राज्याचे नवीन कृषी धोरण आखणार - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:37 IST2025-02-22T12:36:49+5:302025-02-22T12:37:35+5:30
प्रयोगशील शेतकऱ्यांशी साधला संवाद

राज्याचे नवीन कृषी धोरण आखणार - कृषिमंत्री माणिकराव कोकाटे
कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावून अन्न धान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हावा, त्याचबरोबर राज्यातून अधिक निर्यात वाढावी, यासाठी लवकरच राज्य शासन नवीन कृषी धोरण आखणार असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले.
शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित केलेल्या प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. मंत्री कोकाटे म्हणाले की, शेतकऱ्यांनी रासायनिकऐवजी सेंद्रिय शेती करण्याला प्राधान्य देण्याची गरज असून त्यांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे.
विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. ऊसतज्ज्ञ संजीव माने व डॉ. अविनाश पोळ यांनी मार्गदर्शन केले. शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या विविध कृषीविषयक स्टॉलला मंत्री कोकाटे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऊस, द्राक्षे, भातपीक, नाचणी, डाळिंब, बांबू, हळद, काजू, आंबा, ड्रॅगन, नर्सरी आदी पिकांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींचा ऊहापोह केला.
खासदार धैर्यशील माने, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ. अविनाश पोळ, कृषी आयुक्तालयाचे (पुणे) सहसंचालक रविशंकर चलवदे, सहायक संचालक (संशोधन) डॉ. अशोक पिसाळ, रामेतीचे प्राचार्य बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिदंर पागंरे , सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, साताराच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे उपस्थित हाेते.
बोगस औषध दिल्यास भरपाई वसूल
शेतकऱ्यांना बोगस औषधे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करून ती संबंधित शेतकऱ्यांना देण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री कोकाटे यांनी सांगितले.