Eknath Khadse vs Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेते एकमेकांवर बेछूट गोळीबार करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली होती की त्याची हत्या झाली असा सवाल गिरीश महाजनांनी केला होता. तसेच आमदार मंगेश चव्हाण यांनीही पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे अर्धवट माहितीच्या आधारे बदनामी करत असल्याची टीका केली होती. या सर्व आरोपांवर आता एकनाथ खडसे यांनी प्रत्यु्त्तर दिलं. गिरीश महाजन हे अर्ध्या खात्याच्या मंत्री असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.
नाशकातल्या हनी ट्रॅप प्रकरणावरून मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. गिरीश महाजन यांनी प्रफुल्ल लोढा आणि एकनाथ खडसे यांचा जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर खडसे यांनी प्रफुल्ल लोढाकडे गिरीश महाजन यांच्या कारनाम्यांचा पुरावा असलेली सीडी असल्याचे म्हटलं. यानंतर पुन्हा महाजनांनी खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले. यावर आता एकनाख खडसे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
"गिरीश महाजन अर्ध्या खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्यात कोणता मोठा प्रकल्प आणला हे सांगावं? मी महाराष्ट्राचा विकास समोर ठेवला. त्यांनी तर चाळीसगावचा किंवा जामनेरचा विकास डोळ्यासमोर ठेवलेला नाही. मी मंगेश चव्हाण यांना आव्हान करतो की, माझ्याविषयी एक छोटीशी गोष्ट जरी तुमच्याकडे असेल तरी ते समाजासमोर दाखवा. नुसत्या गप्पा काय मारतात? मी राजकारणात निवृत्त होईल. मूळ प्रश्न प्रफुल लोढा आणि गिरीश महाजनांचा आहे. महिलांबाबत गिरीश महाजन यांचं नाव कायम पुढे का येतं? गिरीश महाजन यांचे नाव मी घेतले नाही. प्रफुल लोढा यांनी पहिल्यांदा महाजनांचे नाव घेतले होते. मी बटन दाबलं तर देशात तहलका माजेल हे त्यांचे शब्द होते. गिरीश महाजनांचा एका महिला अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा आरोप मी केला नाही. प्रफुल लोढा हा तुमच्या ताब्यात आहे. प्रफुल लोढाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात. प्रफुल लोढाची नार्को टेस्ट करा म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी समोर येईल," असं एकनाथ खडसे म्हणाले.
"माझ्या चारित्र्यावर बोललं गेलं. मी कुणाशीही गुलाबी गप्पा केलेल्या नाहीत. तुम्ही कसल्या गप्पा केलेल्या आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे. माझी आत्तापर्यंत पाच वेळा प्रॉपर्टीची चौकशी झाली आहे. सर्व प्रॉपर्टी कायदेशीर आहे, असे मला सर्टिफिकेट मिळाले आहे. तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि तुम्ही सरकारला सांगा नाथाभाऊंचे आव्हान मी स्वीकारले आहे. माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा," असंही एकनाथ खडसे म्हणाले.