Vidhan Sabha 2019: महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 05:24 AM2019-09-20T05:24:58+5:302019-09-20T05:25:28+5:30

नार-पार प्रकल्पाचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला देतानाच दमण गंगा, पिंजाळ तसेच अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून पश्चिम विदर्भासह सर्व महाराष्ट्रच दुष्काळमुक्त करण्यात येईल,

Will free Maharashtra from drought; Announcement of Chief Minister Fadnavis | Vidhan Sabha 2019: महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Vidhan Sabha 2019: महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Next

नाशिक : नार-पार प्रकल्पाचे पाणी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला देतानाच दमण गंगा, पिंजाळ तसेच अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून पश्चिम विदर्भासह सर्व महाराष्ट्रच दुष्काळमुक्त करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये गुरुवारी केली आहे.
महाजनादेश यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पंचवटीतील तपोवन येथे झालेल्या सभेत त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. पूर्वीच्या काळी आमच्याकडे खतावणी लिहिणारे लोक होते, असे म्हणणाऱ्या पवार यांची राजेशाही मानसिकताच दिसून येते. त्यांची राजेशाही मानसिकता तर आमची सेवकांची भूमिका आहे. त्यांच्या मानसिकतेतून ते बाहेर पडत नसल्यानेच लोकांनी त्यांच्या ऐवजी सेवकांना निवडून दिले आणि पुढेही देतील, असा आत्मविश्वास व्यक्त करत महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने चार हजार किलोमीटर प्रवास केला. जागोजागी झालेल्या उत्स्फूर्त स्वागताने मी भारावून गेलो असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाची सत्ता आल्यानंतर महाराष्टÑातील राजकारणातील पारंपरिक सोशल इंजिनिअरिंग बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मुख्यमंत्री केले. महाराष्टÑात विकासाची आणि देशाला सर्वाेच्च पुढे नेण्याची क्षमता असूनदेखील गेल्या अनेक वर्षांत कॉँग्रेस तसेच राष्टÑवादीच्या कारभारामुळे हे राज्य भ्रष्टाचाराचा अड्डा बनले होते. दलाल आणि भ्रष्टाचाराचा हा डाग पुसण्याची अपेक्षा पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्याकडून व्यक्त केली होती. तेच काम करताना महाराष्टÑावर डाग लागू दिला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अन्य मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रास्ताविक केले.
>एकनाथ खडसे राहिले वंचित
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत व्यासपीठावर पहिल्या रांंगेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती लाभली. परंतु, सभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे आदींना भाषणाची संधी मिळत असताना खडसे मात्र त्यापासून वंचित राहिले.
राजकीय पदांच्या लाभापासून
वंचित असलेल्या खडसे यांनी गेल्या तीन-चार वर्षांत फडणवीस सरकारला खडे बोल सुनावत अडचणीत आणण्याचीच भूमिका वठविलेली आहे. त्यामुळे खडसे यांच्या भाषणाकडेही लक्ष लागून होते परंतु, त्यांना तशी संधी मिळालीच नाही. मात्र, मोदी यांचे भाषण संपल्यावर त्यांनी मोदींची भेट घेऊन हस्तांदोलनात समाधान मानून घेतले.
>राष्ट्रवादीमुक्त महाराष्टÑ
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेसवर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश कॉँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प केला, आता महाराष्टÑ राष्टÑवादीमुक्त होईल, असा दावा त्यांनी केला.

Web Title: Will free Maharashtra from drought; Announcement of Chief Minister Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.