवून ठेवावी आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपले वादळ निर्माण करावे.